सिडकोच्या हेटवणे पाणी पुरवठा योजनेद्वारे अतिरिक्त 30 एमएलडी पाणी उपलब्ध झाल्याने खारघर, तळोजा, द्रोणागिरी, उलवे येथील पाणी पुरवठा सुरळीत

सिडकोच्या हेटवणे पाणी पुरवठा योजनेद्वारे अतिरिक्त 30 एमएलडी पाणी उपलब्ध झाल्याने खारघर, तळोजा, द्रोणागिरी, उलवे येथील पाणी पुरवठा सुरळीत 


सिडकोच्या हेटवणे पाणी पुरवठा योजनेतील दाब विमोचकाचे  (प्रेशर कंड्युट) काम पूर्ण झाल्याने हेटवणे पाणी पुरवठा योजनेद्वारे नवी मुंबईला अतिरिक्त 30 एमएलडी पाणी पुरवठा करणे शक्य झाले आहे. यामुळे सिडको अधिकारक्षेत्रातील नोड्सना होणारा पाणी पुरवठा सुरळीत झाला आहे. 

“सिडकोद्वारे पाणी पुरवठा करण्यात येणाऱ्या नोड्सचा पाणी पुरवठा सुरळीत व्हावा याकरिता सिडकोकडून विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. सिडकोने 15 दिवसांच्या विक्रमी कालावधीत दाब विमोचकाचे काम युद्धपातळीवर पूर्ण केल्याने हेटवणे धरणातून तातडीने अतिरिक्त 30 एमएलडी पाणी साठा उपलब्ध झाला आहे. यामुळे सिडको अधिकार क्षेत्रातील नोडमधील पाणी पुरवठा सुरळीत झाल्याने तेथील नागरिकांना निश्चितच दिलासा मिळाला आहे. याशिवाय नवी मुंबई महानगरपालिका, एमआयडीसी व महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांच्याशी पाणी प्रश्नावर उपाययोजना करण्यासाठी सातत्याने चर्चा सुरू आहेत.”

डॉ. संजय मुखर्जी

उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक, सिडको   

नवी मुंबईतील सिडको अधिकारक्षेत्रातील खारघर, उलवे, तळोजा, द्रोणागिरी, जेएनपीटी बंदर, दिघोडे एमआयडीसी या परिसरास सिडकोकडून पाणी पुरवठा करण्यात येतो. दक्षिण नवी मुंबईमध्ये सिडकोतर्फे साकारण्यात येत असलेले विकास प्रकल्प आणि महागृहनिर्माण योजना, यांमुळे दक्षिण नवी मुंबईतील या नोडना वास्तव्यासाठी नागरिकांकडून प्राधान्य देण्यात येत आहे. या नोडमधील वाढत्या लोकसंख्येमुळे पाण्याची मागणीही दिवसेंदिवस वाढत आहे. 

सिडको अधिकारक्षेत्रातील नोड्सना हेटवणे धरण, नवी मुंबई महानगरपालिकेचे मोरबे धरण, मजीप्राची पाताळगंगा आणि न्हावा-शेवा योजना आणि एमआयडीसीचे बारवी धरण, या जलस्रोतांद्वारे पाणी पुरवठा करण्यात येतो. सिडको अधिकारक्षेत्रातील पाण्याची मागणी 289 एमएलडी आहे. परंतु प्रत्यक्षात  सिडकोला  या विविध स्रोतांद्वारे 259 एमएलडी पाणी उपलब्ध होत असून 30 एमएलडीचा तुटवडा भासत आहे. वर्तमानातील तसेच भविष्यातील पाण्याची वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी सिडकोतर्फे विविध लघु आणि दीर्घकालीन योजना राबविण्यात येत आहेत. 

सिडकोकरिता पाणी पुरवठ्याचा सर्वांत महत्त्वाचा स्रोत असणाऱ्या हेटवणे पाणी पुरवठा योजनेद्वारे 150 एमएलडी पाणी उपलब्ध होते. राज्य शासनाच्या जलसंपदा विभागातर्फे, हेटवणे योजनेतून अतिरिक्त 120 एमएलडी पाण्याचा साठा सिडकोसाठी मंजूर करण्यात आला आहे. हा अतिरिक्त 120 एमएलडी पाणी साठा वापरता यावा याकरिता हेटवणे योजनेचे 270 एमएलडीपर्यंत आवर्धन करणे आवश्यक आहे. याकरिता 5 वर्षांचा कालावधी अपेक्षित आहे. परंतु, सध्या भासत असलेली पाण्याची तूट भरून काढण्यासाठी हेटवणे पाणी पुरवठा योजनेतील उपलब्ध पाणी साठ्याचा, जलस्रोताचा आणि नुकत्याच पूर्ण करण्यात आलेल्या भूमिगत जलवाहिनीचा पूर्णांशाने वापर करण्याबाबतच्या तसेच सद्यस्थितीतील पाणी पुरवठा पायाभूत सुविधांबाबतच्या शक्यतांचा शोध घेण्याकरिता मे. टाटा कन्सल्टिंग इंजिनिअर्स लि. (टीसीई) यांची तज्ज्ञ सल्लागार म्हणून सिडकोतर्फे नियुक्ती करण्यात आली. हेटवणे योजनेतून तातडीने पाण्याचा कमाल उपसा करण्यासाठी जलावर्धन योजनेचा आराखडा तयार करण्याचे काम टीसीईला सोपविण्यात आले आहे.

टीसीईकडून हेटवणे योजनेतून अतिरिक्त 30 एमएलडी पाण्याचा तातडीने उपसा करता यावा याकरिता सध्याच्या खुल्या प्रणाली निर्गमाऐवजी बंद दाब विमोचकाची शिफारस करण्यात आली. त्यानुसार, हेटवणे योजनेच्या सिंचन कालवा उर्जा निर्गम (आयसीपीओ) आणि सिडको पाणी पुरवठा व्यवस्थेला दाब विमोचकाद्वारे जोडण्याचा निर्णय सिडकोकडून घेण्यात आला आहे. याकरिताचे संकल्पन (डिझाईन) सिडकोकडून तयार करण्यात येऊन त्यास केंद्रीय संकल्पन संस्था, नाशिक आणि जलसंपदा विभाग, महाराष्ट्र शासन यांची मंजुरी प्राप्त झाली. केवळ 15 दिवसांच्या विक्रमी कालावधीत दाब विमोचकाचे काम सिडकोकडून पूर्ण करण्यात येऊन 6 जून 2022 पासून दाब विमोचक कार्यान्वित झाला आहे. यामुळे हेटवणे पाणी पुरवठा योजनेतून अतिरिक्त 30 एमएलडी पाण्याचा उपसा करणे शक्य झाले आहे. 

अतिरिक्त 30 एमएलडी पाणी साठा उपलब्ध झाल्याने खारघर, उलवे, तळोजा, द्रोणागिरी, जेएनपीटी बंदर, दिघोडे एमआयडीसीला करण्यात येणारा पाणी पुरवठा सुरळीत होण्यास मदत झाली आहे.

Popular posts
वसाहती मधील रस्ते व गटराची कामे लवकर पूर्ण करा-शिवसेना जिल्हाप्रमुख रामदास शेवाळे यांनी घेतली पालिका आयुक्तांची भेट
Image
पनवेल तालुका पत्रकार विकास मंचाच्या ओळखपत्रांचे अनावरण ;शिर्डी अभ्यासदौऱ्यात नविन कार्यकारिणी सोबत सदस्यांनी घेतले श्री साईंचे आशिर्वाद
Image
सिकेटी महाविद्यालयात माजी विद्यार्थी स्नेहसंमेलन संपन्न
Image
शिक्षक-विद्यार्थ्यांच्या जुन्या आठवणींना उजाळा;माजी विद्यार्थ्यांची १८ वर्षांनी पुन्हा भरली ‘शाळा’
Image
आमदार प्रशांत ठाकूर यांचा मतांच्या आघाडीच्या संख्येत वृक्षारोपणाचा संकल्प;पांडवकडा येथे वृक्षारोपण करून शुभारंभ
Image