350 वा शिवराज्याभिषेक सोहळा
किल्ले रायगडावर नगारखाना येथे जिल्हाधिकारी डॉ.योगेश म्हसे यांच्या हस्ते गडपूजन संपन्न
अलिबाग,दि.5 (जिमाका):- महाराष्ट्र शासनाने 350 वा शिवराज्याभिषेक दिन या ऐतिहासिक घटनेचे औचित्य साधून हा सोहळा राज्यभर विविध कार्यक्रमांद्वारे वर्षभर साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. या पार्श्वभूमीवर हा महोत्सव दि.1 ते 7 जून 2023 या कालावधीत किल्ले रायगडावर मोठ्या दिमाखात साजरा करण्यात येत आहे.
आज दि.5 जून रोजी जिल्हाधिकारी डॉ.योगेश म्हसे व त्यांच्या सुविद्य पत्नी सौ.स्वाती म्हसे यांच्या हस्ते किल्ले रायगडावरील नगारखाना येथे विधीवत गडपूजन संपन्न झाले.
यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील, जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अपर जिल्हाधिकारी सुनील थोरवे, अपर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे, उपजिल्हाधिकारी (सामान्य प्रशासन) सर्जेराव मस्के-पाटील, महाड प्रांताधिकारी प्रतिमा पुदलवाड, तहसिलदार सुरेश काशीद,अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समिती, दुर्गराज रायगड चे फत्तेसिंह सावंत, इतर पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी मनोगत व्यक्त करताना जिल्हाधिकारी डॉ. म्हसे म्हणाले की, जिल्हा प्रशासनाने येणाऱ्या शिवभक्तांसाठी आवश्यक सोयी सुविधा उपलब्ध करून देताना अत्यंत सूक्ष्म असे नियोजन करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे. आपण सर्वांनी एकमेकांना सहकार्य करून 350 व्या शिवराज्याभिषेक दिनानिमित्त आयोजित हा महोत्सव यशस्वी करू या.
गडपूजन होण्यापूर्वी होळीचा माळ येथे आयोजित शिवकालीन युद्धकलांच्या प्रात्यक्षिकांचा जिल्हाधिकाऱ्यांसह इतर मान्यवरांनी आनंद घेतला.
यावेळी प्रशासकीय अधिकारी- कर्मचारी, शिवभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.