पाण्याची गरज लक्षात घेता विमानतळ पुनर्वसन क्षेत्रातील पॉकेट क्र. 1 ते 7 मधील भोगवटा प्रमाणपत्र प्राप्त न झालेल्या इमारतींना पाण्याची जोडणी देण्याचा सिडकोचा निर्णय
पाणी पुरवठ्याकरिता आकारण्यात येत आहेत कमी दर
पाण्याची अत्यावश्यक गरज लक्षात घेता विमानतळ पुनर्वसन क्षेत्रातील (रिहॅबिलीटेशन ॲन्ड् रिसेट्लमेन्ट - आर ॲन्ड् आर) पॉकेट क्र. 1 ते 7 मधील करंजाडे आणि उलवे येथील अद्याप भोगवटा प्रमाणपत्र (ऑक्युपेशन सर्टिफिकेट) प्राप्त न झालेल्या इमारतींना पाण्याची जोडणी देण्याचा निर्णय सिडकोतर्फे घेण्यात आला आहे. तसेच या जोडण्यांकरिता आकारण्यात येणारे पाण्याचे दर हे देखील अन्य प्राधिकरणे/स्थानिक शासन संस्थांपेक्षा कमी आहेत.
"विमानतळ प्रकल्पबाधितांना आवश्यक त्या सोयी सुविधा प्राधान्याने पुरविण्यास सिडको नेहमीच प्रयत्नशील आहे. आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पबाधितांनी सिडकोला नेहमीच सहकार्य केले आहे. याची जाण ठेऊन पुनर्वसन आणि पुन:स्थापना क्षेत्रातील पॉकेट क्र. 1 ते 7 करंजाडे आणि उलवे येथील अद्याप भोगवटा प्रमाणपत्र प्राप्त न झालेल्या इमारतींनाही पाण्याची जोडणी देण्याचा निर्णय सिडकोने घेतला आहे."
डॉ. संजय मुखर्जी
उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक, सिडको
सिडकोतर्फे रायगड जिल्ह्याच्या पनवेल तालुक्यातील दहा गावांतील जमीन संपादन करून, 1160 हेक्टरवर नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्प विकसित करण्यात येत आहे. सदर विमानतळ प्रकल्पबाधितांना राज्य शासनाने मंजूर केलेले सर्वोत्तम असे पुनर्वसन आणि पुन:स्थापन पॅकेज अदा करण्यात आले आहे. या पॅकेज अंतर्गत विमानतळा नजीकच्या क्षेत्रात पुष्पक नोड हे सर्व पायाभूत सोयी सुविधांनी युक्त असे पुनर्वसन आणि पुन:स्थापन क्षेत्र विकसित करण्यात येत असून प्रकल्पबाधितांच्या पुनर्वसनाचे बहुतांशी काम पूर्ण झाले आहे.
या जोडण्यांकरिता आकारण्यात येणारे पाण्याचे दर हे देखील मुंबई महानगरपालिका, कल्याण-डोंबिवली महानगरपालिका, ठाणे महानगरपालिका, पुणे महानगरपालिका, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, अंबरनाथ व पनवेल महानगरपालिका यांच्यापेक्षा कमी आहेत.
तरी ज्या सदनिकाधारकांची इमारत पूर्ण झालेली असून काही नियामक अडचणींमुळे भोगवटा प्रमाणपत्र प्राप्त करण्यास विलंब होत असल्यास सदनिकांधारकांनी पाण्याच्या नळजोडणीसाठी कार्यकारी अभियंता, चौथा मजला, रायगड भवन, सीबीडी बेलापूर, नवी मुंबई - 400 614 येथे संपर्क साधावा, असे आवाहन सिडकोकडून करण्यात येत आहे.