केंद्र सरकारने लादलेल्या महागाई विरोधात पनवेलमध्ये महाविकास आघाडीचा महामोर्चा
पनवेल - उरणमधील दिग्गज नेत्यांच्या कष्टाची कदर नागरिकांनी घेतली
केंद्र सरकारच्या महागाईविरोधात पनवेल - उरण महाविकास आघाडी आक्रमक
पंतप्रधान नरेंद्र मोदींची महागाईच्या जुमल्याविरोधात सुदाम पाटील यांनी केली नक्कल
केंद्र सरकारविरोधात नागरिकांची जोरदार घोषणाबाजी; पोलीस बंदोबस्त तैनात
पनवेल (प्रतिनिधी)-पनवेल - उरण महाविकास आघाडीतर्फे केंद्र सरकारच्या वाढत्या महागाई विरोधात जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला. पनवेल एस.टी.स्टॅन्ड येथून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून मोर्चाची सुरुवात करण्यात आली. त्यानंतर लाइन आळीमार्गे छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून सदर मोर्चा टपाल नाकामार्गे कापड बाजार आणि महानगरपालिका असा प्रांत कार्यलयासमोर जाऊन धडकला.
यावेळी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. दिवसेंदिवस पेट्रोल, डिझेल, गॅस, इंधनांचे दर गगनाला भिडले आहेत. केंद्र सरकारच्या तपास यंत्रणांचा सतत गैरवापर, भाजपच्या नेत्यांचा भ्रष्टाचार, बैंक घोटाळा, विक्रांत घोटाळा आदी विषयांबाबत महाविकास आघाडीतर्फे केंद्र सरकारच्या नियोजनशून्य कारभाराचा जाहीर निषेध करण्यात आला. दरम्यान बाळाराम पाटील आणि प्रीतम म्हात्रे यांच्याहस्ते दुचाकी आणि गॅस सिलेंडरला लिंबू मिरचीचा हार घालून केंद्र सरकारच्या निर्बुद्धीची नजर उतरवण्यात आली. तसेच केंद्र सरकारच्या विरोधात नागरिकांनी जोरदार घोषणाबाजी करत हजारोंच्या संख्येने उपस्थिती दर्शविली.
यावेळी पनवेल-उरण महाविकास आघाडीचे अध्यक्ष बबनदादा पाटील, आमदार बाळाराम पाटील, राष्ट्रवादीचे सरचिटणीस तथा महाविकास आघाडीचे सचिव सुदाम पाटील, माजी आमदार मनोहर भोईर, पनवेल जिल्हाप्रमुख शिरीष घरत, काँग्रेसचे रायगड जिल्हा अध्यक्ष महेंद्र घरत, जेष्ठ नेते जी.आर.पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रशांत पाटील, सतीश पाटील, जे एम म्हात्रे, समाजवादी पार्टीचे जिल्हाध्यक्ष अनिल नाईक, शिवसेना पनवेल तालुका संपर्क प्रमुख योगेश तांडेल, शेकापचे विधानसभा अध्यक्ष काशीनाथ पाटील, महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे, नगरसेवक गणेश कडू, रामदास पाटील, रामदास शेवाळे आदींसह महाविकास आघाडीचे नेते आणि हजारो कार्यकर्त्यांच्या प्रमुख उपस्थिती मोर्चा पडला.
यावेळी वरील सर्व नेत्यांच्या नेतृत्वाखाली पनवेल - उरण मधील कार्यकर्त्यांनी भाजपच्या जुलमी कारभाराचा निषेध नोंदविला. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदींची महागाईच्या जुमल्याविरोधात सुदाम पाटील यांनी केलेली नक्कल कार्यकर्त्यांना हत्तीचं बळ देऊन गेली. बाळाराम पाटील यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांसमोर तसेच कार्यकर्त्यांसमोर भाजपचा खरपूस समाचार घेताना सांगितले की, आपण आज आलो आहोत ते केवळ आणि केवळ भाजपचे लचके तोडण्यासाठी आलो आहोत, आणि आता ही वेळ आली आहे की, पनवेलमधील भाजप पक्षाचे लचके तोडण्यासाठी तयारीला लागा, असे बोलून त्यांनी उपस्थित नागरिकांचा आत्मविश्वास वाढविला.