निसर्गाने मारले, शासनाने तारले..

 

निसर्गाने मारले, शासनाने तारले..



अलिबाग, दि.22 (जिमाका):- गेल्या वर्षी 2021 मध्ये जुलै महिन्याच्या 22 व 23 जुलै रोजी कोकणात झालेल्या अतिवृष्टीने सर्वच हवालदिल झाले होते. निसर्गाचा प्रकोप झाला की लहानमोठ्या सर्वांनाच त्या प्रलयाचा तडाखा बसतो.रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यातील तळीये हे सुमारे तेराशे लोकवस्तीचे गाव दरड कोसळून पूर्णतः नष्ट झाले. अतिवृष्टीमुळे मौजे तळीये येथील कोंडाळकरवाडी, बौद्धवाडी येथील 66 घरांवर दरड कोसळून जीवितहानी झाली. या गावात राहात असलेलेली 271 कुटुंब एकाच दिवसात बेघर झाली, 87 लोक मृत्युमुखी पडले आणि काही जखमी झाले. केवळ मनुष्यच नाही तर 59 पशुधन आणि 112 कोंबड्या हे देखील मृत्यूमुखी पडले.

      शासनाने या नैसर्गिक आपत्ती आणि अतिवृष्टीने बाधित झालेल्या लोकांना मदतीचा हात दिला आणि गृहनिर्माण विभागांतर्गत म्हाडाने या लोकांचा निवारा परत उभारण्यासाठी कार्य सुरु केले. तर जिल्हाधिकारी कार्यालयाने तात्पुरत्या निवारा शेडसाठी पुढाकार घेवून काही खासगी कंपन्यांच्या मदतीने तळीये येथील आपदग्रस्त कुटुंबांचे तात्पुरते पुनर्वसन करण्यात आले.

       यात मुंबईच्या नारडेको (Naredco) कंपनी कडून  15 कंटेनर प्राप्त झाले, JSW कंपनी डोलवी, ता.पेण- 01, लक्ष्मी ऑरगॅनिक इंडस्ट्रिज, महाड-4 टाटा स्टील BSL कंपनी खोपोली-1, ओलान कंपनी एमआयडीसी महाड-2, एम एम ए सी ई टी पी एमआयडीसी महाड-2, असे एकूण 26 कंटेनर प्राप्त झाले. याप्रमाणे कंटेनर होममध्ये तात्पुरते निवारा शेड तयार करण्यात आले. सामाजिक भान राखलेल्या या कंपन्यांच्या माध्यमातून तात्पुरता निवारा उभा राहिला.

*एकूण घरे व कुटुंब व लोकसंख्या:*

तळीये, कोंडाळकरवाडी व बौध्दवाडी व इतर पाच वाड्यांच्या घराचा तपशील असा आहे. कोंडाळकरवाडी व बौध्दवाडी येथे 66 घरांमधे 399 लोक राहतात मधली वाडी येथे 46 घरात 257 लोक, खालची वाडी येथे 86 घरात 370 लोक, शिंदेवाडी येथे 52 घरात 295,  कुंभनेवाडी येथे 11 घरात      11 कुटुंबात 62 लोक आणि चर्मकार वाडी येथे 10 घरात 57 लोक असे एकूण 271 घरात 271 कुटुंबाची 1 हजार 360 लोकसंख्या आहे.

*तात्पुरते पुनर्वसन:*

मौजे तळीये येथील बाधित घरांचे तात्पुरते पुनर्वसन म्हणून या बाधितांना एकूण 26 कंटेनर होम मूलभूत सुविधांसह उपलब्ध करुन दिले.

*कायमस्वरुपी पुनर्वसन:*

मौजे तळीये येथील थेट खरेदीने एकूण 15.23.99 हे.आर. भूसंपादन करण्यात आले असून 2.14.841 हे.आर. भूसंपादन सक्तीने करण्यात आले. असे एकूण 17.38.80 हे.आर. जागेचे भूसंपादन करण्यात आले.

तळीये येथील एकूण 271 घरांचे पुनर्वसन करायचे आहे. म्हाडाने येथील  सर्व्हे केल्यानंतर एकूण 231 घरांचा लेआऊट तयार करण्यात आला असून या ठिकाणी 40 घरांच्या पुनर्वसनासाठी कमी पडत असल्यामुळे एकूण 4.57.10 हे.आर. अतिरिक्त जागा म्हाडा कार्यालयास सुचविण्यात आली. त्यांचा कुटुंब सर्व्हे पूर्ण झाला आहे.

       मौजे तळीये येथील मूलभूत सोयीसुविधेचे कामकाज जिल्हा परिषद बांधकाम विभाग यांच्यामार्फत करण्यात येत आहे. तसेच मौजे तळीये येथील 66 घरांचे पुनर्वसन म्हाडा कडून प्राधान्याने करण्यात येत आहे.

म्हाडाकडून घराचे पुनर्वसन करण्यात येत आहे तर इतर सुविधा शासनाच्या इतर विभागाकडून पुरविण्यात येणार आहे.म्हाडातर्फे बांधून देण्यात येणारी घरे ही पक्की आणि कोणत्याही आपत्तीला तोंड देणारी असतील. या कामाला सुरुवात होत असून तळीयेवासियांचे लवकरच पुनर्वसन होणार आहे.

       आज या दुर्देवी घटनेला एक वर्ष पूर्ण झाले. यावेळी  तत्कालीन पालकमंत्री कु.आदिती तटकरे, आमदार भरत गोगावले, उपजिल्हाधिकारी सर्जेराव म्हस्के-पाटील, महाड प्रातांधिकारी प्रतिमा पुदलवाड, तहसिलदार सुरेश काशिद, उपविभागीय पोलीस अधिकारी निलेश तांबे, सरपंच श्री.संपत तांदळेकर, तळीये ग्रामस्थ, नातेवाईक या सर्वांनी तळीये येथील स्मृतीस्थळास भेट देवून पुष्प अर्पण करुन मृतात्म्यांना श्रध्दांजली वाहिली.     

      यावेळी आपल्या भावना व्यक्त करताना सरपंच श्री.संपत तांदळेकर, ग्रामस्थ विजय पांडे यांनी शासनाने  आतापर्यंत केलेल्या मदतीबद्दल आभार तसेच तळीयेवासियांच्या पुनर्वसन कामासाठी शासन व प्रशासनाकडून आतापर्यंत झालेल्या आणि पुढे होत असलेल्या कार्यवाहीबाबत समाधान व्यक्त केले. 

      या सर्व गोष्टी साध्य होण्यासाठी आणि तळीयेवासियांचे पुनर्वसन शक्य तितक्या लवकर पूर्ण होण्यासाठी जिल्ह्याच्या तत्कालीन पालकमंत्री कु.आदिती तटकरे, आमदार भरत गोगावले, तत्कालीन जिल्हाधिकारी श्रीमती निधी चौधरी, सध्याचे जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर, अपर जिल्हाधिकारी अमोल यादव, महाड प्रातांधिकारी प्रतिमा पुदलवाड, तहसिलदार सुरेश काशिद, त्याचप्रमाणे उपविभागीय पोलीस अधिकारी निलेश तांबे, सरपंच श्री.संपत तांदळेकर, तळीये ग्रामस्थ, नातेवाईक या सर्वांच्या सामूहिक प्रयत्नांना लवकरच यश मिळेल, यात शंका नाही.

   


Popular posts
वसाहती मधील रस्ते व गटराची कामे लवकर पूर्ण करा-शिवसेना जिल्हाप्रमुख रामदास शेवाळे यांनी घेतली पालिका आयुक्तांची भेट
Image
सिकेटी महाविद्यालयात माजी विद्यार्थी स्नेहसंमेलन संपन्न
Image
पनवेल तालुका पत्रकार विकास मंचाच्या ओळखपत्रांचे अनावरण ;शिर्डी अभ्यासदौऱ्यात नविन कार्यकारिणी सोबत सदस्यांनी घेतले श्री साईंचे आशिर्वाद
Image
आमदार प्रशांत ठाकूर यांचा मतांच्या आघाडीच्या संख्येत वृक्षारोपणाचा संकल्प;पांडवकडा येथे वृक्षारोपण करून शुभारंभ
Image
फसवे सोशल मीडिया ग्रुप्स आणि अनधिकृत गुंतवणूक योजनांबद्दल सतर्क रहा -एंजेल वनचे आवाहन
Image