खारघरमध्ये कचर्‍याचे ढीग; नागरिकांमध्ये नाराजी

खारघरमध्ये कचर्‍याचे ढीग; नागरिकांमध्ये नाराजी


पनवेल, दि.6 (वार्ताहर) ः खारघर वसाहतीत हिंवताप, डेंग्युच्या आजारामध्ये वाढ होत असताना पनवेल महापालिकेकडून ‘सिडको’च्या राखीव भूखंडावर टाकण्यात येत असलेला कचरा वेळेवर उचलला जात नाही. त्यामुळे कचर्‍याच्या ढिगार्‍यातून पसरणार्‍या दुर्गंधी मुळे नागरिकांमध्ये नाराजी पसरली आहे.

पनवेल महापालिका आरोग्य विभागाकडून परिसरातील कचरा घंटागाडी द्वारे गोळा करुन पेठपाडा मेट्रो स्थानकालगत असलेल्या ‘सिडको’च्या राखीव भूखंडावर टाकला जातो. त्यानंतर तो कचरा वाहन अथवा घंटागाडी द्वारे घोट येथील डम्पिंग ग्राऊंड याठिकाणी नेला जातो. मात्र, सदर कचरा महापालिकेकडून वेळेवरच उचलला जात नसल्यामुळे कचर्‍यातून पसरणार्‍या दुर्गंधीमुळे सेक्टर- 34, 35 आणि जवळच असलेल्या ओवापेठ मधील रहिवासी त्रस्त आहेत. तसेच कचर्‍यामुळे परिसरात वुत्र्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. याचा त्रास पहाटे चालण्यासाठी येणार्‍या नागरिकांना होत आहे. तर अनेक वेळा कचर्‍याला आग लागण्याचे प्रकार घडले आहे. ‘सिडको’कडे घनकचरा असताना दैनंदिन कचरा द्वारे घोट येथील डंपिंग ग्राऊंडमध्ये घेवून जात असे. मात्र, ‘सिडको’ने महापालिकेकडे घनकचरा प्रकल्प हस्तांतरीत केल्यानंतर अनधिकृतपणे कचरा टाकला जात आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये नाराजी पसरली असून महापालिका आयुक्तांनी याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी नागरिकाकडून केली जात आहे. याविषयी महापालिकेच्या घंटागाडीचे काम पाहणारे राजेंद्र गोसावी यांच्याशी संपर्क केला असता, नंतर फोन करतो असे सांगून त्यांनी फोन कट केला.