आझादी का अमृत महोत्सव उपक्रमांतर्गत युवकांसाठी "डेली लाईफ स्टाईल फिटनेस व डाएट" विषयावर चर्चासत्र व मार्गदर्शन कार्यक्रम संपन्न

                                      

आझादी का अमृत महोत्सव उपक्रमांतर्गत युवकांसाठी "डेली लाईफ स्टाईल फिटनेस व डाएट" विषयावर चर्चासत्र व मार्गदर्शन कार्यक्रम संपन्न


 *अलिबाग,जि.रायगड,दि.25 (जिमाका):-* भारताच्या स्वातंत्र्याला 75 वर्ष पूर्ण झाल्याचे औचित्य साधून स्वातंत्र्य दिनाचे संस्मरण म्हणून संपूर्ण देशात “आझादी का अमृत महोत्सव” साजरा होत असून त्यामध्ये देशाच्या करोडो लोकांची ऊर्जा जोडली जात असतानाच  देशभरात विविध उपक्रम राबविले जात आहेत.

       त्याचाच एक भाग म्हणून क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य-पुणे, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय रायगड व प्रिझम सामाजिक विकास संस्था अलिबाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आझादी का अमृत महोत्सव उपक्रमांर्तगत स्पर्धा विश्व अकॅडमी मधील युवा-युवती, खेळाडूंना डेली लाइफस्टाइल, फिटनेस अँड डाएट या विषयावर तज्ज्ञ मार्गदर्शकांमार्फत मार्गदर्शन देण्यात आले.

          यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून अलिबाग येथील ॲड.दत्ता पाटील लॉ कॉलेजच्या उपप्राचार्या ॲड. नीलम हजारे,  इंडियन आर्मी सोल्जर श्री.मयुरेश गावंड, नेहरू युवा केंद्राचे जिल्हा समन्वयक श्री.निशांत रौतेला, (भारत सरकार युवा कार्यक्रम एवं खेल मंत्रालय), तालुका क्रीडा अधिकारी अलिबाग श्रीमती अंकिता मयेकर, स्वयंसिद्धा संस्थेच्या अध्यक्षा कु.सुचिता काशिनाथ साळवी आदी मान्यवर उपस्थित होते.

        ॲड. नीलम हजारे यांनी युवकांच्या दैनंदिन जीवनशैली वर बोलतांना तणावमुक्त जीवन जगण्यासाठी सकारात्मक असावे,उत्तम संतुलित आहार घ्यावा, पालकांशी चर्चा करावी, आपण कोणत्याही धेयप्रति फोक्स्ड असले पाहिजे,नशिबावर अवलंबून न राहता मेहनत करावी, असे विचार व्यक्त केले.

      श्री.निशांत रौतेला यांनी फिटनेस एक निरंतर प्रक्रिया असून ती कायम जपावी लागते. व्यायामाबरोबर चांगला आहार घेणे, काहीवेळा अति उत्साहाने ओव्हर एक्झरसाइझ केली जाते तसे न करता नियमित या आपल्या क्षमतेनुसार ते करावे, असे सांगितले.

      इंडिअन आर्मी मधील सोल्जर श्री मयुरेश गावंड यांनी युवांना स्पर्धा परीक्षा ,आहार, व्यायाम याविषयी मोलाचे मार्गदर्शन केले. श्रीमती अंकिता मयेकर यांनी उपस्थित युवांना त्यांच्या उत्तम आरोग्यासाठी व भविष्यातील करिअर करीता शुभेच्छा दिल्या.

        या कार्यक्रमाची सुरुवात पाहुण्यांचे स्वागत, दीपप्रज्वलन व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आली तर प्रास्ताविक करताना सुचिता साळवी यांनी क्रीडा कार्यालयाच्या वतीने प्रिझम संस्था, स्वयंसिद्धा संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने मागील काही वर्षात राबविलेल्या उपक्रमांविषयी माहिती उपस्थित युवा वर्गाला माहिती दिली.

        त्यांनी आजच्या धावपळीच्या जीवनात युवा वर्ग आपल्या शरीर तंदुरुस्तीकडे तसेच आहाराबाबत उदासीन होत असल्याने या वर्गाला लहान वयातच विविध आजार व समस्यांना सामोरे जावे लागते म्हणून हा कार्यक्रम स्तुत्य उपक्रम असल्याचे सांगत आपला देश युवांचा असून हा वर्ग देशाची संपत्ती आहे,त्यांनी देशासाठी संसाधन व्हावे, असे प्रतिपादन केले व कठोपनिषधातील पहिल्या अध्यायातील " शरीरा रथ मानावे, आत्म्यास रथी मानावे, बुद्धीला सारथी मानावे, मनाला लगाम मानावे असे उदाहरण देऊन शरीर,आत्मा,बुध्दी आणि मन यांचे उत्तम व निरोगी जीवनासाठी कसे उपयोग होते, हे सांगितले.

          हा कार्यक्रम जिल्हा क्रीडा अधिकारी रविंद्र नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला. सूत्रसंचालन विपुल घरत व तनुजा मोहिरे यांनी केले तर आभार प्रदर्शन सुचिता साळवी यांनी केले.  

         कार्यक्रमाची सांगता भारताच्या संविधानाची प्रस्तावना वाचून करण्यात आली.