महाविकास आघाडीचा महाबंद, शटर डाऊन,बंदला पनवेलमध्ये नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग-लखीमपूर घटनेवर महाविकास आघाडी आक्रमक
पनवेल (प्रतिनिधी)-उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी येथील घटनेच्या निषेधार्थ महाराष्ट्रातील सत्ताधारी महाविकास आघाडीने 'महाराष्ट्र बंद 'ची हाक दिली होती. आज ११ ऑक्टोबर रोजी या घटनेचा निषेध करण्यासाठी राज्यव्यापी बंद पाळण्याचे आवाहन शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी या तिन्ही पक्षांनी संयुक्तपणे केले होते. या महाविकास आघाडीच्या महाबंदला पनवेलमधील नागरिकांनीही उत्स्फूर्त सहभाग नोंदवून हा बंद यशस्वी केला. महाविकास आघाडीच्यावतीने आज सोमवारी सकाळी पनवेलमधील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे एकत्र येऊन भाजपच्या क्रूर सरकारचा निषेध नोंदविला. यावेळी पनवेल उरण महाविकास आघाडीचे नेते तथा शिवसेनेचे रायगड जिल्हा सल्लागार बबनदादा पाटील, पनवेल तालुका संपर्क प्रमुख योगेश तांडेल, काँग्रेसचे आर.सी.घरत, पनवेल महापालिकेचे विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे, हेमराज म्हात्रे, निर्मला म्हात्रे, शशिकला सिंग, प्रभाकर कांबळे, राष्ट्रवादीचे आनंद भंडारी, यतीन देशमुख, काँग्रेसचे वैभव पाटील, बबन विश्वकर्मा आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.