सातारा येथील कॉलेजमध्ये 'लोकनेते रामशेठ ठाकूर' सभागृह; डॉ. अनिल पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते झाले उदघाटन
पनवेल(प्रतिनिधी) सातारा येथे रयत शिक्षण संस्थेच्या इस्माईलसाहेब मुल्ला लॉ कॉलेजमध्ये कर्तृत्व, नेतृत्व आणि दातृत्व असलेले 'लोकनेते रामशेठ ठाकूर' यांच्या नावाने सभागृह उभारण्यात आले असून या सभागृहाचे उद्घाटन आज (दि. १७) मोठ्या उत्साहात संपन्न झाले.
रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन डॉ. अनिल पाटील यांच्या अध्यक्षतेखाली, संस्थेचे सल्लागार ऍड. दिलावर मुल्ला यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या सोहळ्यात संस्थेच्या मॅनेजिंग कौन्सिलचे सदस्य माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते 'लोकनेते रामशेठ ठाकूर सभागृह' चे उद्घाटन करून कॉलेजमधील विद्यार्थी व शिक्षकांसाठी समर्पित करण्यात आले. यावेळी संस्थेचे सचिव डॉ. विठ्ठल शिवणकर, इस्माईलसाहेब मुल्ला लॉ कॉलेजच्या प्राचार्या डॉ. सुजाता पवार रयत सेवक उपस्थित होते.
शंभरातून एखादाच शूरवीर मनुष्य जन्मतो, हजारातून एखादाच विद्वान मनुष्य, उत्कृष्ट वक्ता दहा हजारांतून एखादा जन्मतो. परंतु दातृत्वाची संवेदना असणारा दाता हा क्वचितच पाहायला मिळतो. असेच एक दाता, दानशूर व्यक्तिमत्त्व लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या रूपाने लाभला आहे. . शाहू, फुले, आंबेडकर, यांच्या विचाराची प्रेरणा घेऊन ते पद्मभूषण कर्मवीर भाऊराव पाटील यांचा शिक्षण वारसा घेऊन काम करीत आहेत. त्यामुळे रयत शिक्षण संस्थेच्या सर्वांगीण विकासासाठी
सतत लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे योगदान महत्वपूर्ण ठरले आणि त्यामुळे रयत शिक्षण संस्थेच्या जबाबदारीचे कर्तव्य भावनेत रूपांतर करून त्यांनी रयत शिक्षण संस्थेच्या पनवेल, नवी मुंबई व रायगड आणि राज्यातील इतर अनेक शाखा सोयीसुविधा युक्त करण्यासाठी पुढाकार घेतला. आपल्या सेवाभावी वृत्तीचे सदोदित दर्शन घडवत रयतेचे शैक्षणिक काम म्हणजे कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या विचाराचे काम आहे असे समजून सदैव त्यात झोकून देवून शैक्षणिक प्रगतीची दारे त्यांनी सर्वांना खुली केली. मानवता सेवा आणि स्वावलंबनाचे बाळकडू सातारा येथील शिवाजी कॉलेज येथे शिकताना 'कमवा आणि शिका' या योजनेत त्यांना मिळाले होते. आणि त्याचा त्यांना कधीही विसर पडला नाही. त्यामुळे रयतेच्या सेवेसाठी आपले सर्वस्व अर्पण करणारे लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या नावाने सातारा येथील रयत शिक्षण संस्थेच्या इस्माईलसाहेब मुल्ला लॉ कॉलेजमध्ये सभागृह उभारण्यात आले आहे.
चौकट-
लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे समाजाप्रती कार्य अफाट आहे. रयत शिक्षण संस्थेच्या विकासाच्या उपक्रमात त्यांचा नेहमी हातभार असतो. त्यामुळे लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या नावाने रयत शिक्षण संस्थेच्या सातारा येथील छत्रपती शिवाजी कॉलेज येथे 'लोकनेते रामशेठ ठाकूर भवन' साकारले आहे. लवकरच या भवनाचे लोकार्पण होणार आहे.