नवी मुंबई- नवी मुंबई ही स्वच्छ सर्वेक्षणामध्ये सातत्याने मानांकन उंचाविणारे शहर असून नवी मुंबईच्या गौरवामुळे राज्याचाही गौरव वाढतो हे लक्षात घेऊन आत्तापासूनच स्वच्छ सर्वेक्षणाशी संबंधित प्रत्येक घटकाने हे आपल्या शहराचे काम आहे या भावनेतून झोकून देऊन काम करावे असे निर्देश देत नमुंमपा आयुक्त श्री. राजेश नार्वेकर यांनी याकामी कोणतीही हयगय खपवून घेतली जाणार नाही व कामात हलगर्जीपणा आढळल्यास कारवाई केली जाईल असा स्पष्ट इशारा स्वच्छ सर्वेक्षण विषयक आढावा बैठकीत दिला.
‘स्वच्छ सर्वेक्षण 2022’ मध्ये नवी मुंबई महानगरपालिका देशात तिसरी व राज्यात पहिली मानांकन संपादन करून या वर्षीच्या ‘स्वच्छ सर्वेक्षण 2023’ ला सामोरे जाताना देशातील पहिल्या क्रमांकाच्या स्वच्छ शहराचे उद्दिष्ट नजरेसमोर ठेवून वाटचाल करीत आहे. त्या अनुषंगाने शहर स्वच्छतेकडे अधिक बारकाईने व काटेकोरपणे लक्ष देण्याची गरज आयुक्तांनी व्यक्त केली. याकरिता सर्वेक्षणाशी संबंधीत सर्व बाबींवर क्षेत्रीय स्तरावरील अधिकारी, कर्मचारी यांनी दररोज नियमितपणे लक्ष ठेवावे व कोणताही बाब नजरेतून सुटणार नाही याची काळजी घेण्याचे आयुक्तांनी स्पष्ट केले.
आपण करीत असलेल्या कामावर समाधानी न राहता त्यामध्ये अधिक चांगला बदल घडविण्याचा दृष्टीकोन जपण्याच्या सूचना आयुक्तांनी दिल्या. क्षेत्रीय पातळीवर स्वच्छता विभाग, अभियांत्रिकी विभाग, उद्यान विभाग तसेच इतर विभागाच्या अधिकारी, कर्मचारी यांनी परस्पर समन्वय राखावा आणि हे काम आपल्या विभागाचे नाही असे न म्हणता हे आपल्या सर्वांचे काम आहे हे लक्षात घेऊन परस्पर सहकार्याने काम करावे असेही आयुक्तांनी सूचित केले.
स्वच्छतेच्या अनुषंगाने कचरा वर्गीकरण, घराघरात कपोस्ट बास्केटव्दारे लावली जाणारी ओल्या कच-याची विल्हेवाट, सोसायट्या - मोठ्या संस्था अशा मोठ्या प्रमाणात कचरा निर्माण होणा-या ठिकाणी घनकचरा प्रकल्प राबविणे अशा विविध बाबींकडे अधिक बारकाईने लक्ष देण्याचे सूचित करतानाच आपल्या शहरातील स्वच्छतेविषयी नागरिकांच्या मनातील प्रतिमा उंचाविण्याच्या दृष्टीने नागरिकांसोबत संवाद वाढविण्याचीही गरज असल्याचे आयुक्त श्री. राजेश नार्वेकर यांनी सांगितले.
नागरिकांकडून दाखविल्या जाणा-या त्रुटींबाबत तत्पर कार्यवाही करण्यासोबतच नागरिकांनी त्रुटी दाखविण्यापूर्वी त्या आपल्या नजरेस आल्या पाहिजेत अशी दृष्टी ठेवून क्षेत्रीय स्तरावर फिरावे असेही आयुक्तांनी अधिकारी, कर्मचारी यांना निर्देशित केले.
स्वच्छ सर्वेक्षणाच्या टुलकीट मध्ये असलेल्या प्रत्येक बाबींकडे अधिक बारकाईने लक्ष देण्याचे सूचित करतानाच आयुक्तांनी प्रत्येकाने आपल्या स्वच्छता विषयक कामाच्या जबाबदारीकडे अधिक गांभिर्याने पहावे असे निर्देश दिले.
घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपआयुक्त डॉ. बाबासाहेब राजळे यांनी सादरीकरणाव्दारे स्वच्छ सर्वेक्षण परीक्षणाच्या अनुषंगाने विविध बाबींविषयी सविस्तर माहिती दिली. याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त श्री. संजय काकडे, शहर अभियंता श्री. संजय देसाई तसेच इतर विभागप्रमुख, विभाग अधिकारी, कार्यकारी अभियंता, स्वच्छता अधिकारी तसेच संबंधित विभागातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
स्वच्छता ही नवी मुंबईची ओळख असून संपूर्ण राज्याच्या दृष्टीनेही नवी मुंबईचे स्वच्छतेतील राष्ट्रीय पातळीवरील स्थान महत्वाचे आहे. त्यामुळे आपल्या सर्वांची जबाबदारी वाढलेली आहे हे लक्षात घेत प्रत्येक घटकाने या क्षणापासूनच अधिक जोमाने व काळजीपूर्वक काम करावे आणि नागरिकांचा सहयोग घेत आपण केलेला देशातील पहिल्या नंबरच्या स्वच्छ शहराचा निश्चय साध्य करावा असे ध्येय आयुक्त श्री. राजेश नार्वेकर यांनी या विशेष आढावा बैठकीप्रसंगी महापालिका अधिकारी, कर्मचारीवृंदासमोर ठेवले.