शेतकऱ्यांचे पूर्ण समाधान झाल्याशिवाय भूसंपादन करू नका; अन्यथा तीव्र आंदोलन- आमदार प्रशांत ठाकूर यांचा शासनाला इशारा
पनवेल(प्रतिनिधी) शेतकऱ्यांचे पूर्ण समाधान झाल्याशिवाय विरार-अलिबाग मल्टी मॉडेल कॉरिडॉरसाठी निताळे, वावंजे, नितळस या गावांमधील जमिनीची मोजणी करू नये, अशी मागणी भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी पनवेलचे विभागीय अधिकारी यांच्याकडे केली आहे, तसेच जबरदस्तीने जमीन संपादित केल्यास शासनाला संघर्षाला सामोरे जावे लागेल, असा गर्भित इशाराही त्यांनी दिला आहे.
या संदर्भात विभागीय अधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे की, विरार-अलिबाग मल्टी मॉडेल कॉरिडॉरसाठी (MMC) पनवेल तालुक्यातील मौजे निताळे, वावंजे, नितळस या गावांमधील शेतकऱ्यांच्या जमीनी संपादित करण्याची प्रक्रिया सुरू झाल्याचे समजते. परंतू या प्रकल्पासाठी संपादित करावयाच्या जमिनीच्या मोबदल्यात किती रक्कम / काय भाव निश्चित करण्यात आला आहे, याबाबत शेतकऱ्यांना अद्याप कळविण्यात आलेले नाही. जमिन संपादनाच्या प्रक्रियेनुसार मोजणीचे काम सुरू केले आहे. मोबदला निश्चित न करता शासनाकडून जबरदस्तीने होणारी मोजणी प्रक्रिया यामुळे शेतकऱ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण होऊन असंतोष पसरला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी जमिन मोजणी प्रक्रियेला विरोध दर्शविला आहे. त्यामुळे जमिन संपादनाचा मोबदला तसेच इतर गोष्टींसंदर्भात निर्णय घेतल्यानंतरच जमिन संपादनाची प्रक्रिया सुरू करण्यात यावी, असे न झाल्यास नाईलाजास्तव शेतकऱ्यांच्या न्याय्य हक्कासाठी भारतीय जनता पार्टीच्या वतीने आंदोलन करण्याशिवाय पर्याय राहणार नाही. तरी शेतकऱ्यांचे पूर्ण समाधान झाल्याशिवाय विरार-अलिबाग मल्टी मॉडेल कॉरिडॉरसाठी (MMC) मौजे निताळे, वावंजे, नितळस या गावांमधील संपादित करण्यात येणाऱ्या जमिनींची मोजणी पूर्णपणे थांबवावी अन्यथा शासनास संघर्षाला सामोरे जावे लागेल, असेही आमदार प्रशांत ठाकूर यांनी निवेदनातून अधोरेखित केले आहे.