घेरावाडी येथे पनवेल प्रांताधिकारी राहुल मुंडकेंच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न
कातकरी उत्थान अभियानाच्या माध्यमातून आदिवासी बांधवांच्या सर्वांगीण विकासासाठी जिल्हा प्रशासन कटिबद्ध
अलिबाग, दि.17 (जिमाका):-* पनवेल तालुक्यातील घेरावाडी येथील आदिवासी बांधवांचे पुनर्वसन करण्यासाठी बुधवार, दि.16 नोव्हेंबर 2022 रोजी पनवेल प्रांताधिकारी राहुल मुंडके यांच्या अध्यक्षतेखाली व मंडळ अधिकारी प्रभाकर नाईक, मनोज मोरे, तलाठी कविता बळी आणि महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत बैठक आयोजित करण्यात आली.
या बैठकीस एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी श्री.सोलसकर, जिल्हा परिषद सदस्य ज्ञानेश्वर घरत, सामाजिक कार्यकर्ते संतोष ठाकूर, रत्नाकर घरत आदी उपस्थित होते.
प्रांताधिकारी श्री.मुंडके यांनी जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांनी कातकरी-आदिवासी बांधवांच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने कातकरी उत्थान अभियानांतर्गत सुरु केलेल्या “सप्तसूत्री” कार्यक्रमाची सविस्तर माहिती उपस्थितांना दिली. यावेळी त्यांनी पुनर्वसन करण्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व बाबी आदिवासी बांधवांना समजावून सांगितल्या. ही प्रक्रिया किचकट असून त्याला थोडा वेळही द्यावा लागेल हे देखील समजावून सांगितले. तसेच पुनर्वसन प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी आवश्यक असलेले जातीचे दाखले काढून पुढील आठवड्यात त्यांचे वाटप करण्यात येईल, असेही सांगितले.
पुनर्वसन प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी मंडळ अधिकारी, तलाठी यांना प्रशासकीय जबाबदाऱ्या निश्चित करण्यात आल्या आणि उरण सामाजिक संस्थेचे उपाध्यक्ष प्रा.राजेंद्र मढवी यांना आदिवासी बांधवांकडून पूर्तता करून घेण्याची जबाबदारी देण्यात आली.
यावेळी आदिवासी महिलांनी आपल्या रानातील फुलांपासून तयार केलेले पुष्पगुच्छ देवून मान्यवरांचे स्वागत केले.