स्वराली, स्वरांजली जाधवच्या वैद्यकीय उपचारांसाठी कांतीलाल प्रतिष्ठानचे 'छुमंतर'
शनिवारी, 26 मार्चला रात्री 8:30 वाजता आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात 'प्रयोग'
पनवेल:
प्रख्यात नाट्यलेखक प्रा. वसंत कानेटकर लिखित 'छुमंतर' या विनोदी नाटकाच्या व्यावसायिक रंगभूमीवरील प्रयोगाचे आयोजन कांतीलाल प्रतिष्ठान रायगडने केले आहे. कारणही तसेच आहे. अगदी कोवळ्या वयात दुर्धर आजाराने चौक येथील जुळ्या बहिणींना गाठले असल्याने त्यांच्या वैद्यकीय उपचारासाठी लाखमोलाची मदत व्हावी या हेतूने ओंजळ पसरली आहे. खालापूर तालुक्यातील चौक येथील अमित जाधव यांच्या दोन गोंडस जुळ्या लेकी बोन मैरो (अस्थी मज्जा) सारख्या दुर्धर आजाराशी झुंज देत आहेत. मुंबईतील नामांकित हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर प्राथमिक उपचार, तपासणी सुरु आहेत. काही महत्वाच्या शस्त्रक्रियेचा आर्थिक भार 37 लाखाच्या घरात असल्याने अमित जाधव यांचे हात तोकडे पडत आहेत. त्यांनी जवळच्या आणि सामाजिक कार्यकर्त्यांना आर्थिक मदतीचे आवाहन केले आहे. ज्याच्या त्याच्या परीने जो तो सहकार्य करेल असे दिसत आहे.
यासंदर्भात छत्रपती संभाजी महाराज मालिकेतील सह कलाकार देवेंद्र सरदार आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी छुमंतर नाटकाच्या प्रयोगातून मिळणारी बिदागी स्वराली आणि स्वरांजलीच्या वैद्यकीय उपचारासाठी दान करण्याचा यज्ञ मांडला आहे. तसे त्यांनी प्रयत्न सुरु केले आहेत.
या नाटकाचा एक प्रयोग कांतीलाल प्रतिष्ठान या नावाजलेल्या सांस्कृतिक क्षेत्रातील संस्थेने करावा आणि मिळणारी रक्कम 'त्या' दोघींच्या श्वासासाठी द्यावी, असा प्रस्ताव देवेंद्र सरदार, हृषीकेश पिंगळे आणि सामाजिक कार्यकर्ते सुधीर सोमवंशी (पनवेल) यांनी मांडला.
कांतीलाल कडू यांनी स्वराली आणि स्वरांजली जाधव यांच्यासाठी लगेचच नाटकाच्या प्रयोगाचे आयोजन केले आहे.
शनिवारी, (ता. 26) रात्री 8:30 वाजता या नाटकाच्या प्रयोगाचे आयोजन पनवेलला आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात केले आहे. त्याची तिकिटे नाट्यगृहात तसेच पनवेल संघर्ष समितीच्या कार्यालयात उपलब्ध असतील. तिकीट रक्कम 1000/-, 500/-, 300 आणि 200 रुपये ठेवण्यात आले आहे. तिकीट विक्रीतून येणारी सर्व रक्कम नाटकाच्या मध्यंतरी स्वराली व स्वरांजलीच्या कुटुंबियांकडे नाट्यरसिकांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात येईल.
त्या दोघींच्या श्वासासाठी त्यांच्या आई- वडिलांनी लढा पुकारला आहे. त्यांच्या लढ्यात नाट्य तिकीट खरेदी करा आणि आशीर्वाद देण्यासाठी उपस्थित राहून सहकार्य करा, असे आवाहन सामाजिक कार्यकर्ते कांतीलाल कडू यांनी केले आहे.
या नाटकात प्रमुख कलाकार म्हणून देवेंद्र सरदार, सचिन पोळेकर, हृषीकेश पिंगळे, हृषीकेश घाग,साहिल परब, प्रमोद कार्ले, दर्शना कुलकर्णी सरदार, स्नेहल तटकरे, स्नेहा पाटील आदींचा सहभाग असणार आहे.