*नमुंमपा कोपरखैरणे सीबीएससी शाळेत आयुक्त श्री. राजेश नार्वेकर यांच्या निर्देशानुसार तातडीने 6 शिक्षकांची उपलब्धता*
*शिक्षक नेमणुकीची पुढील कार्यवाही अधिक गतीमानतेने करण्याचे आयुक्तांचे निर्देश*
नवी मुंबई महानगरपालिकेच्या गुणवत्तापूर्ण शिक्षण व्हिजनमुळे दरवर्षी महानगरपालिकेच्या सर्व शाळांमध्ये पटसंख्येमध्ये लक्षणीय वाढ होताना दिसते. पालकांचा महानगरपालिकेच्या शिक्षण प्रणालीवर असलेला विश्वास लक्षात घेऊन नागरिकांच्या आणि लोकप्रतिनिधींच्या मागणीनुसार दि.19 सप्टेंबर 2017 रोजी महापालिका सर्वसाधारण सभेने घेतलेल्या निर्णयानुसार सन 2018 - 19 या शैक्षणिक वर्षापासून नेरूळ व कोपरखैरणे येथे प्रायोगिक तत्त्वावर सीबीएससी बोर्डाच्या शाळा सुरू करण्यात आलेल्या आहेत.
यापैकी सीवूड, नेरूळ येथील शाळा क्रमांक 93, सेक्टर 50, सीवूड या शाळेचे व्यवस्थापन आकांक्षा फाऊंडेशन यांच्या वतीने तर सेक्टर 11, कोपरखैरणे येथील शाळा क्रमांक 94 या शाळेचे व्यवस्थापन नवी मुंबई महानगरपालिका शिक्षण विभागामार्फत चालविण्यात येत आहे.
वास्तविकतः महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमानुसार प्राथमिक शिक्षण देण्याची जबाबदारी स्थानिक स्वराज्य संस्थांची आहे. तथापि नवी मुंबई महानगरपालिकेच्या शाळांमध्ये सर्वसाधारण घरातील मुले शिकत असल्याने त्यांना उत्तम दर्जाचे शिक्षण मिळावे या दृष्टीने नवी मुंबई महानगरपालिकेने माध्यमिक शिक्षण देण्यास देखील सुरुवात केलेली आहे. पुढे नागरिकांच्या मागणीनुसार सीबीएससी बोर्डाच्या दोन शाळा देखील प्रायोगिक तत्त्वावर सुरू केल्या आहेत.
नवी मुंबई महानगरपालिका शाळेतील गुणवत्तापूर्ण शिक्षणाचा दर्जा नेहमीच उंचावलेला राहिला असून महानगरपालिकेच्या शाळांकडे पालकांचा विशेष ओढा राहिलेला आहे. त्यामुळे महानगरपालिकेच्या सर्व शाळांमध्ये दरवर्षी पटसंख्येत लक्षणीय वाढ होत आहे. अशाच प्रकारची पटसंख्येतील वाढ सीबीएससी बोर्डाच्या या दोन्ही शाळांमध्ये दिसून येत असून प्रत्येक वर्षी टप्प्याटप्प्याने पुढची इयत्ता सुरू होत असल्याने या शाळांमध्ये आवश्यक प्रमाणात शिक्षक उपलब्ध करून देणेबाबत नवी मुंबई महानगरपालिका नियोजनबध्द पावले उचलत आहे.
सेक्टर 50, नेरूळ येथील शाळेतील शिक्षकांची नेमणूक आकांक्षा फाऊंडेशन यांच्या माध्यमातून करण्यात येत असून कोपरखैरणे येथील शाळा क्रमांक 94 मध्ये नवी मुंबई महानगरपालिका शिक्षण विभागामार्फत शिक्षक उपलब्ध करून दिले जातात.
*सद्यस्थितीत कोपरखैरणे सीबीएससी शाळेत पूर्व प्राथमिक विभागात 4 शिक्षक तसेच प्राथमिक विभागात 5 शिक्षक कार्यरत आहेत. दरवर्षी होणारी वर्गवाढ व वाढणारी पटसंख्या यामुळे शिक्षकांची आवश्यकता लक्षात घेऊन नवी मुंबई महानगरपालिका शिक्षण विभागाने बाह्ययंत्रणेद्वारे 99 शिक्षक उपलब्ध करून घेण्यासाठी गतवर्षीच सुरुवात करून 12 जुलै 2022 रोजी निविदा प्रसिद्ध केली होती.*
*सदर निविदेस प्रतिसाद न मिळाल्यामुळे 27 ऑक्टोबर 2022 रोजी फेरनिविदा प्रसिद्ध करण्यात आली व त्यासही प्रतिसाद न मिळाल्यामुळे 24 मार्च 2023 रोजी फेरनिविदा प्रसिद्ध करण्यात आली. या फेरनिविदेद्वारे 1 निविदा प्राप्त झाली व त्या निविदेचा ऑनलाइन तांत्रिक लिफाफा पूर्व मान्यतेने 24 मे 2023 रोजी उघडण्यात आलेला आहे. सदर निविदा प्रक्रिया सद्यस्थितीत कार्यप्रणालीत आहे.*
*तथापि कोपरखैरणे येथील शाळा क्रमांक 94 या शाळेमधील पालकांनी शाळेवर शिक्षक उपलब्ध न झाल्यामुळे आंदोलन केले व महानगरपालिकेच्या शिक्षण विभागामध्ये येऊन संबंधित अधिकारी यांची भेट घेतली. त्यावेळी शाळेवर तात्काळ शिक्षक उपलब्ध करून देण्याबाबत कार्यवाही करण्यात येईल असे त्यांना सूचित करण्यात आले.*
*सदर बाबीचे गांभीर्य लक्षात घेत नमुंमपा आयुक्त श्री. राजेश नार्वेकर यांनी शिक्षण विभागाची तातडीने बैठक घेत शिक्षक उपलब्धेबाबत त्वरित कार्यवाही करण्याचे निर्देश शिक्षण विभागास दिले त्यानुसार 6 शिक्षक उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. त्यासोबतच आयुक्तांनी निविदा प्रक्रिया कार्यवाही जलद पूर्ण करून आवश्यक शिक्षक शाळेवर उपलब्ध करून देण्याची कार्यवाही गतिमानतेने करावी असेही निर्देश दिलेले आहेत व त्यानुसार शिक्षण विभाग तत्पर कार्यवाही करीत आहे.*