गड व किल्ले जतन-संवर्धन व मार्गदर्शन कोकण विभागीय समिती सदस्यपदी उपअभियंता प्रवीण कदम यांची निवड
अलिबाग,दि.01 (जिमाका) :- छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रेरणादायी जीवनाची नवीन पिढीला ओळख करुन देण्यासाठी तसेच राज्यातील गड व किल्ल्यांचे जतन-संवर्धन करण्याच्या दृष्टीने योग्य मार्गदर्शन मिळण्यासाठी सांस्कृतिक कार्य मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाच्या दि.30 नोव्हेंबर 2022 च्या शासन निर्णयान्वये गड संवर्धन समितीची पुनर्स्थापना करण्यात आली आहे. या समितीत कोकण विभागीय समिती सदस्य म्हणून अलिबाग महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे उपअभियंता श्री. प्रवीण कदम यांची निवड करण्यात आली आहे.
गड व किल्ल्यांचे जतन-संवर्धनाच्या दृष्टीने मार्गदर्शन करण्याकरिता तत्कालीन सांस्कृतिक कार्य मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाच्या दि.30 मार्च 2015 च्या शासन निर्णयान्वये गड संवर्धन समिती स्थापन करण्यात आली होती. या गड संवर्धन समितीस दि.21 मे 2018 च्या शासन निर्णयान्वये मुदतवाढ देण्यात आली होती. तसेच दि.18 जानेवारी 2020 च्या शासन निर्णयान्वये या गड संवर्धन समितीवरील अशासकीय सदस्यांच्या नियुक्त्या रद्द करण्यात आल्या होत्या. आता या समितीची पुनर्स्थापना करण्यात आली आहे.