"जाणून सह्याद्रीचे अंतरंग, कराया दरडीशी सामना… घुमू द्या आवाज, न्यूटन जागवा दरडी थोपवा" हा संदेश सह्याद्रीच्या कानाकोपऱ्यात घुमला पाहिजे- प्रा.डॉ.सतीश ठिगळे
दरडी थोपविण्याकरिता करावयाच्या उपाययोजनांबाबत जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे प्रा.डॉ.सतीश ठिगळे यांच्या मार्गदर्शन वेबिनारचे आयोजन
अलिबाग, दि.01, (जिमाका):-आजही सह्याद्रीतील शेकडो वाड्यावस्त्यांमधील नागरिक भूस्खलनाच्या छायेखाली वावरत आहे. म्हणून "जाणून सह्याद्रीचे अंतरंग, कराया दरडीशी सामना, घुमू द्या आवाज, न्यूटन जागवा दरडी थोपवा" हा संदेश सह्याद्रीच्या कानाकोपऱ्यात घुमला पाहिजे. एवढेच नव्हे तर समतोल ढळलेल्या डोंगर उतारांचे प्रत्यक्ष सर्वेक्षण करून निरीक्षणे नोंदण्यास नवीन पिढीला प्रवृत्त करून शास्त्रीय दृष्टी दिली पाहिजे, त्यांना दरड साक्षर केले पाहिजे, असे आवाहन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील भूशास्त्र विषयाचे निवृत्त प्राध्यापक डॉ.सतीश ठिगळे यांनी काल (दि.31 जानेवारी) रोजी जिल्हाधिकारी कार्यालय येथे केले.
1983 सालापासून 40 वर्षे दरडींसंदर्भात संशोधन करीत असलेले भूशास्त्र विषयाचे निवृत्त प्राध्यापक डॉ.सतीश ठिगळे यांच्या “दरडी थोपविण्याकरिता करावयाच्या उपाययोजना” या विषयावरील वेबिनारचे आयोजन जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांच्या पुढाकारातून करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते.
या वेबिनारच्या वेळी निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.पद्मश्री बैनाडे, रोहा उपवनसंरक्षक आप्पासाहेब निकत, महाराष्ट्र रिमोट सेन्सिंग ॲप्लिकेशन्स सेंटरचे डॉ.संजय पाटील, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी श्री.सागर पाठक, सर्व उपविभागीय अधिकारी, सर्व तहसिलदार आदी उपस्थित होते.
यावेळी प्रा.डॉ.सतीश ठिगळे म्हणाले की, सह्याद्रीत दरडी अचानक कोसळत नाहीत. त्यांची लक्षणे दरड कोसळण्याच्या काही वर्षे, काही महिने, काही दिवस एवढेच नव्हे तर काही तास ही आधीच स्पष्ट दिसू लागतात. ती दिसू लागताच गावकऱ्यांनी संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी सज्ज व्हायला पाहिजे. हा संदेश सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात पोहोचविण्यासाठी / घुमविण्यासाठी "न्यूटन जागवा दरडी थोपवा" हे पुस्तक मी लिहिले आहे.
ते पुढे म्हणाले की, 11 डिसेंबर 1967 रोजी झालेल्या कोयना भूकंपात रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांमधील अनेक डोंगर उतारांवर तडे पडले होते. जून 1983 साली झालेल्या अतिवृष्टीमध्ये 56 ठिकाणी दरडी घसरल्या त्या नेमक्या त्याच जागी जिथे भूकंपात तडे जाऊन डोंगर उतार अस्थिर झाले होते. याचाच अर्थ अस्थिर झालेले डोंगर उतार कसण्यास पंधरा वर्षांहून अधिक काळ लागला. अशीच दुसरी घटना महाड तालुक्यातील जुई येथे 2005 साली घडलेली. या गावात एका गावकऱ्याने गुरे चरायला नेताना सकाळीच डोंगराचा काही भाग खचलेला आणि झाडे कललेली पाहिली. संध्याकाळी परत येताना त्याला हा भाग अधिकच खचलेला दिसला. घाबऱ्या आवाजात असल्याने गावकऱ्यांना ही घटना सांगितली. तेव्हा रात्र झाली आहे, उद्या सकाळी तलाठ्याला कळवू असे सर्वांनी ठरविले. मात्र दुर्दैवाने अर्ध्या तासातच दरड कोसळली आणि 97 व्यक्तींनी दुसऱ्या दिवशीचा सूर्योदय पाहिलाच नाही. या दोन घटनांचा अर्थ असा की, पहिल्या घटनेत दरडी कोसळण्याची पूर्वचिन्हे पंधरा वर्षे आधी दिसून आली होती तर दुसऱ्या घटनेत दरड घसरण्याआधी ती उघड्या डोळ्यांनी दिसत होती.
या घटना कशा थांबाव्यात याविषयी बोलताना ते पुढे म्हणाले की, सन 1983 पासून आजपर्यंतच्या सातत्याच्या संशोधनात्मक निरीक्षणातून, आपद्ग्रस्तांशी साधलेल्या संवादातून, स्पर्शलेल्या संवेदनांतून आणि राबविलेल्या जनजागरण मोहिमेतून, का, कोठे, केव्हा, कशा कोसळतात दरडी? यासंबंधीच्या निष्कर्षापर्यंत मला पोहोचता आले. दरडी कोसळण्याची नैसर्गिक आणि मानवनिर्मित अशी दोन कारणे आहेत. प्रतिकूल भूपर्यावरण आणि भूकंप प्रवणता ही नैसर्गिक कारणे आहेत. तर डोंगर उतारांवर गावठाणाचा विस्तार करताना चर खणणे, जमीन सपाट करणे, घरे बांधणी, जंगलतोड तसेच पर्वतराजीतून रस्ते, लोहमार्ग किंवा बोगदे खोदणे आणि त्यामुळे डोंगर उतार समतोलाकडून असमतोलाकडे वाटचाल करू लागणे, ही मानवनिर्मित कारणे आहेत.
वाढत्या लोकसंख्येबरोबर मानवी हस्तक्षेप वाढत आहे. वाड्याची गावठाणे, गावठाणांची शहरे तर शहरांची महानगरे होत आहेत. औद्योगिकरणाच्या प्रक्रियेत पर्यावरणाची अमर्याद हानी होत आहे. त्यामुळे अस्थिर झालेल्या डोंगर उतारावरील गावठाणांच्या परिसरात तसेच घाट रस्त्यांवर अतिवृष्टी होत असताना दरडी कोसळताना दिसतात.
*कशा कोसळतात दरडी?*
डोंगर उतारांवर कमी-अधिक जाडीचा माती मुरूमाचा सच्छिद्र थर आणि त्याखाली असच्छिद्र अशा कठीण खडकाचा थर आढळतो. पावसाळ्यात सच्छिद्र थरातून पाणी झिरपून ते असच्छिद्र खडकांपर्यंत पोहोचते. या थरांच्या सांध्यातून ते उताराकडे वाहू लागते आणि अखेरीस पायथ्याशी असणाऱ्या झाडांमधून परत भूपृष्ठावर अवतरते. पावसाळ्यात हा सांधा निसरडा होतो. अशा ठिकाणी दरडी घसरण्याची शक्यता असते.
डोंगर उतारांना तडे जाणे व भूभाग खचू लागणे, त्यामुळे भिंतींना भेगा पडणे, घरांची पडझड होणे, झाडे, विद्युत खांब कलणे तसेच झरे रुंदावणे, त्यांच्यातून मोठ्या प्रमाणात गढूळ पाणी बाहेर पडणे, भूजलाच्या तापमानात वाढ होणे ही दरडी कोसळण्यापूर्वीची लक्षणे आहेत. दरडींची अशी लक्षणे म्हणजे निसर्ग वाजवीत असलेली धोक्याची घंटाच असते. अशा लक्षणांचे गांभीर्य लक्षात न आल्यामुळे गेल्या तीन दशकात सह्याद्रीच्या कुशीत वसलेली भाजे, जुई, माळीन आणि अलीकडे तळीये ही गावे नकाशावरून पुसली गेली हे लक्षात घ्यायला हवे. अशा दुर्घटना टाळण्यासाठी तीन आवश्यक निष्कर्ष लक्षात घेतले पाहिजेत. 1. सह्याद्री परिसरात दरडी अचानक नाही तर संथ गतीने घसरल्या. त्यांची लक्षणे काही वर्षे, काही महिने, काही दिवस एवढेच नव्हे तर काही तासही आधी अधिक स्पष्ट दिसू लागली होती. 2. त्या घसरल्या अतिवृष्टी दरम्यान आणि जेथे मानवी अतिक्रमणाचा अतिरेक झाला आहे तेथे. म्हणजेच डोंगरी भागातील घाट आणि लोहमार्गावर आणि गावठाणांवर, वाड्या-वस्त्यांवर. या दरडी इतरत्र का नाही घसरल्या याचे उत्तर न्यूटनच्या "क्रिया बल व प्रतिक्रिया बल परिमाणे समान असतात परंतु त्यांच्या दिशा परस्पर विरोधी असतात" या गतीसंबंधीच्या तिसऱ्या नियमात सामावलेले आहे. डोंगर उतार असमतोल करणारे मानवी अतिक्रमण ही झाली क्रिया आणि त्यामुळे समतोल ढळून दरडी कोसळणे, ही निसर्गाची प्रतिक्रिया हे लक्षात घेणे आवश्यक आहे. अशी प्रतिक्रिया टाळण्यासाठी गावठाणांचा आणि वाड्यांचा विस्तार न करणे, नवीन घरे न बांधणे, डोंगर उतारावर सपाटीकरण न करणे, रस्ते बांधताना काळजी घेणे, चर न खणणे, झऱ्यांच्या क्षेत्रात बदल न करणे अशी काळजी घेणे आवश्यक आहे.
दरड समस्येच्या संदर्भात बोलताना प्रा.डॉ.ठिगळे पुढे म्हणाले की, आणखी दोन गोष्टींकडे आपण लक्ष दिले पाहिजे. त्यापैकी पहिली समस्या कायमस्वरूपी पुनर्वसनाची आणि दुसरी सक्षम मनुष्यबळाच्या कमतरतेची. निरीक्षणातून निष्कर्षापर्यंत पोहोचण्याच्या प्रवासात आपद्ग्रस्तांना दिर्घकाळ व्यापणाऱ्या पुनर्वसनाच्या समस्येची जाणीव मला तीव्रतेने झाली. सह्याद्री पर्वतराजीतील शेकडो गावठाणे, वाड्या-वस्त्या भूस्खलनाच्या शक्यतेमुळे भीतीच्या छायेत वावरत आहेत हे एक सत्य आहे. त्याचबरोबर या सर्वांचे पुनर्वसन करणे अशक्य आहे हे त्याच्याहून दाहक सत्य आहे. कायमस्वरूपी पुनर्वसनाच्या अशा मर्यादा लक्षात घेता धोकादायक परिसरात तात्पुरत्या स्थलांतराचा विचार रुजला पाहिजे.
अतिवृष्टी दरम्यान तात्पुरत्या स्थलांतरासाठी सुरक्षित जागी शेड्स उभारल्या पाहिजेत, दरडींची लक्षणे स्पष्ट दिसत असताना दरड कोसळण्याच्या निर्णायक क्षणी घर सोडून कोठे जायचे याचे उत्तर असल्याशिवाय दरडग्रस्त घरातून बाहेर पडणार नाहीत हे लक्षात घेतले पाहिजे. दरडीच्या लक्षणांची चाहूल लागताच न घाबरता धैर्याने तात्पुरत्या स्थलांतरासाठी सज्ज होण्यासाठी प्रशिक्षण आणि त्याचबरोबर आपदग्रस्तांची मानसिक तयारी होणे आवश्यक आहे. त्यासाठी गावठाणात धोक्याची सूचना देणारी यंत्रणा उभी करणे, मौल्यवान वस्तू आणि महत्वाची कागदपत्रे यांची जुळणी करून ठेवणे, धोक्याची घंटा वाजताच वृद्ध आणि आजारी माणसे, बालके तसेच जनावरे यांना कसे हलवायचे यांची आखणी करणे आणि धोक्याचा इशारा मिळताच न गोंधळता, धैर्याने, वेळ न दवडता शिस्तीत स्थलांतर करणे याचे प्रयोजन करावयास पाहिजे असे सांगून त्यासाठी निरीक्षण पथक, सूचना पथक, विमोचन पथक अशी कामाची विभागणी करायला पाहिजे, त्याचबरोबर सक्षम मनुष्यबळाची वानवा दूर करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. डोंगर घसरतात पण त्यातून आपद्ग्रस्तांसाठी दुःखाबरोबरच सामाजिक, आर्थिक, मानसिक समस्यांचे पर्वत उभे राहतात हे विसरता कामा नये. त्यांचे निराकरण करण्यासाठी आवश्यक असे संवेदनशील मनुष्यबळ मात्र अभावानेच आढळते. म्हणून सक्षम मनुष्यबळाची पुनर्बांधणीही व्हायला हवी. त्यासाठी केवळ आणि केवळ शासनावर अवलंबून राहण्याची मानसिकतादेखील दूर केली पाहिजे, असेही ते शेवटी म्हणाले.
यावेळी महाराष्ट्र रिमोट सेन्सिंग ॲप्लिकेशन्स सेंटरचे डॉ.संजय पाटील यांनी महाराष्ट्र रिमोट सेन्सिंग ॲप्लिकेशन्स सेंटरच्या माध्यमातून दरड प्रवण क्षेत्रासाठी केल्या जाणाऱ्या विविध कार्यवाहीची थोडक्यात माहिती दिली.
या वेबिनारची प्रस्तावना व आभार प्रदर्शन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी श्री.सागर पाठक यांनी केले.