राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेकडून महाडमधील पूरग्रस्त कर्मचाऱ्यांना मोलाची मदत
*जिल्हयातील सर्वच तालुक्यांतील 117 कर्मचाऱ्यांनी स्वयंप्रेरणेने जवळपास 1 लाखापर्यंत मदतनिधी केला जमा*
अलिबाग,जि.रायगड,दि.09 (जिमाका):- दि.22 व 23 जुलै 2021 रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे महाड व पोलादपूर मधील अनेक गावांचे महापूरामुळे अतोनात नुकसान झाले. कित्येकांचे संसार पाण्यात वाहून गेले. या नैसर्गिक आपत्तीमध्ये हजारो नागरिकांबरोबरच शासकीय कर्मचाऱ्यांचेदेखील मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले.
या आपत्तीच्या काळात महाडमधील अनेक शासकीय कर्मचाऱ्यांच्या घरात पूराचे पाणी असताना देखील महापूरात अडकलेल्या इतर नागरिकांना बाहेर काढणे, त्यांना मदत करणे, त्यांचे तात्पुरते पुनर्वसन करणे, त्यांना आरोग्य सुविधा देणे या कामात तर पूर ओसरल्यानंतर नागरिकांना मदत पुरविणे व पूरग्रस्तांच्या घराचे, दुकानांचे व शेतीचे पंचनामे करण्यात हे कर्मचारी व्यस्त झाले. मात्र स्वत:च्या घराचे झालेले नुकसान व साफसफाईकडे त्यांना लक्ष दयायला वेळ मिळाला नाही. तसेच कार्यालयाची सफाई व झालेले नुकसान यामुळे अनेक अडचणीमध्ये असलेल्या शासकीय कर्मचाऱ्यांना आधार देण्याकरीता राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना पुढे सरसावली.
दि. 7 ऑगस्ट 2021 रोजी महाड शहर तसेच महाड व पोलादपूर तालुक्यातील महसूल, आरोग्य, सार्वजनिक बांधकाम, कृषी, आयटीआय, वन विभाग, सामाजिक वनीकरण अशा विविध विभागातील 108 पूरग्रस्त शासकीय कर्मचाऱ्यांना रायगड जिल्हा सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेतर्फे जीवनावश्यक वस्तूंची मोलाची मदत देण्यात आली. यामध्ये कोतवाल, शिपाई, वनरक्षक, वाहन चालक, लिपिक, तलाठी, नर्सेस, शिल्पनिदेशक इत्यादी कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. तसेच बृहन्मुंबई राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेतर्फेसुध्दा मदत देण्यात आली. याकरिता जिल्हयातील सर्वच तालुक्यांतील जवळपास 117 कर्मचाऱ्यांनी स्वयंप्रेरणेने जवळपास 1 लाखापर्यंत मदतनिधी जमा केला होता.
महाड येथील कर्मचाऱ्यांना तहसिलदार सुरेश काशिद यांच्या हस्ते कर्मचारी संघटनेतर्फे ही मदत वितरीत करण्यात आली. त्याचप्रमाणे आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांना ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक डॉ.भास्कर जगताप यांच्या हस्ते वाटप करण्यात आले. या मदतीबद्दल जिल्हा अध्यक्ष संदीप नागे यांनी सर्वांचे आभार मानले.
राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेचे संस्थापक ज्येष्ठ राष्ट्रीय कामगार नेते स्वर्गीय र.ग. कर्णिक यांनी घालून दिलेल्या सामाजिक बांधिलकीच्या आदर्शानुसार राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेने आजवर प्रत्येक नैसर्गिक आपत्तीच्या वेळी सहकार्याचा हात पुढे केला आहे. कोविड महामारीच्या काळात मुख्यमंत्री सहायता निधीकरीता रायगड जिल्हयातील कर्मचाऱ्यांनी आर्थिक मदतीचे योगदान दिले आहे. तसेच जिल्हयातील निसर्ग चक्रीवादळग्रस्त नागरिकांना मदत म्हणून जिल्हा आपत्ती निवारण निधीकरीता सुध्दा मदत दिली आहे.
महाड येथील पूरग्रस्त कर्मचाऱ्यांना मदत वाटप करताना जिल्हा अध्यक्ष संदीप नागे, सरचिटणीस प्रभाकर नाईक, कार्याध्यक्ष प्रकाश पाटील, कोषाध्यक्षा दर्शना पाटील, तालुका अध्यक्ष सतिश माने, सरचिटणीस रविंद्र भोसले, आशिष अमृसकर, लक्ष्मण लहांगे, तसेच अलिबाग तालुका सरचिटणीस दर्शना कांबळे, वैशाली पयर, प्रभाकर नवाळे, संदेश पानसरे, वासुदेव पाटील इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते.
महाड तहसिलदार श्री. सुरेश काशिद यांनी “राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेने सरकारी कर्मचाऱ्यांची आस्थापूर्वक चौकशी करुन त्यांना दिलेला मदतीचा हात फार महत्वाचा आहे. कर्मचारी सुध्दा समाजाचा घटक आहे. मात्र त्यांना स्वत: पेक्षा समाजाचा विचार अधिक करावा लागतो. अडचणीत असलेल्या कर्मचाऱ्यांची खऱ्या अर्थाने काळजी संघटना घेत आहे” या शब्दात आभार मानले.
महाड ग्रामीण रुग्णालयातील अधिपरिचारक श्री.लक्ष्मण जाधव यांनी या मदतीबद्दल आभार मानताना म्हटले की, आत्तापर्यंत जी मदत मिळाली, त्यापेक्षा संघटनेकडून मिळालेली मदत ही घरच्यांकडून मिळाल्यासारखी वाटली. संघटनेने जी मदत दिली त्यामुळे माझी आपली माणसे भेटायला आली असे वाटले आणि नकळत अश्रू अनावर झाले.
या निमित्ताने राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेचे सरचिटणीस श्री. प्रभाकर नाईक म्हणाले की, आपत्ती काळात सरकारी कर्मचाऱ्यांना स्वत:च्या अडचणी न सांगता काम करावे लागते. मात्र कर्तव्य बजावताना त्यांना आपल्या कुटुंबाकडे लक्ष देता येत नाही. म्हणूनच राज्य सरकारी कर्मचारी संघटनेच्या रायगड जिल्हयातील कर्मचारी बांधवांनी जमविलेल्या मदत निधी मधून महाड -पोलादपूर तालुक्यांतील शासकीय कर्मचाऱ्यांना ही कर्तव्याची व आपुलकीची मदत देण्यात आली.