नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालयात अभियंता दिन उत्साहाने साजरा
नवी मुंबई- देशाच्या विकासात अभियंत्याचे फार मोठे योगदान असून नवी मुंबईच्या प्रगतीतही अभियंत्यांचा अतिशय महत्वाचा वाटा असल्याचे मत व्यक्त करीत नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त श्री. राजेश नार्वेकर यांनी अभियंता दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या.
नवी मुंबई महानगरपालिका अभियंत्रिकी विभागाच्या वतीने मुख्यालयातील ज्ञानकेंद्रात आयोजित विशेष समारंभाच्या निमित्ताने आयुक्त श्री. राजेश नार्वेकर यांनी अभियंत्यांना शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त श्रीम. सुजाता ढोले व श्री. विजयकुमार म्हसाळ, कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा शहर अभियंता श्री. संजय देसाई, माजी शहर अभियंता श्री. सुरेंद्र पाटील, अतिरिक्त शहर अभियंता श्री. शिरीष आरदवाड, व्याख्याते श्री. विवेक मेहेत्रे व श्री. विक्रांत भालेराव आणि विविध विभागप्रमुख, कार्यकारी अभियंता व अभियंते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सर एम. विश्वेश्वरय्या यांचे कर्तृत्व आभाळाएवढे मोठे असून त्यांच्या जयंतीप्रमाणेच आज रायगड किल्ल्याची बांधणी करणारे शिवकालीन अभियंते हिरोजी इंदुलकर यांचाही स्मरणदिन आहे. हा अभियंत्यासाठी दुहेरी सुयोग असल्याचे आयुक्तांनी सांगितले. सर विश्वेश्वरय्या यांनी सिंध प्रांतापासून कर्नाटकपर्यंत आपल्या आगळ्यावेगळ्या कामाने कर्तबगारी सिध्द केली असून पुण्यातून अभियंत्रिकी पदवी संपादन करून व पुढेही धुळे शहराचे रचनाकार व इतर अनेक लोकोपयोगी कामांतून त्यांनी महाराष्ट्रासाठी भरीव योगदान दिले असल्याची माहिती आयुक्तांनी दिली.
वाचलेले प्रत्यक्ष अंमलात आणण्याची संधी अभियंत्यांना मिळते ही समाजाच्या दृष्टीने अभियंत्याविषयी आदर वाढविणारी गोष्ट असून नवी मुंबई महानगरपालिकेतील अभियंत्यांनी नव्या जगातील विकासाच्या गतीसोबत काम करुन एकविसाव्या शतकातील शहर हा नवी मुंबईचा नावलौकिक कायम राखण्यात अत्यंत महत्वाची भूमिका बजावली असल्याचे आयुक्तांनी गौरवपूर्वक सांगितले.
यापुढील काळात होणा-या विमानतळ, सागरी लिंक रोड, डाटा सेंटर अशा नानाविध अत्याधुनिक प्रकल्पांमुळे नवी मुंबईच्या नागरी सुविधांवर ताण येणार असून त्यादृष्टीने सुविधांची क्षमता वाढविण्याकडे विशेष लक्ष दिले जात असून यामध्ये अभियांत्रिकी विभागाचा मोठा वाटा असल्याचेही त्यांनी सांगितले.
नवी मुंबई महानगरपालिकेकडे प्राप्त होणा-या तक्रारींचे निराकरण करण्याचा अभियांत्रिकी विभागाचा रिस्पांन्स टाईम हा अत्यंत कमी असल्याने नागरिकांच्या मनात महानगरपालिकेबद्दल निर्माण झालेला विश्वास अधिक उत्तम काम करुन उंचावण्यासाठी आपले अभियंते यापुढील काळात अधिक तत्पर राहतील अशी खात्री यावेळी आयुक्त श्री. राजेश नावेक्रर यांनी व्यक्त केली.
शहर अभियंता श्री संजय देसाई यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतात 1992 साली महानगरपालिका स्थापन झाली त्यावेळी चार इंजिनिअर्सने सुरुवात केल्यानंतर पुढे राष्ट्रीय पातळीवर मानांकित होण्यापर्यंतच्या केलेल्या प्रगतीशील वाटचालीचा धावता आढावा घेतला. आज नवी मुंबई महानगरपालिकेचे नियोजनबध्द शहर म्हणून कौतुक होते. यामध्ये संपूर्ण कालावधीतील अभियंत्यानी दूरदृष्टीने केलेल्या कामाचे महत्वाचे योगदान असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले. महानगरपालिकेचे पहिले प्रशासक श्री. एम. रमेशकुमार यांच्या शिस्तीचा प्रभाव अजूनही आमच्यावर आहे असे सांगत श्री. संजय देसाई यांनी भविष्यातील आव्हाने लक्षात घेऊन काम करण्यासाठी अभियांत्रिकी विभाग सज्ज असल्याचे निग्रहपूर्वक सांगितले.
यावेळी डॉ. विक्रांत भालेराव यांनी पर्यावरण विषयक अत्याधुनिक कामांविषयी माहितीप्रद व्याख्यान दिले. तसेच श्री. विवेक मेहत्रे यांनी ‘चॅट जीपीटी व आर्टिफिशिअल इन्टॅलिजन्स - अभियंत्यासाठी तारक की मारक’ या विषयाच्या अनुषंगाने नव्या तंत्रज्ञानाविषयी माहिती देत प्रबोधन केले.
उपअभियंता श्री. विवेक मुळे यांनी सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांचे चरित्र वाचन केले. तसेच उपअभियंता श्री विश्वकांत लोकरे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले कार्यकारी अभियंता श्रीम. शुभांगी दोडे यांनी आभार मानले.
अभियंता दिन कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी शहर अभियंता श्री. संजय देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली व अतिरिक्त शहर अभियंता श्री. मनोज पाटील व श्री. शिरीष आरदवाड यांच्या नियंत्रणाखाली, कार्यकारी अभियंता सर्वश्री अरविंद शिेदे, अजय संखे, सुभाष सोनावणे, गिरीष गुमास्ते, मदन वाघचौंडे, संजय भय्यासाहेब पाटील, संजय दादा पाटील, विजय राऊत, मनोहर सोनावणे, संजय खताळ, शुभांगी दोडे, सुनिल लाड, प्रवीण गाडे, सुधीर जांभवडेकर, संजय पाटील आणि उपअभियंता, शाखा अभियंता व कनिष्ठ अभियंता यांनी विशेष मेहनत घेतली.