जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींनी कचऱ्याचे व्यवस्थापन करावे : पालकमंत्री आदिती तटकरे


जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींनी कचऱ्याचे व्यवस्थापन करावे : पालकमंत्री आदिती तटकरे


अलिबाग :

जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींनी कचऱ्याचे व्यवस्थापन करावे, असे आवाहन रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री आदिती तटकरे यांनी सर्व सरपंचांना केले. तसेच कचऱ्याचे व्यवस्थापन करताना १४ व १५ वा वित्त आयोगातील स्वच्छतेसाठी राखीव असलेल्या निधीचा विनियोग करावा, असा सल्लाही त्यांनी दिला.

स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) टप्पा-2 अंतर्गत स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी वर्षानिमित्त राज्यात विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून रायगड जिल्ह्यात शनिवारी (ता.२५) सरपंच स्वच्छ्ता संवाद या ऑनलाइन उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पालकमंत्री आदिती तटकरे यांनी उपस्थित अधिकारी, सरपंच यांना मार्गदर्शन केले.

जिल्हा परिषद, पंचायत समिती व ग्रामपंचायत यांची स्वच्छ्ता मोहिमेत महत्त्वपूर्ण जबाबदारी आहे. प्लास्टिक कचरा ही एक मोठी समस्या आहे. महाड येथे निर्माण झालेल्या पूरस्थिती नंतर ठिकठिकाणी प्लास्टिक कचरा पाण्याबरोबर गावात जमा झाल्याचे दिसून आले. तसेच स्वच्छ्ता मोहीम राबविताना मोठ्या प्रमाणात प्लास्टिक कचरा दिसून येतो, त्यामुळे प्लास्टिक वापरण्याची मानसीकता बदलणे गरजेचे आहे. तसेच ग्रामपंचायतींनी विकास आराखडा तयार करताना कचरा व्यवस्थापन या विषयाला प्राधान्य द्यावे, असे आदिती तटकरे यांनी सांगितले.

स्वच्छ्ता ही सेवा उपक्रमांतर्गत जिल्ह्यात विविध उपक्रम राबविले जात आहेत. प्रत्येक नागरिकाने घरातच कचऱ्याचे वर्गीकरण करावे, तसेच स्वच्छतेची सवय अंगिकारावी. राज्यात रायगड जिल्हा प्रथम येईल त्यादृष्टीने अधिकारी सरपंच यांनी प्रयत्न करावेत, असे जिल्हा परिषद अध्यक्षा योगिता पारधी यांनी सांगितले.

साश्वत ग्राम विकासासाठी स्वच्छ पर्यावरण स्नेही उपक्रम राबविणे गरजेचे आहे. ग्रामपंचायतींनी घंटा गाडीने कचरा जमा करावा. कचऱ्याचे योग्य वर्गीकरण करावे. प्लास्टिक कचरा पुन्हा प्रक्रिया करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करावेत, असा सल्ला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील यांनी दिला.

महाराष्ट्राची स्वच्छ्ता चळवळ संपूर्ण देशाने स्वीकारली. गावे स्वच्छ, सुंदर, हागणदारीमुक्त करणे गरजेचे आहे. सरपंचांनी रस्ते व इमारती बांधणे इतकेच काम न करता स्वच्छ्ता, आरोग्य, महिला सबलीकरण, व्यसनमुक्ती, पर्यावरण, जलव्यवस्थापन या क्षेत्रात काम करावे. हिरवे बाजार ग्रामपंचायतीत आम्ही हे सर्व उपक्रम राबविले असून, याबाबत मी रायगड जिल्ह्यातील ग्रामपंचायतींना मार्गदर्शन करण्यास तयार असल्याचे आश्वासन राज्यस्तरीय साधनव्यक्ती पोपटराव पवार यांनी दिले.

युनिसेफचे प्रतिनिधी जयंत देशपांडे यांनी त्रिस्तरीय पंचायत राज व्यवस्थेचे देशातील एक उत्तम उदाहरण म्हणून महाराष्ट्राकडे पाहिले जाते. गावाच्या सर्वांगीण विकासासाठी प्रत्येक ग्रामपंचायतीमधील लोकसहभाग महत्तवाचा असतो. ग्रामपंचायतींनी ग्रामस्तरांवर लोकसहभागातून गावांच्या गरजा उपलब्ध साधनसामुग्री निकड व प्राधान्यक्रम ठरवून यांचे योग्य नियोजन केल्यास गावाचा विकास उत्तम रितीने होऊ शकतो असे सांगितले. 

या उपक्रमात जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सुधाकर घारे, अर्थ व बांधकाम समिती सभापती नीलिमा पाटील, समाजकल्याण सभापती दिलीप भोईर, महिला व बालकल्याण सभापती गीता जाधव, कृषी व पशुसंवर्धन सभापती बबन मनवे सहभागी झाले होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक पाणी व स्वच्छता विभाग उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. ज्ञानदा फणसे यांनी तर सूत्रंचालन जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक जयवंत गायकवाड यांनी केले.