ठाणे जिल्हाधिकारी डॉ.राजेश नार्वेकर यांनी महाराष्ट्र राज्य माथाडी, ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियनचे नेते मा.आ.नरेंद्र पाटील यांना बैठकीत माथाडी कायद्याची परिणामकारक अंमलबजावणी करण्याचे आश्वासन दिले
मुंबई, दि. 25: महाराष्ट्र शासनाच्या उद्योग, उर्जा व कामगार विभागाच्या दि.06/09/2016 च्या शासन निर्णयानुसार माथाडी कायद्याची परिणामकारक अंमलबजावणी करुन त्यातील तरतुदींचा दुरुपयोग रोखण्यासाठी कृती आराखडा केलेला आहे, त्यानुसार जिल्हास्तरीय कृती समितीच्या दरमहा बैठका घेऊन माथाडी कामगारांच्या अडी-अडचणींची सोडवणुक केली जाईल, असे आश्वासन ठाणे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी व जिल्हादंडाधिकारी डॉ.राजेश नार्वेकर यांनी महाराष्ट्र राज्य माथाडी, ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियनचे नेते मा. आमदार नरेंद्र अण्णासाहेब पाटील यांच्या उपस्थितीत दि. 24 ऑगस्ट, 2021 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या कृती समितीच्या बैठकित दिले.
दि.06/09/2016 च्या शासन निर्णयातील कृती आराखड्याची प्रभावी अंमलबजावणी करण्याकरीता संबंधित माथाडी मंडळ कार्यरत असलेल्या जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी यांचे अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय कृती समितीच्या स्थापना करण्यात याव्यात, अशी सूचना करण्यात आली आहे, त्याप्रमाणे ठाणे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजेश नार्वेकर यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन झालेल्या कृती समितीच्या दि. 24 ऑगस्ट, 2021 रोजी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकित हे आश्वासन देण्यात आले.
जिल्हाधिकारी डॉ. राजेश नार्वेकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कृती समितीच्या बैठकिस ठाणे जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी भाऊसाहेब दांगडे, पोलीस यंत्रणेचे प्रतिनिधी, महाराष्ट्र राज्य माथाडी, ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियनचे नेते मा. आमदार नरेंद्र अण्णासाहेब पाटील, युनियनचे अध्यक्ष एकनाथ जाधव, संयुक्त सरचिटणीस रविकांत पाटील, दिलीप खोंड, कायदेशिर सल्लागार व नवीमुंबईच्या नगरसेविका अॅड्. भारतीताई पाटील, युनियनचे सेक्रेटरी कृष्णकांत पाटील, विश्वास पाटील, विविध माथाडी मंडळाचे अधिकारी आदी उपस्थित होते.
या बैठकित माथाडी कामगार नेते मा. आमदार नरेंद्र अण्णासाहेब पाटील यांनी कष्टाची कामे करणा-या माथाडी कामगारांच्या कामासंदर्भातील अडचणींची सविस्तर माहिती जिल्हाधिकारी डॉ. राजेश नार्वेकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कृती समितीसमोर मांडली, माथाडी कामगारांच्या हक्काच्या कामात येणा-या अडी-अडचणींची कृती समितीसमोर माहिती घेऊन त्याबाबत वेळच्या वेळी संबंधित विभागाकडून कार्यवाही व कृती आराखड्याची प्रभावी अंमलबजावणी केली जाईल, असे जिल्हाधिकारी डॉ. राजेश नार्वेकर यांनी सांगितले.
जिल्हास्तरीय कृती समितीची पुढील बैठक माहे सप्टेंबर, 2021 मध्ये घेण्यात येईल असेही जिल्हाधिकारी डॉ. राजेश नार्वेकर यांनी जाहिर केले.