“राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता..सेवा पंधरवडा”-नागरिकांच्या प्रलंबित अर्जांचा स्थानिक पातळीवर जलदगतीने निपटारा करण्यासाठी विशेष मोहीम
अलिबाग,दि.21 (जिमाका):- जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात दि.17 सप्टेंबर ते दि.02 ऑक्टोबर 2022 या कालावधीत “राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवडा” निमित्ताने आपले सरकार, नागरी सेवा केंद्र व इतर वेबपोर्टलवरील नागरिकांच्या प्रलंबित अर्जांचा स्थानिक पातळीवर जलदगतीने निपटारा करण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात येत आहे.
यामध्ये विविध विभागांच्या अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना नवीन शासन निर्णयानुसार मदत निधीचे वितरण, पंतप्रधान किसान सन्मान निधीचा प्रलंबित पात्र लाभार्थ्यांना लाभ, फेरफार नोंदीचा निपटार, शिधापत्रिकांचे वितरण, विवाह नोंदणी प्रमाणपत्र, मालमत्ता हस्तांतरण नोंद, नव्याने नळ जोडणी, मालमत्ता कराची आकारणी करणे व मागणी पत्र, प्रलंबित घरगुती विद्युत जोडणीस मंजूरी, मालमत्ता हस्तांतरणानंतर विद्युत जोडणीमध्ये नवीन मालमत्ताधारकांचे नाव, बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेंतर्गत सिंचन विहिरीकरिता अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांची ऑनलाईन नोंदणी, अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांना प्रलंबित वन हक्कपट्टे मंजूर करणे, दिव्यांगांना प्रमाणपत्र, नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र अशा चौदा सेवांचा प्रामुख्याने समावेश आहे.
तरी नागरिकांनी आपल्या नजिकच्या शासकीय कार्यालयाशी संपर्क साधून आपल्या प्रलंबित अर्जाचा निपटारा करुन घ्यावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.