नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने प्रबोधन केले जाईल हेल्मेट सक्ती होणार नाही-राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत

नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने प्रबोधन केले जाईल  हेल्मेट सक्ती होणार नाही-राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत


रत्नागिरी दि.२(जिमाका)- पुणे पॅटर्न प्रमाणे रत्नागिरी जिल्ह्यातही नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून हेल्मेट वापरा संबंधित प्रबोधन केले जाईल मात्र हेल्मेट सक्ती केली जाणार नाही अशा सूचना राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा सिंधुदूर्ग जिल्हयाचे पालकमंत्री उदय सामंत यांनी रत्नागिरीतील हेल्मेट सक्तीबाबत शासकीय विश्रामगृह, रत्नागिरी येथे संबंधित अधिकाऱ्यांसोबत घेतलेल्या बैठकीत आज दिल्या.

या बैठकीस रत्नागिरीचे जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी सुशांत खांडेकर,  प्रांत विकास सूर्यवंशी, आरटीओचे अधिकारी, तहसिलदार शशिकांत जाधव,   रत्नागिरी जिल्ह्यातील पत्रकार उपस्थित होते.

हेल्मेट सक्ती बाबत बोलत असताना उदय सामंत म्हणाले की, रत्नागिरी जिल्ह्यात हेल्मेट वापरा संबंधि प्रशासनाने नागरिकांना प्रबोधन करणे आवश्यक आहे. प्रशासनाने हेल्मेट सक्ती करू नये. हायवे सारख्या ठिकाणी जोखमीच्या रस्त्यावर प्रत्येकाने हेल्मेट वापरणे गरजेचे आहे. महामार्गावर अपघाताचे प्रमाण जास्त आहेत अशा वेळेस हेल्मेट सक्ती मान्य आहे. परंतु स्थानिक ठिकाणी हेल्मेट सक्ती करू नये.

पुण्याप्रमाणे राज्यातील इतर जिल्ह्यांमध्ये ही हेल्मेट सक्ती होऊ नये.  हेल्मेट सक्ती बाबत घेण्यात आलेला आजचा निर्णय संघटनात्मक निर्णय नसून, मंत्री म्हणून दिलेल्या सूचना आणि आदेश आहेत. या आदेशांचे पालन प्रशासनामार्फत होईल अशी  अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली.