महिला किसान दिनानिमित्त महिला किसान मेळावा संपन्न

                                                                               

महिला किसान दिनानिमित्त महिला किसान मेळावा संपन्न



अलिबाग,जि.रायगड,दि.22 (जिमाका):- अलिबाग येथे महिला किसान दिनानिमित्त कृषी मूल्यवर्धन आणि विपणन साखळी व्यवस्थापन यामध्ये उत्कृष्ठ काम करणाऱ्या महिलांचे जिल्ह्यातील इतर महिलांना मार्गदर्शन होण्यासाठी आज (दि.22 ऑक्टोबर) रोजी जिल्हास्तरीय महिला किसान मेळावा आयोजित करण्यात आला होता.

      यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्रीमती उज्वला बाणखेले, सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय डॉ.सुरेश भारती, महिला आर्थिक विकास महामंडळाच्या जिल्हा समन्वयक श्रीमती वर्षा पाटील, आंबा प्रक्रिया उद्योजक डॉ. मकरंद आठवले, प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग उन्नयन योजनेचे जिल्हा संसाधन अधिकारी श्री. राहुल जोशी, भात प्रक्रिया उद्योजक प्रमिला गावडे, गहू-तांदूळ प्रक्रिया उद्योजक शिल्पा भोसले, मत्स्य पालन व्यवसाय व्यावसायिक पूनम भोईर, प्रकल्प उपसंचालक (आत्मा) श्री. बोराडे, कृषी उपसंचालक श्री. काळभोर, उपविभागीय कृषी अधिकारी श्री. वानखेडे यांची प्रमुख उपस्थिती होती.

      या कार्यक्रमामध्ये प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग उन्नयन योजनेच्या पोस्टरचे प्रकाशन करण्यात आले. तसेच उपस्थित महिला शेतकऱ्यांना कृषी, मत्स्यव्यवसाय, महिला आर्थिक विकास महामंडळ या विभागाकडील विविध योजनांबद्दल तसेच आंबा, काजू, कोकम, औषधी वनस्पती, भात, नाचणी, दूध, मासे इत्यादी प्रक्रिया उद्योगांबद्दल मार्गदर्शन करण्यात आले.

     या मेळाव्याचे उद्घाटन दीपप्रज्वलनाने करण्यात आले तसेच कृषी क्षेत्रामध्ये उत्कृष्ट काम करणाऱ्या महिलांचा सत्कार करण्यात आला, उपस्थित शेतकरी महिलांना शेती बियाणांचे वाटपही करण्यात आले. या मेळाव्यास महिलांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला.