महाराष्ट्र दिन व कामगार दिनाच्या निमित्ताने कामगारांच्या शुभ हस्ते खुल्या व्यायाम शाळेचे उद्घाटन करत नगरसेविका नेत्रा किरण पाटील यांनी घातला आदर्श
खारघर(प्रतिनिधी) : पनवेल महानगरपालिकेच्या कर्तव्यदक्ष नगरसेविका सौ.नेत्रा किरण पाटील यांनी प्रभागातील नागरिकांचे आरोग्य उत्तम राहावे व त्यांनी रोज व्यायाम करावा या दृष्टिकोनातून आपल्या नगरसेवक निधीतून प्रभाग क्रमांक ४ मधील सेक्टर १९ प्लॉट नंबर ४३ या नक्षत्र उद्यानात आपल्या नगरसेवक निधीतून खुल्या व्यायाम शाळेचे (ओपन जिम) साहित्य बसविले.महाराष्ट्र दिनाचे व कामगार दिनाचे औचित्य साधत त्याचे उद्घाटन आज सदर उद्यानात काम करणारे कामगार विष्णू पांडे यांच्या शुभहस्ते श्रीफळ फोडून करण्यात आले. त्याचबरोबर सदर उद्यानात सायकलिंग व इतर अनेक व्यायामाचे साहित्य उपलब्ध करून देण्यात आलेले आहे. त्याचे उद्घाटन प्रभागातील निहारिका या दहावीत शिकणाऱ्या व सायकलींगची आवड असणाऱ्या जिने नुकतेच सायकलने खारघर ते हैदराबाद हे अंतर पूर्ण केले होते,त्या निहारिकाच्या हस्ते केले. सदर उद्घाटनप्रसंगी खारघर तळोजा मंडल भाजप अध्यक्ष ब्रिजेश पटेल उपाध्यक्ष दिलीप जाधव, ज्येष्ठ नागरिक सी.के.सहा, दत्तात्रय जोशी, दिलीप इंगरूळकर, प्रदीप इनामदार, ईश्वर पटेल, ज्ञानेश्वर खारपुरीया, शिवम सिंग, भरत कोंडाळकर, संदीप एकबोटे, शेखरसिंग चौहान, मनोज सिन्हऻ, सचिन शहा, दीपक दाभोळकर, पृथ्वीराज पाटील, शिवाजी चौवरे, सुशील दुगड, सौ मंजू चोप्रा, डॉ. पूजा घोडके , सोनाली कवडेकर, उर्मिला गुप्ता, स्मिता आचार्य, प्रीती सोनार, कुणाल देवकर, वैभव शेजवळ यासह अनेक सोसायटीतील पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते.
नगरसेविका नेत्रा किरण पाटील यांनी उपस्थित रहिवाशांना आरोग्याचे महत्व सांगत व्यायाम किती महत्त्वाचा आहे हे देखील पटवून दिले. कोरोना काळात अनेक जणांना संसर्गजन्य आजार झाला नाही किंवा काहींना त्याचा संसर्ग झाला तरी त्यांची रोगप्रतिकारक शक्ती चांगली असल्याकारणाने त्यांच्या जीवितास कुठलीही हानी झाली नाही. त्यामुळे आरोग्यम् धनसंपदा असे त्यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले.
प्रभागातील ज्येष्ठ नागरिक असलेले व भाभा अणुऊर्जा आयोगातून सेवानिवृत्त झालेले दत्तात्रय जोशी यांनी कधीही काहीही अडचण आल्यास नेत्रा व किरण या दांम्पत्याला फोन केला असता ते कधीही रागावत नाहीत व प्रत्येक प्रश्न समस्या पूर्णत्वास नेण्यास ते प्रयत्न करत असतात असे सांगितले. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नवीन खरे यांनी केले व श्री किरण पाटील यांनीउपस्थितांचे आभार मानले.