माथाडी कामगार युनियनचे संयुक्त सरचिटणीस पोपटराव रामचंद्र देशमुख यांना डॉ. बापूजी साळुंखे कृतज्ञता पुरस्कार प्रदान

माथाडी कामगार युनियनचे संयुक्त सरचिटणीस पोपटराव रामचंद्र देशमुख यांना डॉ. बापूजी साळुंखे कृतज्ञता पुरस्कार प्रदान


तळमावले, दि. 4 :- काकासाहेब चव्हाण कॉलेजचे माजी विद्यार्थी आणि माथाडी कामगारांचे आराध्यदेवत स्व. आमदार अण्णासाहेब पाटील यांनी स्थापन केलेल्या महाराष्ट्र राज्य माथाडी, ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियनचे संयुक्त सरचिटणीस व जनसंपर्क अधिकारी पोपटराव रामचंद्र देशमुख यांना काकासाहेब चव्हाण कॉलेज माजी विद्यार्थी मंडळातर्फे दि. १ मे रोजी तळमावले याठिकाणी काकासाहेब चव्हाण कॉलेजच्या माजी विद्यार्थी मेळाव्यात *"शिक्षण महर्षी परमपूज्य डॉ. बापूजी साळुंखे कृतज्ञता पुरस्कार"* प्रदान करण्यात आला. या मेळाव्याच्या *अध्यक्षस्थानी मा. प्राचार्य पी.यु.शेठ तर प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे कार्याध्यक्ष मा. प्राचार्य अभयकुमार साळुंखे* आदी मान्यवर उपस्थित होते.

    पोपटराव रामचंद्र देशमुख हे मोजे भोंसगांव, ता. पाटण, जिल्हा-सातारा या गांवचे रहिवाशी असून, त्यांनी काकासाहेब चव्हाण महाविद्यालय, तळगावले याठिकाणी उच्च शिक्षण घेतले, ज्या कॉलेजमधून उच्च शिक्षणाची शिदोरी घेऊन ते मुंबईमध्ये माथाडी कामगाराचा मुलगा म्हणून टंकलेखक/लिपिक पदापासून ते संयुक्त सरचिटणीस व जनसंपर्क अधिकारी पदापर्यंत महाराष्ट्र राज्य माथाडी, ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियनमध्ये सेवा करीत आहेत, ज्या कॉलेजमध्ये उच्च शिक्षण घेतले त्याच कॉलेजमध्ये त्यांना कामगार क्षेत्रातून महाराष्ट्र व कामगार दिनादिवशी "शिक्षणमहर्षी परमपूज्य डॉ. बापूजी साळुंखे कृतज्ञता" पुरस्कार प्रदान करण्यात आला.

      मुंबईसारख्या धनीकाच्या नगरीमध्ये *स्व. आमदार अण्णासाहेब पाटील यांनी ऐतिहासिक माथाडी कामगार चळवळ उभी केली, माथाडी कामगार व त्यांच्या कुटुंबियांच्या जीवनाला स्थैर्य प्राप्त करून दिले. त्यांनी आशिया खंडातील अभेद्य अशी महाराष्ट्र राज्य माथाडी, ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियन स्थापन केली, त्या युनियनचे सक्षम व खंबीरपणे माजी आमदार नरेंद्र अण्णासाहेब पाटील व कार्याध्यक्ष आमदार शशिकांत शिंदे करीत आहेत,* या संघटनेत टंकलेखक व लिपिक ते संयुक्त सरचिटणीस व जनसंपर्क अधिकारी पदापर्यंत काम करीत असताना श्री. पोपटराव देशमुख यांना *"माथाडी भूषण"* पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले आहे. त्यांच्या कामाच्या कौशल्याची पोहच म्हणून त्यांचा अनेकवेळा मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते माथाडी कामगारांच्या भव्य मेळाव्यामध्ये सत्कार करण्यात आला आहे. परंतु कामगार क्षेत्रातील कार्याबद्दल आज काकासाहेब चव्हाण कॉलेज माजी विद्यार्थी मंडळाच्यावतिने सन्मान होतोय, तेही पाटण तालुक्यातील मंदुळकोळे या खेड्यामध्ये जन्म घेतलेल्या माथाडी कामगारांचे आराध्यदेवत स्व. आमदार अण्णासाहेब पाटील यांनी स्थापन केलेल्या ऐतिहासिक माथाडी कामगार चळवळीतील कार्याबद्दल आणि याच पाटण तालुक्यातील रामपूर या खेड्यामध्ये जन्म घेतलेल्या शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे यांच्या नांवाने कृतज्ञता पुरस्काराने ही एक विशेष बाब आणि माझे मोठे भाग्य असल्याची प्रतिक्रिया पोपटराव देशमुख यांनी दिली आहे.

       "ज्ञान, विज्ञान आणि सुसंस्कार यासाठी शिक्षण प्रसार" हे शिक्षणमहर्षी परमपूज्य डॉ.बापूजी साळुंखे यांचे ब्रिद वाक्य आहे. स्वामी विवेकानंद संस्थेच्या महाविद्यालयातून अनेक विद्यार्थी घडले, काकासाहेब चव्हाण कॉलेज माजी विद्यार्थी मंडळातर्फे याच माजी विद्यार्थ्यांचा दरवर्षी मेळावा घेऊन त्यांना सन्मानीत करण्याची प्रथा चालू ठेवलेली आहे, त्याबद्दल मी कॉलेजच्या सर्व प्रमुख आजी-माजी पदाधिकारी, प्राचार्य, प्राध्यापक यांना व विशेषतः काकासाहेब चव्हाण कॉलेज माजी विद्यार्थी मंडळाचे अध्यक्ष राजाभाऊ माने, सचिव अधिकराव कणसे आणि सर्व कार्यकारीणी मंडळाचे अभिनंदन केले आहे. तसेच शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे कृतज्ञता पुरस्कार देऊन  सन्मानीत केल्याबद्दल सर्वांचे आभार व्यक्त केले आहे. राजाभाऊ माने यांच्या नेतृत्वाखालील सर्व टिम माजी विद्यार्थ्यांचा मेळावा प्राचार्य, प्राध्यापक व मान्यवरांच्या उपस्थित हा अत्यंत उल्लेखनिय असा उपक्रम राबवित आहेत, त्यांना आमच्याकडून नेहमीच सहकार्य राहिल, अशीही प्रतिक्रया व्यक्त केली आहे.