अभिनेता सलमान खानला चावला साप
रात्री 3 वाजता एमजीएम हॉस्पिटलमध्ये केले होते दाखल
उपचारानंतर सकाळी 9 वाजता सोडले; सलमान खानची प्रकृती उत्तम
संजय कदम पनवेल
सुप्रसिद्ध अभिनेता सलमान खान हे नेहमीच चर्चेत राहणारे व्यक्तीमत्व आहे. दरवर्षी २७ डिसेम्बरला त्याचा वाढदिवस तो आपल्या कुटूंबीय व मित्र परिवारासह पनवेल तालुक्यातील वाजेपुर येथे त्याच्या मालकीचे असलेले अर्पिता फार्म हाऊसमध्ये साजरा करतो. वाढदिवसाच्या तयारी निमित्त सलमान खान आपल्या फार्म हाऊसवर काही दिवस अगोदर ठाण मांडून असतो. यंदाही सलमान खान हा नुकताच आपल्या फार्म हाऊसवर राहण्यासाठी आला होता. दुर्दैवाने शनिवारी रात्री त्याला सर्पदंश झाल्याने एकच धावपळ उडाली. सलमान खानला त्याच्या कुटूंबीय व सुरक्षा रक्षकांनी तातडीने पहाटे ३ वाजता कामोठे येथील एमजीएम हॉस्पिटलमध्ये दाखल केले. त्याच्यावर प्राथमिक उपचार करण्यासाठी डॉक्टर व कर्मचाऱ्यांचा भला मोठा ताफा तैनात करण्यात आला. सकाळी ९ वाजता सलमान खानला घरी सोडण्यात आले. सलमान खान यांची प्रकृती उत्तम असून त्यांच्या चाहत्यांनी कोणतीही काळजी करू नये अशी माहिती निकटवर्तीयांनी दिली आहे.