नगरसेविका सौ.नेत्रा किरण पाटील जनहितार्थ तत्पर असतात-सभागृहनेते परेश ठाकूर
पनवेल : खारघर शहर आणि प्रभाग क्रमांक ४ मधील नागरी विकासकामे असतील कींवा सार्वजनिक व समाजोपयोगी उपक्रम असोत,जनतेच्या हिताची कामे करण्यांसाठी नगरसेविका नेत्रा पाटील आणि किरण पाटील यांचे सातत्यपूर्ण प्रयत्न सुरु असतात, असे गौरवोदगार पनवेल मनपाचे सभागृहनेते परेश ठाकूर यांनी खारघर येथे एका कार्यक्रमात केले.
खारघर प्रभाग क्रमांक ४ मधील स्थानिक नगरसेविका नेत्रा किरण पाटील यांच्या स्थानिक नगरसेवक निधीतून खारघर सेक्टर १९ ते मुर्बी गावादरम्यानच्या मुख्य रस्त्यावर दोन हायमास्ट लावण्यात आले आहेत. सदर हायमस्टचा लोकार्पण सोहळा सोमवारी सभागृहनेते परेश ठाकूर यांच्या शुभहस्ते करण्यात आला. यावेळी परेश ठाकूर यांनी खारघरच्या एकूणच विकास कामांवरती प्रकाश टाकला. यावेळी भाजप खारघर शहर अध्यक्ष ब्रिजेश पटेल, उपाध्यक्ष दिलीप जाधव, सामाजिक कार्यकर्ते किरण पाटील, भरत कोंढाळकर, जगदीश ठाकूर, सुश्मिता खान,अर्चना डिंपले, सुहास कोंडुग्रे, एकनाथ ठाकूर, भावेश अंकोलिया, शिवाजी चौबे, विभूती रथ, संदीप ठाकरे तसेच रहिवाशी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रभाग क्रमांक ४ मधील मुर्बी गावाजवळून जाणारा सदर रस्ता अनेक दिवस अंधारात होता. त्यामुळे रात्रीच्या वेळी महिलांना ये-जा करताना असुरक्षितता वाटत होती. अंधाऱ्या रस्त्यामुळे काही अनुचित प्रकार घडण्याची भीती निर्माण झाली होती, मात्र, हायमास्ट लाइट्समुळे संपूर्ण परिसर प्रकाशमान झाला आहे, आता नागरिकांनी आणि विशेषतः महिलांनी सुटकेचा निश्वास सोडला असून एक चांगले काम नगरसेवक निधीतून झाल्याचे समाधान वाटते, अशी प्रतिक्रिया नगरसेविका नेत्रा पाटील यांनी यावेळी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना व्यक्त केली. यावेळी किरण पाटील यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले.