सणासुदीच्या काळात जिल्ह्यातील मिठाई उत्पादक, विक्रेते व इतर अन्न व्यावसायिकांना दक्षता घेण्याचे आवाहन

                                                      

सणासुदीच्या काळात जिल्ह्यातील मिठाई उत्पादक, विक्रेते व इतर अन्न व्यावसायिकांना दक्षता घेण्याचे आवाहन


अलिबाग,जि.रायगड,दि.09 (जिमाका):-  सणासुदीच्या काळात जनतेकडून मिठाई व इतर पदार्थ जसे खवा, मावा, मैदा, आटा, खाद्यतेल, वनस्पती इत्यादीची मागणी मोठ्या प्रमाणात केली जाते. त्यानुषंगाने रायगड जिल्ह्यातील मिठाई उत्पादक, विक्रेते, व इतर अन्न व्यावसायिकांनी दक्षता घेण्याचे सहाय्यक आयुक्त (अन्न), अन्न व औषध प्रशासन,रायगड-पेण श्री. लक्ष्मण दराडे यांनी सूचित केले आहे.

       त्यांनी दुकानाचा परिसर हा पर्यावरणीय दृष्टीने व किटकांपासून संरक्षित असावा, कच्चे अन्न पदार्थ परवानाधारक,नोंदणीधारक व्यावसायिकांकडून खरेदी करण्यात यावेत, पदार्थ तयार करण्यासाठी पिण्यायोग्य पाण्याचा वापर करावा, तयार अन्न पदार्थ हे स्वच्छ व सुरक्षित ठिकाणीच व्यवस्थित झाकून ठेवावेत, आजारी व्यक्तीने अन्नपदार्थ हाताळू नयेत, मिठाई तयार करताना केवळ फूडग्रेड खाद्यरंगाचा अत्यल्प प्रमाणात वापर करावा. (100 पीपीएम पेक्षा कमी), मिठाई ट्रे वर दर्शनी भागात वापरण्यायोग्य दिनांक (Use Before) टाकावा, बंगाली मिठाई ही 24 तासांचया आत खाण्याबाबत ग्राहकांना स्पष्ट निर्देश देण्यात यावेत, मिठाई बनवितांना तसेच हाताळणाऱ्या व्यक्तींनी डोक्यावर टोपी मास्क, हातमोजे व स्वच्छ ॲप्रन वापरावे, मिठाईवर वापरला जाणारा सोनेरी व चांदीचा वर्ख योग्य दर्जाचे व उच्च प्रतीचे असावे, मिठाई हाताळताना हात वारंवार स्वच्छ धुवावेत, करोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने घालून दिलेल्या सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करावे, अशा सूचना जिल्ह्यातील मिठाई उत्पादक, विक्रेते व इतर अन्न व्यावसायिकांना दिल्या असून या काळात मिठाई व इतर अन्न पदार्थांच्या सेवनामुळे विषबाधासारखी अप्रिय घटना घडणार नाही, याची दक्षता घ्यावी, असे आवाहनही केले आहे.