प्रजासत्ताक दिनी सीवूड मॉलमध्ये फ्लॅश मॉब मधून देशभक्तीसह स्वच्छता संदेशाचे गीतनृत्यमय प्रसारण

                                                                     

 प्रजासत्ताक दिनी सीवूड मॉलमध्ये फ्लॅश मॉब मधून देशभक्तीसह स्वच्छता संदेशाचे गीतनृत्यमय प्रसारण



नवी मुंबई- ‘स्वच्छ सर्वेक्षण 2023’ अंतर्गत स्वच्छतेचा प्रचार, प्रसार करताना नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने नेहमीच नावीन्यपूर्ण संकल्पनांचा वापर केला जात असून प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून सीवूड नेरूळ येथील ग्रँड सेन्ट्रल मॉलमध्ये फ्लॅश मॉब सारखा वेगळा उपक्रम महापालिका आयुक्त श्री. राजेश नार्वेकर यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आला.

प्रजासत्ताक दिन म्हणजे सर्वांचा सुट्टीचा दिवस. सकाळी ध्वजारोहणास उपस्थित राहिले की संध्याकाळी कुटुंबियांना घेऊन शहरात विरंगुळा म्हणून फेरफटका मारत आनंद साजरा करण्याची लोकांची सवय. त्यामुळे सुट्टीच्या दिवशी मॉलमध्ये मोठ्या संख्येने नागरिक येत असतात हे लक्षात घेत नमुंमपा घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपआयुक्त डॉ. बाबासाहेब राजळे आणि त्यांच्या सहका-यांनी एखाद्या मोठ्या मॉलमध्ये फ्लॅश मॉब करण्याचे निश्चित केले. गीतनृत्याच्या अविष्कारातून कचरा वर्गीकरण आणि स्वच्छतेचा संदेश नागरिकांपर्यंत पोहचविण्याचे व्यवस्थित नियोजन करण्यात आले.  

त्यानुसार प्रजासत्ताक दिनी नेरुळ सीवूड येथील ग्रँड सेंट्रल मॉलमध्ये फ्लॅश मॉब करण्याचे ठरविण्यात आले. सायं. 7 वाजता मॉलमध्ये अचानक मोठ्याने संगीत वाजू लागले आणि मॉलमध्ये असलेल्या गर्दीला नेमके कळेना की काय सुरू आहे. बघता बघता मॉलच्या मधल्या मोठ्या पॅसेजमध्ये युवक-युवतींचा मोठा समुह एकेककरून पुढे आला आणि गीतसंगीताच्या तालावर बहारदार नृत्याविष्कार सुरू झाला. मॉलमध्ये ठिकठिकाणी विखुरलेल्या लोकांना राहवले नाही, ते त्या पॅसेजच्या भोवताली वर्तुळाकार उभे राहू लागले आणि लोकगीते, देशभक्तीपर गीते यासोबतच स्वच्छता गीतांनी मॉलचा माहौल बदलून टाकला. अगदी मॉलच्या दोन्ही मजल्यांवरील भव्य गॅलरीही लोकांनी भरून गेल्या.

नृत्याविष्कारामध्ये गाण्यांतून तसेच नृत्य सादरीकरणातून कचरा वर्गीकरणाचा संदेश प्रसारित करण्यात आला. कचरा डब्यांच्या मॅस्कॉट मधून स्वच्छता संदेशाचे प्रसारण झाले. तिरंगी कापडी पट्टे झळकावित नाचणा-या नृत्यसमुहाने रोमांच उभे केले. नृत्य कलावंतांचे आकर्षक टी शर्टही लक्ष वेधून घेत होते.  

स्वच्छ शाळेचा राष्ट्रीय पुरस्कार लाभलेल्या आंबेडकर नगर, रबाळे येथील राजर्षी छत्रपती शाहू महाराज विद्यालयाच्या 107 मुलामुलींनी विविध गाणी एकामागे एक जोडलेला धमाकेदार फ्लॅश मॉब करीत मॉलमधील उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले व स्वच्छ सर्वेक्षणाचा संगीतमय नृत्य प्रचार केला. त्यामुळे शेवटी कलावंतांनी सर्वेक्षणाचा फलक उंचावला तेव्हा नागरिकांनीही या कलावंतासमवेत ‘निश्चय केला, नंबर पहिला’ असा एकमुखाने गजर केला.    

Popular posts
वसाहती मधील रस्ते व गटराची कामे लवकर पूर्ण करा-शिवसेना जिल्हाप्रमुख रामदास शेवाळे यांनी घेतली पालिका आयुक्तांची भेट
Image
सिकेटी महाविद्यालयात माजी विद्यार्थी स्नेहसंमेलन संपन्न
Image
पनवेल तालुका पत्रकार विकास मंचाच्या ओळखपत्रांचे अनावरण ;शिर्डी अभ्यासदौऱ्यात नविन कार्यकारिणी सोबत सदस्यांनी घेतले श्री साईंचे आशिर्वाद
Image
आमदार प्रशांत ठाकूर यांचा मतांच्या आघाडीच्या संख्येत वृक्षारोपणाचा संकल्प;पांडवकडा येथे वृक्षारोपण करून शुभारंभ
Image
फसवे सोशल मीडिया ग्रुप्स आणि अनधिकृत गुंतवणूक योजनांबद्दल सतर्क रहा -एंजेल वनचे आवाहन
Image