जागतिक पातळीवरील पुरस्कार महाराष्ट्राला देण्यात आला ही विरोधकांना एक चपराक - ना.सुभाष देसाई
नवीन पनवेल शहर शिवसेना जनसंपर्क कार्यालयाचे ना.सुभाष देसाईंच्या हस्ते भव्य उद्घाटन
पनवेल : प्रतिनिधी
नवीन पनवेल शहर शिवसेना शाखेचा भव्य उद्घाटन सोहळा गुरुवारी सायंकाळी ०६ वाजता शिवसेना नेते व संपर्क नेते कोंकण विभाग तथा उद्योग व खनिकर्म मंत्री (महाराष्ट्र राज्य) ना.सुभाष देसाई यांच्या हस्ते तर मावळ लोकसभा खासदार श्रीरंग आप्पा बारणे, रायगड जिल्हाप्रमुख शिरीष घरत, जिल्हा सल्लागार बबनदादा पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. सदर कार्यक्रमाचे आयोजन शिवसेनेचे पनवेल तालुका संपर्क प्रमुख योगेश तांडेल आणि उपमहानगर प्रमुख-पनवेल/नवीन पनवेल यतीन देशमुख यांनी केले आहे. यावेळी बहुजन समाज पार्टीचे पनवेल तालुकाध्यक्ष शंकर सोनवले यांच्यासह १०० पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेचे शिवबंधन मनगटावर बांधले.
यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना रायगड जिल्ह्याचे सल्लागार बबनदादा पाटील यांनी सांगितले की, सुभाष देसाई यांनी शिवसेनेच्या मराठी भाषेला न्याय देण्यासाठी विशेष लढा आपल्या जबाबदारीतून त्यांनी दिला आहे आणि मराठी भाषेला न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. आमच्या मुख्यमंत्र्यांचं नाव संपूर्ण देशात गाजतय आणि त्याच कौतुक दस्तुरखुद्द सुप्रीम कोर्टाने केले आहे. आयोजकांनी यावेळी ज्या समस्या मांडल्या त्या पनवेलच्या जनतेच्या हिताच्या आहेत, आणि या विषयावर आपण पक्षाचे ज्येष्ठ नेते म्हणून सुभाष देसाई यांनाही यामध्ये लक्ष घालण्याची विनंती त्यांनी केली. तसेच आज महाविकास आघाडी सरकारने येथील शेतकऱ्यांच्या हितासाठी अनेक निर्णय घेतले आहेत. नगरविकास मंत्र्यांनी महापालिका क्षेत्रातील नागरिकांचा मालमत्ता कर घेवू नका असे आदेश दिले. असेही त्यांनी सांगितले.
शिवसेनेचे रायगड जिल्हाप्रमुख शिरीष घरत यांनी सांगितले की, एमआयडीसी परिसरातील गावांचा पाण्याचा प्रश्न ऐरणीवर आहे. लोकांची कामे करणारे शिवसैनिक आम्ही आहोत. पनवेल महानगरपालिकेने उद्यानांवर कोटींच्या घरात टेंडर काढत आहेत. आणि आपल्या ठेकेदारांचे भले करून मनमानी करत आहेत. शिवसेना शाखा उद्घाटन सोहळ्यावर बोलताना त्यांनी सांगितले की, आज शिवसेनेची शाखा उद्घाटन सुरू झाली नाही तर ते मंदिर आहे. आणि जनतेने या मंदिरात आपल्या अडचणी सांगितल्यानंतर त्या मंदिरातील पुजाऱ्याने त्या अडचणी सोडविण्यासाठीचे हे मंदिर जनतेनेच असणार आहे.
मावळचे खासदार श्रीरंग ऊर्फ आप्पा बारणे यांनी आपल्या भाषणात सांगितले. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोना काळात केलेलं काम उल्लेखनीय आहे. पनवेल शहरातील महापालिकेने मालमत्ता कराला जाचक स्वरूप दिलं आहे. मात्र महाविकास आघाडीच्या सरकारने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी झालेल्या पाठपुरावा आणि परिस्थितीचा आधार घेत पालिका आयुक्तांना चुकीच्या कार्यपद्धतीबाबत सुनावले आहे. यावेळी पनवेल तालुका संपर्क प्रमुख योगेश तांडेल आणि उप महानगरप्रमुख यतीन देशमुख यांनी शिवसेनेची केलेली बांधणी नक्कीच कौतुकास्पद आहे आणि शिवसेनेत आल्यानंतर त्यांना मिळालेला सन्मानपूर्वक जिव्हाळा हाच बाळासाहेबांच्या शिवसेनेचे हे कुटुंब आहे.
यावेळी मार्गदर्शन करताना आणि पनवेलमधील आयोजकांनी मांडलेल्या प्रश्नांचे समाधान करताना त्यांनी सांगितले की, राज्याचे मुख्यमंत्री हे अन्याय सहन करणारे मुख्यमंत्री बिलकुल नाहीत, तर त्यांचे नेतृत्व आणि त्या नेतृत्वाचे कौतुक अनेक ठिकाणांहून करण्यात आले. ही बाब एक महाराष्ट्र वासिय म्हणून आपल्याला अभिमानास्पद आहे. पनवेलमधील पाण्याचा प्रश्न, मालमत्ता कर या प्रश्नांचे निराकरण करण्यासाठी मी प्रयत्नशील राहणार आहेच पण त्याहून अधिक प्रयत्नशील हे स्वतः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे राहतात. WHO या संस्थेच्या माध्यमातून उद्धव ठाकरे सरकारचे विशेष अभिनंदन करून जागतिक पातळीवरील पुरस्कार महाराष्ट्राला देण्यात आला ही विरोधकांना एक चपराक असणार आहे. येणाऱ्या काळात बाळासाहेब ठाकरे रोजगार मेळावा आखला जाणार असून त्याच्यासोबत मुख्यमंत्री स्वयंरोजगार योजना देखील आखली जाणार आहे. रोजगार तर मिळावा पण रोजगार देणारे म्हणून उदयास या असे या योजनेचे द्योतक असणार आहे. येणाऱ्या सर्व काळामध्ये महाराष्ट्र कधी थांबलाच नाही आणि यापुढेही कधीही थांबणार नाही, असेही त्यांनी सांगून आपले प्रेरणादायी मार्गदर्शन केले.