नवी मुंबई महानगरपालिकेची मदतकार्य पथके इर्शाळवाडीत कार्यरत – आयुक्त श्री. राजेश नार्वेकरही इर्शाळवाडीत

 नवी मुंबई महानगरपालिकेची मदतकार्य पथके इर्शाळवाडीत कार्यरत – आयुक्त श्री. राजेश नार्वेकरही इर्शाळवाडीत



 

      19 जुलै रोजी मध्यरात्री रायगड जिल्ह्यातील इर्शाळवाडी येथे झालेल्या भूस्खलन दुर्घटनेच्या ठिकाणी मदतीसाठी तत्परतेने नवी मुंबई महानगरपालिकेची अग्निशमन सेवा व मदतकार्य पथके आयुक्त श्री. राजेश नार्वेकर यांच्या आदेशानुसार रात्रीच उपलब्ध करुन देण्यात आली. यामध्ये 2 अधिकारी व 5 कर्मचारी यांचे नियंत्रण पथक, अग्निशमन विभागाची 4 रेस्क्यू टेंडर वाहने व जीप, 10 रुग्णवाहिका व त्यासोबत वैदयकीय पथके, 4 शोधकार्य व बचतपथके तसेच 50 कामगारांचे आवश्यक साहित्यासह मदतकार्य पथक तातडीने रात्रीच उपलब्ध्‍ करुन देण्यात आले.

      त्यानंतरही सकाळी 50 स्ट्रेचर आणि 50 हून अधिक फ्ल्युइड ॲब्सॉर्बन्ट बॉडी कव्हर बॅग, 5 रेस्क्यू किट व 50 सफाई कर्मचा-यांचे आणखी एक मदतकार्य पथक नवी मुंबई महानगरपालिकेमार्फत उपलब्ध करुन देण्यात आले. त्याचप्रमाणे मोठ्या प्रमाणात बिस्किटीचे पु़डे व बिसलेरी बॉटल्सही उपलब्ध करून देण्यात आल्या. शिवाय स्वत: नमुंमपा आयुक्त श्री. राजेश नार्वेकर यांनीही शहर अभियंता श्री. संजय देसाई व आपत्ती व्यवस्थापन विभागाचे उपआयुक्त डॉ. बाबासाहेब राजळे यांच्यासमवेत घटनास्थळी भेट देत मदतकार्यात सहभाग घेतला.

      हे मदतकार्य करण्यासाठी रात्री या दुर्गम घटनास्थळी चालत जात असताना नवी मुंबई महानगरपालिका अग्निशमन दलातील सहाय्यक केंद्र अधिकारी श्री. शिवराम यशवंत ढुमणे यांचे ह्रदयविकाराच्या झटक्याने दु:खद निधन झाले. त्यांना महानगरपालिकेच्या वतीने सीबीडी अग्निशमन केंद्रात सलामी देऊन श्रध्दांजली अर्पण करण्यात आली.