सर्वसामान्यांच्या हक्काच्या घरांचे स्वप्न पूर्ण करण्याकरिता सिडकोचे योगदान मोलाचे - श्री. एकनाथ शिंदे
"सिडकोचे गृहनिर्माणातील सातत्य हे वाखणण्याजोगे असून सर्वसामान्य नागरिकांचे हक्काच्या घराचे स्वप्न पूर्ण करण्याकरिता सिडकोने दिलेले योगदान मोलाचे आहे", असे उद्गार श्री. एकनाथ शिंदे, मंत्री, नगरविकास, तथा पालकमंत्री, ठाणे यांनी काढले. सिडको महामंडळाच्या 5,730 घरांच्या गृहनिर्माण योजनेकरिता, प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला व्हिडिओद्वारे आपला सदिच्छा संदेश देताना त्यांनी हे उद्गार काढले.
सिडको महामंडळाच्या 5,730 घरांच्या गृहनिर्माण योजनेस 73 व्या प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून 26 जानेवारी 2022 रोजी प्रारंभ करण्यात आला. या योजनेच्या ऑनलाइन अर्ज नोंदणीस 26 जानेवारी 2022 पासून सुरुवात झाली आहे. या योजने अंतर्गत नवी मुंबईतील तळोजा नोडमध्ये आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक आणि सर्वसाधारण प्रवर्गातील नागरिकांकरिता 5,730 घरे (सदनिका) उपलब्ध करून देण्यात आली आहेत.
दर्जेदार बांधकाम, किफायतशीर दर आणि पारदर्शक ऑनलाइन प्रक्रिया यांमुळे सिडकोच्या गृहनिर्माण योजना लोकप्रिय ठरत असल्याचेही श्री. एकनाथ शिंदे यांनी आपल्या संदेशामध्ये म्हटले आहे.
डॉ. संजय मुखर्जी, उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक, सिडको यांनी या योजनेविषयी माहिती देताना नवी मुंबईतील वेगाने विकसित होत असलेल्या आणि उत्तम कनेक्टिव्हिटी लाभलेल्या तळोजा नोडमध्ये परवडणाऱ्या दरातील 5,730 घरे उपलब्ध करून देत असल्याचे सांगून अधिकाधिक नागरिकांनी या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन केले आहे. प्रजासत्ताक दिनानिमित्त आज सिडको भवन येथे डॉ. संजय मुखर्जी, यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. श्री. अश्विन मुद्गल, सहव्यवस्थापकीय संचालक, सिडको, डॉ. कैलास शिंदे, सहव्यवस्थापकीय संचालक, सिडको तसेच सिडकोचे विभागप्रमुख व अधिकारीदेखील या वेळी उपस्थित होते.
या योजने अंतर्गत उपलब्ध करून देण्यात आलेल्या 5,730 घरांपैकी 1,524 घरे ही प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकासाठी आणि उर्वरित 4,206 घरे ही सर्वसाधारण प्रवर्गासाठी उपलब्ध आहेत. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील अर्जदार हे प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत रु. 2.5 लाख अनुदानासाठी पात्र आहेत.
सदर योजनेच्या सर्व प्रक्रिया या पारदर्शक अशा ऑनलाइन पद्धतीने पार पडणार असून त्याकरिता https://lottery.cidcoindia.com हे संकेतस्थळ उपलब्ध करून देण्यात आले आहे. या योजनेकरिता 26 जानेवारी 2022 ते 24 फेब्रुवारी 2022 या मुदतीत अर्ज नोंदणी करता येणार आहे. ऑनलाइन अर्ज 27 जानेवारी 2022 ते 25 फेब्रुवारी 2022 या कालावधीत सादर करता येणार आहेत. तर ऑनलाइन अनामत रकमेचा भरणा करण्याकरिता 27 जानेवारी 2022 ते 25 फेब्रुवारी 2022 अशी मुदत देण्यात आली आहे. योजनेची संगणकीय सोडत 11 मार्च 2022 रोजी पार पडणार आहे. योजनेशी संबंधित पात्रता निकष, घरांचा तपशील, वेळापत्रक इ. सविस्तर माहिती उपरोक्त संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
तळोजा नोड नवी मुंबईतील वेगाने विकसित होणार नोड आहे. मुंबई-पुणे महामार्ग, रेल्वे आणि सिडकोचा मेट्रो प्रकल्प, यांमुळे या नोडला उत्तम कनेक्टिव्हिटी लाभली आहे. मेट्रोचे आगार तळोजा येथे असून मेट्रो मार्गेही हा नोड सीबीडी बेलापूरला जोडला जाणार आहे. या नोडमधील काही क्षेत्र हे शाळा, पदवी महाविद्यालये, प्रार्थनास्थळे, रुग्णालये, समाजकेंद्रे, वसतिगृहे इ. सामाजिक उद्देशांकरिता राखीव आहे. मेट्रो रेल्वेच्या स्थानकांलगत वाणिज्यिक उपक्रमांकरिता काही क्षेत्र हे सिडकोकडून निश्चित करण्यात आले आहे. यामुळे तळोजा नोडमध्ये मोठ्या प्रमाणावर वाणिज्यिक संधी निर्माण होणार आहेत. परवडणाऱ्या दरातील घरे, कनेक्टिव्हिटी, रोजगार, वाणिज्यिक प्रकल्प यांमुळे तळोजा नोड हा नवी मुंबईतील वास्तव्यासाठी सर्वोत्तम पर्याय ठरणार आहे.