अमृत महोत्सवी वर्षानिमित्त जिल्ह्यातील 119 समूहांना रु.17 लाख 85 हजार फिरता निधी तर 11 समूहांना समूदाय गुंतवणूक निधी रु. 13 लाख 20 हजार वितरीत
अलिबाग,जि.रायगड, दि.13 (जिमाका):- आपल्या देशाच्या स्वातंत्र्याला 75 वर्ष होत असल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र शासनाच्या ग्रामविकास विभागामार्फत मार्च 2021 ते ऑगस्ट 2021 या 75 आठवड्यांच्या कालावधीत “आजादी का अमृत महोत्सव”निमित्त मा. पंतप्रधान, भारत सरकार यांनी दि. 12 ऑगस्ट 2021 रोजी दुपारी 12.30 वा. रोजी देशातील सर्व राज्यातील एन.आर.एल.एम. अभियानांतर्गत स्वयंसहायता समूह, ग्रामसंघ, शेतकरी उत्पादक संघ, उत्पादक गट तसेच पंचायत राज स्वयंसहायता समूह, ग्रामसंघ ,शेतकरी उत्पादक संघ उत्पादक गट तसेच पंचायतराज संस्थांमधील सदस्य यांच्याशी ऑनलाइन संवाद साधला.
रायगड जिल्ह्यातील एन.आर.एल.एम अंतर्गत महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान(MSRLM)अंतर्गत उमेद अभियानातील 13 हजार 632 महिला स्वयंसहायता समूहातील 52 हजार 529 ग्राम संघ व स्वयं सहाय्यता समूहाच्या महिलांनी यात सहभाग नोंदविला असून या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त रायगड जिल्ह्यातील 119 समूहांना रु.17 लाख 85 हजार इतका फिरता निधी तर 11 समूहांना रु. 13 लाख 20 हजार इतका समूदाय गुंतवणूक निधी वितरीत करण्यात आला.
यावेळी रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.किरण पाटील, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रणधीर सोमवंशी, अर्थ व बांधकाम सभापती श्रीमती नीलिमा पाटील, जिल्हा परिषदेचे अन्य संबंधित अधिकारी, जिल्हा अभियान व्यवस्थापन सचिन चव्हाण, जिल्हा व्यवस्थापक सिद्धेश चंद्रकांत राऊळ उपस्थित होते.