सुयोग्य अहर्ता धारण करणारे 3 वाहनचालक झाले लिपिक-टंकलेखक
नवी मुंबई महानगरपालिका अधिकारी, कर्मचारी यांच्या मागील अनेक वर्षांपासून प्रलंबीत असलेल्या सेवाविषयक विविध बाबींवर महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी सातत्याने सकारात्मक निर्णय घेतले असून मे 2021 पासून एका वर्षात 467 इतक्या मोठ्या संख्येने कर्मचा-यांना आश्वासित प्रगती योजनेचा लाभ दिलेला आहे. त्याचप्रमाणे 292 अधिकारी, कर्मचारी यांना पदोन्नत्या देण्यात आलेल्या आहेत.
याचप्रमाणे आज संवर्ग बदलाचा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला असून वाहनचालक संवर्गातील 3 अहर्ता धारक वाहनचालकांना लिपिक-टंकलेखक संवर्गात बदलीने नियुक्ती देण्यात आलेली आहे.
नवी मुंबई महानगरपालिकेचा आकृतीबंध व सेवा प्रवेश नियमावली मंजूर झाली असून त्यामध्ये लिपिक -टंकलेखक पदाच्या संवर्गाकरिता वाहनचालकांतून किमान 3 वर्षांची सेवा पूर्ण झालेल्या तसेच आवश्यक शैक्षणिक व इतर अहर्ता धारकांना संवर्ग बदलाव्दारे 10% नियुक्ती देण्याची तरतूद आहे.
त्या अनुषंगाने नवी मुंबई महानगरपालिकेच्या प्रशासन विभागामार्फत विकल्प मागविण्यात आलेले होते. त्यामधील सर्व अहर्ता पूर्ण करणा-या 3 वाहनचालकांना लिपिक-टंकलेखक संवर्गात बदलीने नियुक्ती देण्याचे आदेश महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांच्या निर्देशानुसार प्रशासन विभागाने निर्गमित केलेले आहेत.
अशाप्रकारे शैक्षणिक पात्रता व अनुषांगिक अहर्ता धारण कऱणा-या वाहनचालकांना लिपिक-टंकलेखक पदावर नियुक्ती मिळाल्याने नमुंमपा वाहनचालकांकडून आनंद व्यक्त करण्यात येत आहे.