विशेष लेख क्र.9 दिनांक :- 07 मार्च, 2021
रायगडच्या स्त्री शक्तीचा जागर-
नारी शक्तीला त्रिवार वंदन…!
8 मार्च जागतिक महिला दिन… या दिनानिमित्त सर्वत्र महिलांच्या सन्मानार्थ विविध उपक्रम राबविले जातात. आज प्रत्येक क्षेत्रात महिलांनी आपली कार्यक्षमता सिध्द केली आहे. आपल्या संस्कृतीत महिलांना आदराचे स्थान आहे. कोणत्या ना कोणत्या मार्गाने आपण स्त्रियांप्रती असलेली आपली आदर भावना व्यक्त करीत असतो. 8 मार्च हा दिवस स्त्रियांच्या दृष्टीने अत्यंत अभिमानाचा, स्वाभिमानाचा दिवस. या दिवसाच्या निमित्ताने रायगड जिल्ह्यातील विविध क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाने जिल्ह्याचे नाव उज्वल करणाऱ्या तमाम स्त्रियांना जिल्हा माहिती कार्यालयाची ही लेखरुपी मानवंदना…!
या लेखातून रायगड जिल्ह्याच्या लोकप्रिय पालकमंत्री कु.आदिती तटकरे, जिल्हाधिकारी निधी चौधरी, तसेच अन्य महिला अधिकारी यांच्या कार्यकर्तृत्वाची थोडक्यात ओळख करुन देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
उद्योग, खनिकर्म, पर्यटन, फलोत्पादन, क्रीडा व युवक कल्याण, राजशिष्टाचार, विधी व न्याय आणि माहिती व जनसंपर्क राज्यमंत्री तथा पालकमंत्री कु.आदिती सुनिल तटकरे
उद्योग, खनिकर्म, पर्यटन, फलोत्पादन, क्रीडा व युवक कल्याण, राजशिष्टाचार, विधी व न्याय आणि माहिती व जनसंपर्क या सात विभागांच्या राज्यमंत्री तसेच जिल्ह्याच्या पालकमंत्री म्हणून जिल्ह्याच्या विकासासाठी अहोरात्र मेहनत घेणाऱ्या कु.आदिती सुनिल तटकरे. रायगड जिल्हा परिषदेची अध्यक्षपदाची धुरा यशस्वीपणे सांभाळल्यानंतर राज्यात राज्यमंत्री तसेच जिल्ह्यात पालकमंत्री म्हणून देखील अत्यंत कार्यक्षमतेने अनेक लोकाभिमुख लोकोपयोगी निर्णय घेण्यात यशस्वी. आपल्या कामाच्या माध्यमातून संपूर्ण राज्यात वेगळा ठसा उमटविणाऱ्या महिला युवा मंत्री.
करोना या आपत्कालीन विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी आणि त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी संपूर्ण राज्यात लॉकडाऊन घोषित झाला. या दरम्यान नागरिकांच्या आरोग्य विषयक सुरक्षिततेसाठी, सोयी-सुविधांसाठी विविध नियम व उपाययोजना शासन आणि जिल्हा प्रशासनामार्फत राबविण्यात आले व आजही राबविण्यात येत आहेत.
या संपूर्ण परिस्थितीला हाताळण्यासाठी रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री कु.आदिती सुनिल तटकरे यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यातील सर्व खासदार, आमदार, अन्य लोकप्रतिनिधी यांच्यासह जिल्हाधिकारी श्रीमती निधी चौधरी, तत्कालीन जिल्हा पोलीस अधीक्षक अनिल पारस्कर, तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप हळदे, प्रभारी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.प्रमोद गवई हे सदैव तत्पर राहिले आणि आताही जिल्हाधिकारी श्रीमती निधी चौधरी, जिल्हा पोलीस अधीक्षक अशोक दुधे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.किरण पाटील, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.सुहास माने, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सुधाकर मोरे यांचे जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था, आरोग्य विषयक सर्व घडामोडींवर बारकाईने लक्ष असून आवश्यक असेल तेव्हा जिल्ह्यातील जनतेच्या सुरक्षिततेसाठी वेळोवेळी योग्य व आवश्यक ते निर्णय घेतले जात आहेत.
करोना असो वा निसर्ग चक्रीवादळ, अतिवृष्टी असो वा अन्य कोणतीही दूर्घटना, प्रत्येक प्रसंगाला पालकमंत्री कु.आदिती तटकरे जनतेच्या मदतीसाठी तत्परतेने धावून गेल्या. तातडीने निर्णय प्रक्रिया राबवून जनतेच्या सोयी सुविधांसाठी जातीने लक्ष देत आहेत.
पालकमंत्री कु.आदिती तटकरे या जिल्ह्यातील जनतेच्या आरोग्यविषयक सुरक्षिततेसाठी, सोयी-सुविधांसाठी आवश्यक त्या उपाययोजनांसाठी तसेच जिल्ह्याच्या सर्वांगिण विकासासाठी अहोरात्र झटत आहेत. जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टीने पालकमंत्री या नात्याने अनेक लोकोपयोगी निर्णय घेण्यात, जिल्ह्यातील अनेक प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यात यशस्वी…….. आणि राज्यमंत्री तथा पालकमंत्री कु.आदिती सुनिल तटकरे यांचे लोकसेवेचे हे व्रत आजही अविरतपणे सुरुच आहे….!
जिल्हाधिकारी श्रीमती निधी चौधरी
करोना म्हणजेच कोविड-19 या आजाराने जगभरात थैमान घातले. जागतिक स्तरावरूनच नव्हे तर देशभरात, राज्यात सर्वच स्तरावर या आजाराविरुध्द लढण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली जात आहे. मुंबई-पुण्यासह आसपासच्या जिल्ह्यांमध्ये करोनाने शिरकाव करायला जेव्हा सुरुवात केली, नेमक्या तेव्हाच अशा आव्हानात्मक परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर रायगड जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी पदाची सूत्रे तरुण, उमद्या, धडाडीने काम करणाऱ्या महिला अधिकारी म्हणून ओळख असणाऱ्या निधी चौधरी यांनी स्वीकारली आणि पहिल्या दिवसापासूनच त्यांनी “लिडींग फ्रॉर्म द फ्रंट” या उक्तीप्रमाणे आत्मविश्वासाने परिस्थितीचा सामना करायला सुरुवात केली. कोणत्याही संकटाला न डगमगता खंबीरपणे तोंड देणाऱ्या, परिस्थितीनुरुप तात्काळ निर्णय क्षमता बाळगणाऱ्या व दूरदृष्टी ठेवून निर्णय घेणाऱ्या, पारदर्शक प्रशासन चालविणाऱ्या, संवेदनशील, अशी ओळख असणाऱ्या महिला जिल्हाधिकारी निधी चौधरी. निसर्ग चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या उत्कृष्ट नियोजनामुळेच, दूरदृष्टी ठेवून निर्णय घेण्याच्या क्षमतेमुळेच जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात मनुष्यहानी झाली नाही. तसेच निसर्ग वादळ झाल्यानंतर वाहतुकीसाठी रस्ते विक्रमी वेळेत सुरु करण्यात यश मिळविले. त्यामुळे बाधित क्षेत्रांना आवश्यक ती मदत, सोयी सुविधा वेळेत पुरविणे शक्य झाले.
याबरोबरच पालकमंत्री कु.आदिती तटकरे तसेच अन्य लोकप्रतिनिधींशी विचारविनिमय करुन जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टीने आवश्यक असलेले तसेच प्रशासनातील अनेक महत्वाचे प्रश्न निकाली लावले. सर्वांना नेहमीच सकारात्मक ऊर्जा देवून, प्रोत्साहन देवून जिल्हा प्रशासनाला प्रगतीपथावर नेण्यासाठी अहोरात्र प्रयत्नशिल.
निवासी उपजिल्हाधिकारी तथा अप्पर जिल्हादंडाधिकारी, रायगड डॉ.पद्मश्री बैनाडे
जिल्हाधिकारी कार्यालयातील एका महत्वाच्या पदावरील महिला अधिकारी. जिल्हाधिकारी कार्यालय, तेथील अधिकारी तसेच जनतेमधील दुवा म्हणून जबाबदारी असलेले, प्रत्येक प्रशासकीय निर्णयांमध्ये समन्वयाची भूमिका साधणारे हे पद. या व्यतिरिक्त संपूर्ण जिल्ह्यातील आपत्ती व्यवस्थापनाची मुख्य जबाबदारी सांभाळणाऱ्या महिला अधिकारी, कोविड-19 च्या तसेच निसर्ग चक्रीवादळाच्या भीषण संकटात पालकमंत्री कु.आदिती तटकरे, जिल्हाधिकारी निधी चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली व अन्य सहकारी अधिकाऱ्यांच्या मदतीने आवश्यक त्या उपाययोजना खंबीरपणे राबविल्या.
तृप्ती सांडभोर, अतिरिक्त आयुक्त, पनवेल महानगरपालिका
महापालिकेचे नियमित चालणारे काम प्रचंड असते त्यातच हे करोनाचे संकट ओढवल्याने खूप मोठी जबाबदारी पालिकेवर येऊन पडली. पनवेल महापालिकेची स्थापना होऊन थोडाच काळ झाल्याने कर्मचाऱ्यांची संख्या मर्यादित असल्याने कामाचे नियोजन करणे अवघड होत होते. असे असताना देखील पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त सुधाकर देशमुख यांच्या नेतृत्वाखाली प्रशासन अधिक गांभीर्याने करोना काळात आघाडीच्या सैन्यफळीसारखे लढायला लागले. त्यात त्यांना अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर यांची मोलाची साथ मिळाली. याआधीचा कल्याण-डोंबिवली आणि नवी मुंबई महानगरपालिकेतील प्रशासकीय अनुभव त्यांच्या गाठीशी होता, तो या ठिकाणी उपयोगी आला.
आयुक्तांच्या सूचना शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवत त्या प्रत्यक्षात आणण्यासाठी श्रीमती तृप्ती सांडभोर यांनी जातीने लक्ष दिले. एका बाजूला नियम राबवायचे त्याचबरोबर नागरिकांत असंतोष पसरू नये, याची काळजी घ्यायची, अशा दुहेरी भूमिका त्यांनी पार पाडल्या. पनवेल हे मुंबईचे प्रवेशद्वार आहे. पूर्ण रायगड जिल्ह्याचा करोना रूग्णांचा भार पनवेल महापालिकेवर होता. त्यामुळे इथे घेतलेला निर्णय कोकणच्या एकूण आरोग्याशी निगडीत होता, हे ओळखून पनवेल महापालिकेने अत्यंत जबाबदारीने आणि संवेदनशीलतेने कार्य केले.
रूग्णांचे संपर्क,चाचणी, ट्रेसिंग, डिस्चार्च यांच्या व्यवस्थापनावर त्यांनी विशेष भर दिला. करोनाचे व्यवस्थापन करण्यासाठी "वॉर रूम" हेच त्यांचे कार्यालय आणि घर झाले होते. जिल्हाधिकारी कार्यालय यंत्रणा, पालिका आणि इतर विविध विभागांशी समन्वय साधण्याचे महत्वाचे काम त्यांनी केले. याच बरोबरीने रूग्णांची माहिती अद्ययावत करणारे सॉफ्टवेअर वापरून रूग्णांसाठी बेडस् चे उपलब्ध करण्याचे अतिशय क्लिष्ट काम त्यांनी हाताळले.
“माझे कुटुंब माझी जबाबदारी” लोकांमध्ये रूजण्यासाठी घरोघरी जाऊन आरोग्य तपासणीचे नियोजन केले. विविध गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये जाऊन नागरिकांमध्ये जनजागृतीचे काम त्यांनी केले. हे सगळे काम करताना स्वत:ला आणि आपल्या कुटुंबाला करोनाची लागण होऊनही कच न खाता, न डगमगता त्यातून बाहेर पडून त्यांनी अधिक उत्साहाने पुन्हा काम सुरू केले.
शासनाची अमृत योजना, प्रधानमंत्री आवास योजना, यांसारखे महत्वाकांक्षी प्रकल्प त्यांनी हाताळले. महानगरपालिकेचे बांधकाम विभागाचे विविध प्रकल्प पूर्णत्वाकडे नेण्यासाठी नियोजन करून कामाची गुणवत्ता आणि गती यातील योग्य मेळ त्या साधत आहेत. सामाजिक भान राखत महिला व बालकल्याण विभागाचे धोरण त्यांनी आखले आहे. अजूनही करोना नियंत्रणाबरोबरच आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली महापालिका टीमला सोबत घेऊन इतर विकासकामे प्रगतीपथावर नेण्याचे श्रीमती सांडभोर यांचे अविरत प्रयत्न सुरू आहेत.
श्रीमती वैशाली माने, उपजिल्हा निवडणूक अधिकारी
सन 2018 पासून रायगड जिल्ह्यात उपजिल्हा निवडणूक अधिकारी या पदावर रुजू. सन 2019 या वर्षात पार पडलेल्या लोकसभा व विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीचे काम अतिशय जबाबदारीने पार पाडून भारतीय लोकशाहीने महिलांना दिलेल्या हक्कांची उपयुक्तता सिध्द केली. जिल्ह्यात नव मतदार नोंदणी असो वा इतर निवडणूक विषयीचे काम, उपजिल्हा निवडणूक अधिकारी श्रीमती वैशाली माने यांनी अतिशय उत्साहाने पार पाडले.
श्रीमती शारदा शरद पोवार, उपविभागीय अधिकारी, अलिबाग
सन 1998 साली महाराष्ट्र शासन लेखा व वित्त विभागात नियुक्ती, धुळे जिल्हा परिषदेचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी व सहाय्यक संचालक, राज्य कामगार विमा योजना मुंबई म्हणून काम पाहिले. त्यानंतर सन 2001 ला तहसिलदार म्हणून नियुक्ती, महसूल विभागात तहसिलदार उल्हासनगर, अंबरनाथ, मुरबाड, तहसिलदार अलिबाग म्हणून कामकाज पाहिले. त्यानंतर उपजिल्हाधिकारी म्हणून भूसंपादन अधिकारी ठाणे, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळात महाव्यवस्थापक, भूमी व प्रादेशिक अधिकारी म्हणून काम पाहिले. सध्या उपविभागीय अधिकारी अलिबाग म्हणून कार्यरत.
कामगारांसाठी कल्याणकारी योजनांची प्रभावी अंमलबजावणी, सन 2005च्या महापूरात उल्लेखनीय कार्य, उत्कृष्ट महिला महसूल अधिकारी म्हणून गौरव, महाराष्ट्र शासनातर्फे एकमेव महिला अधिकारी म्हणून सिंगापूर येथे आयोजित Ease of Doing Business अभ्यास दौऱ्यासाठी निवड, Magnetic Maharashtra Make in India Organised + Co-ordinater, Walk through with planble PM (Committee Member)
भारतीय निवडणूक आयोगातर्फे 2019 विधानसभा निवडणुकीच्या कामासाठी राज्यस्तर/कोकण विभागातून सर्वोकृष्ट निवडणूक अधिकारी म्हणून गौरव, Action against Bunglows (Nirav Modi ect) सीआरझेड अंतर्गत अनधिकृत बंगल्यांवर धडक कारवाई, निसर्ग चक्रीवादळ उत्कृष्ट कामगिरी, करोना योध्दा म्हणून गौरव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, अलिबाग प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा अध्यक्ष यांच्याकडून उत्कृष्ट कामगिरीबाबत गौरव पत्र. राष्ट्रीय महामार्गासाठीची भूसंपादन प्रक्रिया विक्रमी वेळेत पूर्ण करण्यात यश.
जनतेची अशीच कार्यतत्पर सेवा करण्याचा निर्धार, शासनाच्या माध्यमातून स्त्रियांना आत्मनिर्भर व अन्यायाविरुद्ध लढण्यास सक्षम करण्याचे प्रयत्न चालू ठेवण्याचा संकल्प.
वैशाली परदेशी-ठाकूर, उपविभागीय अधिकारी, कर्जत
सन 2007 पासून आजपर्यंत महसूल विभागात कार्यरत. यापूर्वी महाराष्ट्र राज्य सेवा आयोगामार्फत पीएसआय, तहसिलदार, पोलीस उपअधीक्षक पदावर निवड. परिविक्षाधीन तहसिलदार म्हणून ठाणे येथे तर सुधागड-पाली येथे तहसिलदार, ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात सामान्य प्रशासन शाखा तहसिलदार म्हणून रत्नागिरी येथे रजा राखीव तहसिलदार म्हणून तर ठाणे येथे अकृषिक तहसिलदार या पदांवरचा अनुभव.
रायगड जिल्ह्यात सध्या उपविभागीय अधिकारी तथा उपदंडाधिकारी, कर्जत येथे काम करताना टंचाईमुक्त कर्जत, टंचाईमुक्त रायगड जिल्हा व्हायला हवा, या दृष्टीकोनातून प्रयत्न. पाणी फाउंडेशनच्या धर्तीवर कर्जत उपविभागातील मोग्रज या गावी ग्रामस्थांना विश्वासात घेऊन जलसंधारणाचे काम यशस्वी केले. अशा प्रकारे जिथे जिथ ग्रामस्थांची एकजूट होईल तिथे तिथे जलसंधारणाचे काम यशस्वी करण्यासाठी प्रयत्न करीत आहेत.
प्रशाली जाधव-दिघावकर, उपविभागीय अधिकारी, माणगाव
माणगाव उपविभागीय अधिकारी प्रशाली जाधव-दिघावकर यांनी कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनेंतर्गत कोविड केअर सेंटर, उपजिल्हा रूग्णालय येथे दक्षिण रायगडसाठी आयसोलेशन सेंटर स्थापन करण्यात, गरजेनुसार अॅम्बुलन्स अधिग्रहित करण्यात महत्वाची भूमिका निभावली. कोरोना विषाणू संक्रमण बाबीशी संबंधित आरोग्य यंत्रणा, पोलीस यंत्रणा, स्थानिक स्वराज्य संस्था, नगरपंचायत तसेच व्यापारी असोशिएशन यांच्या सातत्याने बैठका घेऊन कोरोना विषाणूचा प्रसार कसा थांबविता येईल औषधोपचाराचा पुरेसा साठा राहील, या दृष्टीने अथक प्रयत्न केले. या उपाययोजनांमुळे कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यूदर अगदी नगण्य ठेवण्यात यश मिळविले.
दि. 3 जून 2020 रोजी येणाऱ्या निसर्ग चक्रीवादळाबाबतची जिल्हा प्रशासनाकडून पूर्वसूचना मिळाल्यानंतर सर्व यंत्रणांशी समन्वय साधून उपविभागातील माणगाव व तळा येथील सर्व गावांमधील नागरिकांना त्याबाबतची संपूर्ण माहिती देऊन घराबाहेर न पडण्याचे आवाहन केले. तसेच धोक्याच्या ठिकाणी राहणाऱ्या नागरिकांना अत्यंत कमी वेळेत सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित केले. त्यामुळे दोन्ही तालुक्यात जीवितहानी टाळता आली.
संपूर्ण तालुक्यात वीजपुरवठा खंडीत झाल्यामुळे वीज व पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला होता. या परिस्थितीवर मात करण्यासाठी तातडीने मुंबई-पुणे येथून जनरेटर्स तसेच इतर जिल्ह्यातील अतिरिक्त वीज कर्मचारी मागविले. हायड्रा, पोकलेन, जे.सी.बी सारखी साधने उपलब्ध करुन घेऊन वाहतुकीसाठी रस्ते खुले केले. झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करुन बाधितांना शासकीय मदत वाटप केली.
कातकरी उत्थान अभियानांतर्गत माणगाव व तळा येथे शिबीर आयोजित करुन कातकरी बांधवांना मोठया प्रमाणावर जातीचे दाखले, नॉन क्रिमीलेयर तसेच उत्पन्न, जेष्ठ नागरीक दाखल्यांचे वाटप केले. तसेच नवे रेशनकार्ड, आधारकार्ड तसेच त्यांची दुरुस्ती करुन दिली. कातकरी घरठाण अंतर्गत कातकरी समाजाचे शासकीय जमिनीवरील, वनजमिनीवरील तसेच खाजगी जमिनीवरील अतिक्रमणे नियमानुकूल केली. तसेच वनहक्क कायद्यांतर्गत दळी क्षेत्र, सामूहिक वनहक्क दावे तसेच वैयक्तिक वनहक्क दावे मंजूर केले.
माणगाव उपविभागाच्या दृष्टीने अतिमहत्वाच्या सर्व शासकीय इमारतींसाठी जसे उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या ब्रेक टेस्ट ट्रॅककरीता जागा, खार भूमी संशोधन प्रकल्प, कोकण विभागीय क्रीडा संकुल, सायन्स आणि टेक्नॉलॉजी पार्क, युवा वसतिगृह, हेलिपॅड, नाट्यगृह, घनकचरा व्यवस्थापनासाठी निक्षेपण भूमी, मंडळ अधिकारी व तलाठी कार्यालयांसाठी जागा उपलब्ध करुन घेण्याचे काम केले.
या कार्यालयाकडे असलेल्या दिल्ली मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडोअर अंतर्गत पाणसई, वावेदिवाळी, निजामपूर व रोहा माणगाव औद्योगिक क्षेत्रातील जमिनीचे भूसंपादन, इंदापूर आगरदांडा रस्ता व माणगाव ते दिघी रस्त्याचे रुंदीकरण, राष्ट्रीय महामार्ग क्र.56 चे चौपदरीकरण, कोकण रेल्वे रोहा ते वीर या मार्गाचे दुपदरीकरणाचे भूसंपादन करुन या उपविभागामध्ये प्रगतीचा पाया मजबूत करण्याचे काम केले. त्याचबरोबर विविध लघु पाटबंधारे प्रकल्प, विविध प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनाचे कामही उपविभागीय अधिकारी प्रशाली जाधव-दिघावकर यांच्याकडून मोठ्या प्रमाणात करण्यात आले आहे.
उज्वला बाणखेले, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी तथा सहाय्यक प्राध्यापक, यशदा, पुणे
जिल्ह्याच्या जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी उज्वला बाणखेले या महिला अधिकारी तब्बल बावीस वर्षांपासून कृषी विभागात कार्यरत असून अनेक महत्वाच्या जबाबदाऱ्या त्यांनी पार पाडल्या आहेत. महसूल, कृषी व पशुसंवर्धन विभागाच्या वर्ग-1 अधिकाऱ्यांसाठी प्रशिक्षणाचे नियोजन व अंमलबजावणी. कृषी विभागाच्या आपत्ती व्यवस्थापन आराखडा तयार करण्यासाठी योगदान. डीओपीटी पुरस्कृत गरजांवर आधारित कृषी, कृषी विद्यापीठे व ग्रामविकास, वस्तू व सेवा कर, महिला व बालविकास, वखार महामंडळ, मेढा, महसूल विभागाचे एकत्रित कार्यक्रम. ई-फेरफार, भू-वन, आपले सरकार, भूजल पी.एफ.एम.एस. या संगणक प्रणालीच्या प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन. लँड टायटलिंग विषय समितीच्या कामकाजात सहभाग. परिविक्षाधीन महसूल व गृह विभागाच्या वर्ग-1 अधिकाऱ्यांच्या (राज्यातील व राज्याबाहेरील) एम.ए. विकास प्रशासन कार्यक्रम नियोजन व अंमलबजावणी. वसुंधरा प्रकल्पाच्या प्रशिक्षण कार्यक्रमात हायड्रोजीओलॉजी विषयाचा अंतर्भाव. राष्ट्रीय स्तरावर संस्थेचे प्रतिनिधित्व, सह्याद्री कृषी सन्मान पुरस्कार निवड समिती सदस्य.
ई-टेंडर विषयाचे विभागाचे प्रशिक्षण, बीटीएम प्रशिक्षण, आत्मा समिती सदस्यांचे प्रशिक्षण, धान्य बाजारांचे आयोजन, रामेती प्रशिक्षण, कार्यक्रमांची गरजांवर आधारित अंमलबजावणी. एम.ए.सी.पी. प्रकल्पाच्या कामाचे नियोजन, जिल्हा व विभाग आत्मा समन्वय.
शेतकरी मासिकाच्या रंगीत अंक प्रकाशनास सुरुवात, सदस्य संख्या 2.5 लाख पर्यंत वाढवली, प्रत्येक वर्षातून 8 विषय विशेषांक, सदस्यांच्या पत्ते नोंदीसाठी संगणक प्रणाली विकसित, महसूल जमेसाठी ग्रास प्रणाली सुरू केली, पत्रकारिता क्षेत्रातील तज्ञ व्यक्ती समाविष्ट, मासिक महसूलात वाढ, कृषी संलग्न विषयांवर माहितीवर भर, युरोप, ऑस्ट्रेलिया या देशातील कृषी व संलग्न विषयाच्या अभ्यासासाठी 650 शेतकऱ्यांच्या अभ्यास दौऱ्याचे यशस्वी आयोजन, कृषी पुरस्कार कार्यक्रमाचे आयोजन माहिती अधिकारी पदाचा अधिभार, कृषी पत्रकार शाळेचे आयोजन , कृषी कर्मण पुरस्कारसाठी कामकाज, प्रसारमाध्यमाचा विस्तार क्षेत्रात सहभाग, व्याख्याते म्हणून मार्गदर्शन.
कृषी चिकित्सालये, कृषी क्षेत्रात महिलांचा सहभाग, भीमथडी जत्रेच्या माध्यमातून शेतकरी महिला गटांना आर्थिक उत्पन्न वाढ करण्यासाठी काम, आत्मा धान्य महोत्सव सुरुवात, राज्यात चार कृषी विज्ञान केंद्रांवर कम्युनिटी रेडिओ केंद्राची स्थापना, जागतिक बँक सहाय्यित महाराष्ट्र जलसुधार प्रकल्प पाणलोट क्षेत्रात कृषी प्रक्रिया उद्योगासाठी काम, राज्यांतर्गत अभ्यास दौरे, कृषी विज्ञान मंडळ-शेतकरी गटासाठी काम, पिक कर्ज समितीचे कामकाज.
बी.आय.एस. मानांकनाची कंपनी नोंदीमध्ये अंतर्भाव, अनेक प्रलंबित प्रकरणांचा निपटारा, बायोफर्टिलायझर तपासणी निकषांची मांडणी. आकाशवाणी व दूरदर्शनवर अनेक कृषी विषयक कार्यक्रम, नमुना तपासणी पद्धतीमध्ये कोडींगची सुरुवात, संगणक प्रणालीचा वापर करण्यास सुरुवात, आंतरराज्य प्रयोगशाळा तपासणी कामकाज, पुरातन फॉर्मची विविध पद्धतीने विल्हेवाट, उर्वरित अंश तपासणी प्रयोगशाळेच्या कामकाजात सुधारणा सुरुवात.
सद्य:स्थितीत कृषी क्षेत्रापुढील महत्त्वाच्या समस्यांवर स्मार्ट प्रकल्पाच्या माध्यमातून अनेक कामे करण्यास वाव आहे. यापूर्वी आत्मा, महाराष्ट्र जलसुधार प्रकल्प या जागतिक बँक सहाय्यित प्रकल्पामध्ये काम केले आहे. त्याचप्रमाणे कृषी सहसंचालक पदाचा अधिभार दोन वर्ष यशस्वीरीत्या सांभाळला आहे. आजपर्यंतच्या कृषी विभागातील त्यांच्या 22 वर्षाच्या अनुभवाचा उत्तम वापर करून रायगड जिल्ह्याच्या कृषी विकासात भरीव योगदान देण्याचा त्यांचा संकल्प आहे.
चारुशिला चव्हाण, जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख,
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परिक्षा उत्तीर्ण होऊन शासकीय सेवेत सन 2001 पासून रुजू तर रायगड जिल्ह्यात जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख या पदावर सन 2018 मध्ये रुजू. आजपर्यंत 15 पैकी फक्त 8 अधिकारी व 50% कर्मचारी उपलब्ध असतानाही रायगड जिल्ह्याचे कामकाज कायम पहिल्या पाच व दहा क्रमांकावर आहे. सन 2010-12 या कालावधीत नगर भूमापन मुलुंड या पदावर काम केले. यादरम्यान आधुनिक कार्यालय निर्माण करण्याच्या दृष्टीने कार्यालयात टपालाचे सॉफ्टवेअर स्थापित करणे, त्याद्वारे कर्मचारी यांना टपाल वाटप करणे, कार्यालयात कॅमेरे बसविणे, बायोमेट्रीक डिव्हाईस पध्दत आवलंबणे, परिरक्षण भूमापक यांच्या कडून रिव्हाचे काम पूर्ण करुन घेवून त्याची प्लॉटरद्वारे छपाई करुन नगर भूमापन अभिलेख अद्यावत ठेवणे अशी कामे यशस्वीपणे पार पाडली. सन 2012-16 या कालावधी जिल्हा अधीक्षक भूमि अभिलेख संलग्न उपसंचालक भूमी अभिलेख कोंकण प्रदेश मुंबई या पदावर काम केले. या कार्यकाळात अधिनस्त जिल्ह्यातील एकत्रीकरण अर्जाचा निपटारा करण्यासाठी विशेष मोहीम, कॅम्प आयोजित करुन प्रलंबित अर्जांचा निपटारा केला. सन 2016-18 या कालावधीत स्टुडिओ मॅनेजर, चित्रनगरी दादासाहेब फाळके, मुंबई येथे स्टुडिओ मॅनेजर या पदावर काम केले. विशेष बाब म्हणजे या ठिकाणी शुटींग पुन्हा सुरु करण्यासाठी यश मिळविले. सर्व निर्मात्यांना जास्तीत जास्त मूलभूत सुविधा देण्यासाठी प्रयत्न केला. तसेच जास्तीत जास्त महसूल वसूली उद्दिष्ट साध्य केले.
सध्या भूमी अभिलेख विभागामध्ये सुरु असलेल्या राष्ट्रीय भूमी अभिलेख आधुनिकीकरण कार्यक्रमांतर्गत अभिलेखांच्या स्कॅनिंगचे (ई-अभिलेख) काम पूर्ण केले. तसेच भूमापन नकाशांचे डिजिटायझेशन (ई-नकाशा), मिळकत पत्रिकांचे रिस्ट्रक्चरींग (ई-पीसीआयएस), ड्रोन सर्वे इ. कामे अंतिम टप्यात आहेत. तसेच कार्यालयातील व अधिनस्त कार्यालयाकडील अभिलेखे सहा गठ्ठा पध्दतीने व सहज उपलब्ध होतील यादृष्टीने जतन करण्यासाठी तसेच कार्यालयात स्वच्छतेसंबंधी व मूलभूत सोयीसुविधा उपलब्ध करुन देण्याबाबत प्रयत्नशील. एक खिडकी योजना यशस्वीपणे राबवून लोकाभिमुख प्रशासनाच्या दृष्टीने उल्लेखनीय काम.
वडील सेवानिवृत्त अपर जिल्हाधिकारी असल्याने लहानपणापासूनच प्रशासनात काम करण्याची इच्छा व जिद्द. साहजिकच वडिलांचे सहकार्य व मार्गदर्शन लाभले. तसेच विवाहानंतर पती डॉ.सुंदरसिंग राठोड बालरोग तज्ञ असून त्यांचे स्वतःचे हॉस्पिटल आहे. त्यांचेदेखील सहकार्य व मागदर्शन लाभले. मुलगा कु. प्रणव राठोड अमेरिकेत कॉम्प्युटर सायन्सचे शिक्षण घेत आहे. एक उच्च शिक्षित यशस्वी शासकीय अधिकारी, पत्नी, आई,कलाकार म्हणून सर्व क्षेत्रात यशस्वी. नृत्य, सितारवादन यात निपुण.
श्रीम.शितल विष्णू पुंड, उप मुख्य कार्यकारी अधिकारी, ग्रामपंचायत विभाग, रायगड जिल्हा परिषद
दि.1सप्टेंबर 2018 रोजी ग्रामपंचायत विभाग, रायगड जिल्हा परिषद, अलिबाग येथे उपमुख्य कार्यकारी अधिकारी या पदावर रुजू. दि.16 ऑगस्ट 2019 रोजी कोल्हापूर-सांगली जिल्हयातील पूरग्रस्त गावांना प्रत्यक्ष भेट देऊन जीवनावश्यक वस्तूचे वाटप केले. सन 2019-20 मध्ये अनुसूचित जमातीसाठी राखीव असलेल्या कंत्राटी ग्रामसेवक या पदाकरीता भरती प्रक्रिया यशस्वीपणे राबविली. सन 2020-21 मध्ये 10 उमेदवारांना अनुकंपाखाली नियुक्ती देण्यात आली. कर्मचाऱ्यांची भविष्य निर्वाह निधीची 100 टक्के प्रकरणे निकाली काढली. सन 2019-20 मध्ये जनसुविधा अंतर्गत 315 काम मंजूर होती. त्यापैकी 299 कामांना प्रशासकीय मंजूरी देवून प्राप्त झालेल्या निधीचे यथायोग्य् वाटप. सन 2019-20 मध्ये नागरी सुविधा अंतर्गत 22 कामे मंजूर होती. त्यापैकी 14 कामांना प्रशासकीय मंजूरी देऊन प्राप्त झालेला निधी वाटप केला. सन 2019-20 मध्ये राष्ट्रीय ग्राम स्वराज्य अभियानांतर्गत रायगड जिल्हयातील 18 ग्रामपंचायत दुरुस्तीकरीता अनुदान रक्कम रुपये 72 लक्ष एवढा निधी वाटप केला.
सन 2020-21 मध्ये राष्ट्रीय ग्राम स्वराज्य अभियानांतर्गत रायगड जिल्हयातील 4 ग्रामपंचायतींना नवीन इमारत बांधकाम मंजूरी रक्कम रुपये 80 लक्ष एवढा निधी मंजूर असून पुढील कार्यवाही लवकर पूर्ण होण्यासाठी प्रयत्नशिल. सन 2020-21 मध्ये राष्ट्रीय ग्राम स्वराज्य अभियानांतर्गत रायगड जिल्हयातील 8 ग्रामपंचायतींना नागरी सुविधा केंद्र मंजूरी मिळाली असून 32 लाख निधी मंजूर असून पुढील कार्यवाही लवकर पूर्ण होण्यासाठी प्रयत्नशिल.
सन 2018-19 व सन 2019-20 करीता तालुका व जिल्हा स्मार्ट ग्राम योजनेंतर्गत आर. आर. (आबा) पाटील सुंदर गाव पुरस्कार योजना या नावाने घोषित केलेल्या ग्रामपंचायतींना दि. 16 फेब्रुवारी 2021 रोजी त्यांच्या पुण्यतिथी निमित्त दि. 16 फेब्रुवारी 2021 रोजी पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांच्या हस्ते व इतर पदाधिकारी/अधिकारी यांच्या उपस्थितीत पुरस्कारप्राप्त ग्रामपंचायतींना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. त्याचप्रमाणे मुख्य् कार्यकारी अधिकारी डॉ.किरण पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या कार्यक्रमाबाबत व या योजनेबाबत ग्रामपंचायत, पंचायत समिती व जिल्हा परिषद स्तरावरुन वृत्तपत्रिका, भित्तीपत्रके, बॅनर व इतर माध्यमातून प्रसिद्धी करण्यात आली.
14 व्या वित्त आयोगांतर्गत रायगड जिल्ह्याकरिता रु.332 कोटी 75लक्ष 82 हजार 222 इतका निधी गटस्तरावर वर्ग केला. 15 व्या वित्त आयोगांतर्गत रायगड जिल्हाकरिता रु.77 कोटी 63 लक्ष 16 हजार इतका निधी प्राप्त असून त्यापैकी रु.62 कोटी 10 लक्ष 52 हजार इतका निधी ग्रामपंचायतींना व रु. 7 कोटी 76 लक्ष 32 हजार इतका निधी पंचायत समितींना वर्ग केला.
कोविड-19 विषाणूचा प्रादूर्भाव नियंत्रित करण्यासाठी राज्यातील व परराज्यातील विस्थापित कामगार, निराश्रीत व्यक्ती, प्रवासादरम्यान अडकलेल्या व्यक्ती यांना निवारागृहामध्ये सकाळचा नाष्टा, दुपारचे व रात्रीचे भोजन यासह निवारा व वैद्यकीय सुविधा देण्याबाबत तसेच मदत छावणीमध्ये आश्रय घेतलेल्या व्यक्तींकरीता तात्पुरती राहण्याची व्यवस्था, अन्न, वस्त्र, निवारा व वैदयकीय देखभाल यासाठी प्रति ग्रामपंचायतीस रु.5,000/- प्रमाणे 15 तालुक्यातील 809 ग्रामपंचायतीकरीता रक्कम रु.40 लाख 45 हजार इतका निधी वाटप करण्यात आला.त्याचबरोबर जिल्हाधिकारी निधी चौधरी, तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप हळदे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील पहिले कोविड रुग्णालय तसेच एमजीएम रुग्णालय कळंबोली येथे कोविड रुग्णांसाठी स्वतंत्र कक्ष उभारण्याच्या कामात मोलाचा सहभाग.
रायगड जिल्ह्यात दि.03 जून 2020 रोजी निसर्ग चक्रीवादळामुळे सार्वजनिक ठिकाणी जमा झालेला कचरा व ढिगारे उचलण्यासाठी अलिबाग, मुरुड, श्रीवर्धन, म्हसळा, तळा, माणगाव, रोहा, पेण, सुधागड या तालुक्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीस रु.5000/- प्रमाणे 21 लक्ष 55हजार इतका निधी वितरीत केला. तसेच गट विकास अधिकारी पंचायत समिती अलिबाग, मुरुड, श्रीवर्धन, म्हसळा, तळा, माणगाव, रोहा, खालापूर, सुधागड, महाड, पनवेल यांना कचरा व ढिगारे उचलण्यासाठी रु.63 लक्ष 90 हजार 522 इतका निधी वितरीत केला. आणि निसर्ग चक्रीवादळामुळे मोठया प्रमाणात झाडे पडून निर्माण झालेला कचरा हटविण्यासाठी, पडलेली झाडे तोडण्याकरिता वूड कटर खरेदीसाठी विकास अधिकारी, पंचायत समिती म्हसळा, अलिबाग, मुरुड, माणगाव, तळा यांना रु. 9 लाख 45 हजार इतका निधी वितरीत केला.
उर्मिला कांतीलाल पवार, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, पेण जि. रायगड
परिवहन विभाग राज्यास महसूल मिळवून देणारा अग्रेसर विभाग आहे. पूर्वी या विभागात महिलांचे प्रमाण नगण्य होते. मात्र महाराष्ट्र शासनाच्या 1994 च्या शासकीय सेवेसाठी महिला आरक्षण धोरणाची अंमलबजावणी केल्यापासून या विभागात अधिकारी संवर्गात वरिष्ठ पदावर महिला अधिकारी कार्यरत आहेत. या पदासाठी आवश्यक प्रशिक्षण व कामाच्या जबाबदाऱ्या यामुळे या विभागात महिलांनी काम सांभाळणे आव्हानात्मक आहे.
उप प्रादेशिक परिवहन अधिकारी उर्मिला कांतीलाल पवार यांनी शैक्षणिक पात्रतेनुसार शिक्षकी पेशा स्विकारला होता. विवाहानंतर महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत स्पर्धा परिक्षेच्या माध्यमातून विक्रीकर निरीक्षक, नायब तहसिलदार व सन 2002 मध्ये सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी या पदासाठी निवड होऊन शासकीय सेवेत रूजू. परिवहन विभागात सन 2002 मध्ये सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी या पदावर रुजू झाल्यानंतर पुणे, सातारा, बारामती, कोल्हापूर येथे सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी काम केले. प्रादेशिक, जिल्हा व तालुका स्तरावरील कार्यालयात काम केल्याने, शहरी व ग्रामीण प्रशासनाचा अनुभव, लोकांची मानसिकता, प्रादेशिक समस्या यामुळे प्रत्येक ठिकाणी कामाची कसोटी लागते. त्यामुळे प्रसंगानुरुप काम करणे व त्यानुषंगाने निर्णय घेण्यासाठीची क्षमता व कौशल्य वृद्धींगत होण्यास मदत झाली .
जानेवारी 2018 मध्ये पदोन्नतीने उप प्रादेशिक परिवहन अधिकारी या पदावर पेण येथे रुजू. पेण येथे कार्यालय प्रमुख म्हणून काम करताना या सर्व ठिकाणच्या अनुभवाचा फायदा निश्चित झाला. कार्यालयाचे संगणकीकरण- संगणकीकरणाच्या माध्यमातून शासकीय सेवा ऑनलाईन देणे, कार्यालयीन कामकाजात पारदर्शकता आणणे, कामाचा जलद निपटारा करणे व कामाचे मूल्यांकन संगणकाच्या सहाय्याने करता येत असल्याने विभागाचा उद्देश साध्य करण्यासाठी मदत झाली. 2018 मध्ये फक्त 25 टक्के संगणकीकरण असलेल्या पेण कार्यालयाचे आजमितीस जवळपास 100 टक्के संगणकीकरण पूर्ण झाले आहे. यामुळे संगणकीकरणाच्या माध्यमातून जनतेची सोय करता आली व कर्मचाऱ्यांच्या कमतरतेवर मात करता आली. त्यांच्या क्षमतेमध्येही वाढ झाली.
आज उप प्रादेशिक परिवहन कार्यालय पेण कार्यालयातील वाहन व परवानाविषयक सर्व कामे शासनाच्या VAHAN व SARTHI या प्रणालीद्वारे होत असून, अंमलबजावणीचे काम E-Challan प्रणालीवर होत आहे. उप प्रादेशिक परिवहन कार्यालय पेण कार्यालयाचे कार्यक्षेत्र 11 तालुक्याचे असून जिल्ह्यातील वाहन अपघातांचे प्रमाण जास्त आहे. या भागातील दुर्गम व घाटरस्ते यामुळे वाहनचालकांचे कौशल्य महत्वाचे असते. या भागात आंबेनळी-पोलादपूर, कशेडी, वरंध, ताम्हीणी यासारखे घाटरस्ते असल्याने अपघातांचे प्रमाण जास्त आहे. विशेषतः जुलै 2018 मधील आंबेनळी घाटातील दुर्घटना अत्यंत आव्हानात्मक होती कारण या अपघातात बसमधील 30 व्यक्ती मृत पावल्या होत्या. या पार्श्वभूमीवर शासनाने विभागीय आयुक्त, कोकण विभाग यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या विश्लेषण समितीमध्ये सदस्य सचिव म्हणून काम पार पाडले. याच माध्यमातून रस्ता अपघातांना आळा घालण्यासाठी, जिल्हा रस्ता सुरक्षा समिती रायगड मध्ये समावेश असलेल्या सर्व विभागांच्या समन्वयाने अपघाताचे प्रमाण कमी करण्यासाठी प्रयत्न केले. याचे फलित म्हणून सन 2019-20 वर्षात, सर्वोच्च न्यायालयाने अपघाताचे प्रमाण 10 टक्क्यांनी कमी करण्याच्या लक्षांकाच्या तुलनेत रायगड जिल्ह्याने जनजागृती करुन, इतर आवश्यक उपाययोजना राबवून अपघातांचे प्रमाण 31 टक्क्यांनी कमी केल्याने राज्यात रायगड जिल्ह्यास प्रथम क्रमांक मिळाला. मुख्यमंत्री महोदयांच्या हस्ते रायगड जिल्ह्याला पुरस्कार प्रदान करण्यात आला.
प्रत्येक परिवहन कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात वाहनांच्या फिटनेससाठी BTT ट्रॅक उभारणी करावयाचे होते. त्यादृष्टीने विशेष प्रयत्न करुन मौजे जिते ता.पेण येथे ही सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली. याशिवाय दक्षिण रायगड मधील 8 तालुक्यातील वाहनचालक, वाहनधारकांसाठी पालकमंत्री कु.आदिती तटकरे, जिल्हाधिकारी निधी चौधरी व स्थानिक प्रशासनाच्या सहाय्याने 2 हेक्टर क्षेत्र ता.माणगाव येथे उपलब्ध झाले. त्या ठिकाणीही दक्षिण रायगड मधील 8 तालुक्यातील वाहनचालक व वाहनधारकांसाठी उत्कृष्ट सेवा देणारे परिवहन सेवा केंद्र नजिकच्या काळात निर्माण करण्याचा प्रयत्न करण्याचा संकल्प.
कोविड-19 च्या कालावधीत परिवहन विभागाने जिल्हा प्रशासनास रुग्णवाहिकांची उपलब्धता करुन देणे, रेल्वे प्रशासनाबरोबर समन्वय ठेऊन, परराज्यातील मजूर व लोकांना प्रवासासाठी मदत करणे व आवश्यक सुविधा पुरविणे , रायगड जिल्ह्यातील ऑक्सिजन उत्पादक कंपन्यांना लॉकडाऊन कालावधीत ऑक्सिजन पुरवठा सुरळीत राहण्यासाठी टँकर्स उपलब्ध करुन देणे, यासाठी विभागातील सहकाऱ्यांचे, जिल्हा प्रशासनाचे अमूल्य योगदान.
रायगड जिल्ह्यात निसर्ग वादळामुळे झालेल्या नुकसानग्रस्त भागात परिवहन विभागाने रूग्णवाहिका, जेसीबी, क्रेन्स उपलब्ध करून देऊन वाहतूक सुरळीत राहण्यासाठी जिल्हा प्रशासनाबरोबर काम करुन अमूल्य योगदान दिले. या माध्यमातून, परिवहन विभागाने, विभागाचे नियमित कामकाज करताना सामाजिक बांधिलकी जपली.
डॉ.अरुणा बळीराम जाधव, तहसिलदार पेण
शासकीय सेवेत सन 2007 मध्ये रुजू. सन 2016 मध्ये कुर्ला येथे संजय गांधी योजना तहसिलदार पदावर असताना सर्व लाभार्थ्यांना ऑनलाइन अनुदान प्राप्त होण्यासाठी पुढाकार घेऊन ती संकल्पना यशस्वी केली. बँकेतून चेकमार्फत अनुदान मिळण्यास विलंब होत असल्यामुळे सर्व योजनांचा डाटा ऑनलाईन करून सर्व लाभार्थींना एकाच दिवशी अनुदान मिळेल, या दृष्टीने योग्य त्या उपाययोजना केल्या. एचआयव्ही बाधित व्यक्तींसाठी काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्थांची बैठक घेऊन एचआयव्ही बाधित व्यक्तींना योजनेचा लाभ देण्याची कार्यवाही पूर्ण केली.
ऑगस्ट 2019 च्या महापूरात पेण तालुक्यातील अंतोरे येथे रात्रभर मुसळधार पावसात स्वत: उपस्थित राहून जवळपास 70 महिला, वृद्ध, गरोदर स्त्रिया, मुलांना सुखरुपपणे सुरक्षित ठिकाणी नेले. महापूरात सलग 48 तास काम तर केलेच परंतू त्याच सकाळी खारेपाट भागात पूर परिस्थिती निर्माण झाल्याने त्या ठिकाणी तात्काळ भेट देऊन एनडीआरएफ कोस्टल रेस्क्यू टीम यांच्या सहाय्याने अनेक नागरिकांना तातडीने सुरक्षित स्थळी नेले.
कार्यालयीन स्वच्छतेवर नेहमीच भर दिला. दिव्यांग बांधवांची कामे वेळेत पूर्ण होण्यासाठी महिन्याचा शेवटचा गुरुवार हा दिव्यांग बांधवांसाठी राखीव ठेवला. कोविड-19 च्या काळात मोठ्या प्रमाणात परप्रांतीय मजूरांची नोंदणी व त्यांना तसेच स्थानिकांना मदत करण्याचे कार्य जबाबदारीने पार पाडले. जिल्हाधिकारी निधी चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली पेण येथील उपजिल्हा रुग्णालयाचे सुयोग्य असे नियोजन केले. रुग्णालयामध्ये सीएसआर फंडातून कामकाज करून घेऊन रूग्णालयात अनेक सुधारणा केल्या. कोविड काळात बचतगटांना प्रोत्साहन देऊन कामकाज उपलब्ध करून दिले, प्रशासकीयदृष्ट्या दिव्यांग, महिला, वृद्ध यांना शासकीय योजनांचा जास्तीत जास्त लाभ मिळवून देणे आदिवासी बांधवांमध्ये आरोग्य, शिक्षण याबाबत जागरुकता वाढविण्याचे काम सुरुच असून ते वाढविण्याचा संकल्प केला आहे.
डॉ.दीप्ती देशमुख, गटविकास अधिकारी, पंचायत समिती, अलिबाग
जानेवारी 2020 पासून अलिबाग पंचायत समितीमध्ये येथे कार्यरत. कोविड-19 च्या संकटात ग्रामपंचायत कार्यालय, कोविड केअर सेंटर, प्रतिबंधित क्षेत्र व्यवस्थापन, परप्रांतीय मजूर व्यवस्था व स्थानांतरण प्रक्रिया अशा विविध पातळीवर उल्लेखनीय कामकाज. “माझे कुटुंब माझी जबाबदारी” मोहिमेद्वारे शिक्षण विभाग, ग्रामपंचायत व आरोग्य विभाग तसेच उपलब्ध स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी यांच्या सहकार्यातून कामकाज. करोना कालावधीत विविध करोना अति प्रभावी क्षेत्रात, प्रतिबंधित क्षेत्रात भेटी देऊन लोकांना मार्गदर्शन तसेच रुग्ण व नातेवाईकांना समुपदेशन.
केंद्र शासनाच्या जल जीवन मिशन अभियानांतर्गत सन 2019-20 व 20-21 या वर्षातील वैयक्तिक नळजोडणी चे शंभर टक्के उद्दिष्ट साध्य, 253 शाळा व 266 अंगणवाड्यांना नळजोडणी व पाणीपुरवठा सुविधा उपलब्ध करून दिली. मंजूर सर्व घरकुलांना शंभर टक्के हप्त्यांचे वितरण, प्रलंबित आरसीसी, प्रलंबित घरकुल बांधकामे याबाबतचे कामकाज महा आवास अभियान या शासनाच्या महत्वाकांक्षी योजनेमध्ये संपूर्ण तालुक्यातून आजअखेर 729 घरकुले प्रस्ताव मंजूर केले. पैकी 2020-21 या वर्षातील मागील तीन महिन्यात 205 लाभार्थी प्रस्ताव मंजूर करुन घरकुल लाभार्थ्यांना लाभ दिला. या वर्षामध्ये आजअखेर 462 घरकुलांचे बांधकाम पूर्ण करण्यात आले.
2020-21 या वर्षात तीनशेपेक्षा अधिक स्वयंसाहाय्यता बचतगटांची निर्मिती, बचतगटांना फिरती निधी बँक कर्ज मिळवून देण्याबाबत 70 टक्केहून अधिक कामकाज पूर्ण. जवळपास 330 गटांचे कर्ज प्रस्ताव मंजूर करण्यामध्ये महत्त्वाचे योगदान. स्वच्छ भारत मिशन अंतर्गत शासनाकडून मंजूर सर्व सार्वजनिक शौचालयांची बांधकामे पूर्ण करून ते कार्यान्वित तसेच स्वच्छ भारत मिशन टप्पा चे शंभर टक्के लाभार्थ्यांना लाभ देण्यात आला. वैयक्तिक शौचालयाच्या स्वच्छ भारत मिशन टप्पा अंतर्गत निवडलेल्या गावांचे घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन प्रस्ताव व डीआयआर तयार करण्याचे काम पूर्ण तसेच सार्वजनिक शौचालय व वैयक्तिक शौचालय 70 टक्के लाभार्थ्यांना लाभ देण्याचे कामकाज पूर्ण केले.
सर्व ग्रामपंचायतीचे लेखे अद्ययावतीकरण नियमित करण्यासाठी पाठपुरावा. सर्व पंचायतीकडून ऑनलाईन दाखले देण्याची कार्यवाही पूर्ण. विविध योजनांतर्गत कृषी विभाग, पशुसंवर्धन विभाग, लाभार्थी निवड पूर्ण व काम देण्याची प्रक्रिया प्रगतीपथावर. मनरेगा अंतर्गत प्रत्येक ग्रामपंचायतनिहाय किमान पाच कामांचे नियोजन व अंमलबजावणी सुरु. गटविकास अधिकारी डॉ.दिप्ती देशमुख यांनी 2020-21 या वर्षअखेर सर्व योजनांची शंभर टक्के उद्दिष्टपूर्ती करण्याचा संकल्प केला आहे.
डॉ.निलम गाडे, गटविकास अधिकारी, पंचायत समिती, उरण
नीलम गाडे, उरण पंचायत समिती येथे गटविकास अधिकारी या पदावर नोव्हेंबर 2017 पासून कार्यरत. करोना कालावधीत कोविड-19 बाबत प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये लोकांना मोबाईल व्हॅन मार्फत व व्हाट्सअॅप द्वारे दवंडी देऊन मार्गदर्शन केले. घराबाहेर पडू नका, मास्क वापरा, सॅनिटायझर चा वापर करा इत्यादीबाबत मार्गदर्शन व आवाहन केले.
“माझे कुटुंब माझी जबाबदारी” मोहिमेत सक्रिय सहभाग. केंद्र शासनाच्या जल जीवन मिशन अभियानांतर्गत उरण तालुका राज्यामध्ये पहिला आला. पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते सन्मानपत्र बहाल करण्यात आले.
महा आवास अभियानातून घरकुलांचे काम शंभर टक्के पूर्ण करण्याचा , सर्व ग्रामपंचायतीचे लेखे अद्ययावत करण्याचा, कृषी, पशु, महिला बालकल्याण इत्यादी विभागाशी निगडीत असलेल्या योजनांचा सर्व ग्रामपंचायती व पंचायत समिती कार्यक्षेत्रातील लोकांना लाभ देण्याचा संकल्प केला आहे.
अर्चना आनंदराव दिवे, मुख्याधिकारी, पेण नगरपरिषद
शासकीय सेवेत दि.21 नोव्हेंबर 2008 रोजी रुजू. सन 2008 ते 2013 या कालावधीत सहायक संचालक, नगरपरिषद प्रशासन संचालनालय, सन 2013 ते 2015 या कालावधीत रजा राखीव मुख्याधिकारी, कोकण भवन, सन 2015 ते 2018 या कालावधीत मुख्याधिकारी श्रीवर्धन नगरपरिषद म्हणून काम पाहिले. त्यानंतर सन 2018 ते आजपर्यंत पेण नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी म्हणून कार्यरत.
श्रीवर्धन नगरपरिषद मुख्याधिकारी असताना भुवनाळे तळे, जीवनेश्वर तलाव सुशोभिकरणाचे काम यशस्वीपणे पार पाडले. श्रीवर्धन शहर हागणदारीमुक्त केले. तर पेण नगरपरिषद मुख्याधिकारी या पदावर असताना पेण शहराची पाणीपुरवठा योजना पूर्ण केली. पेण शहर हागणदारीमुक्त केले, तसेच स्वच्छ सर्वेक्षण मोहिमेंतर्गत चांगली कामगिरी केली. भविष्यात पेण शहराला प्लास्टिकमुक्त करणे, अद्यावत मच्छी मार्केट बांधणे, शहराच्या सभोवताली असणाऱ्या रिंग रोडचे काम करून शहरातील अतिरिक्त रहदारीचा भार कमी करणे, हा संकल्प.
सुरेखा भणगे, मुख्याधिकारी, खालापूर नगरपंचायत
खालापूर नगरपंचायतीच्या मुख्याधिकारी सुरेखा भणगे. कौटुंबिक परिस्थिती अगदी बेताची परंतु मुलगी हशार असल्याने शिक्षणात खंड पडू नये यासाठी आईवडिलांनी आश्रमशाळेत शिकविले. पुढे पदव्युत्तर शिक्षण पुण्यात पूर्ण केले. समाजाबद्दलची तळमळ " स्वस्थ न बसू देत नव्हती. जिल्हाधिकारी बनण्याचे स्वप्न पूर्ण होऊ न शकल्याने जाला पुन्हा त्याच जोमाने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा देऊन मुख्याधिकारी पदावर नियुक्ती होते.
मुख्याधिकारी झाल्यानंतर पहिली पोस्टींग खालापूर नगरपंचायत येथे. पदभार स्विकारल्यावर आलेले करोना संकट एक बाजूला आणि नगरपंचायत मधील भौगोलिक, सामाजिक आणि आर्थिक आदी इतर प्रश्न एका बाजूला. हे आव्हान स्वीकारुन या समस्यांचा योग्य मेळ घालून यशस्वीपणे कार्य करीत आहेत.
नगरपंचायत हद्दीत मोठ्या आदिवासी लोकवस्ती असून या आदिवासी महिलांच्या डोक्यावरील हंडा उतरविण्याचे काम यांनी केले. त्यामुळे दुर्गम आदिवासी वाड्यातील महिलांचा खूप मोठा प्रश्न सुटला आहे .
तालुक्यातील आदिवासी बांधवाचा शैक्षणिक, सामाजिक विकास व्हावा, यासाठी सुसज्ज अशा आदिवासी भवनाची पायाभरणी. जागतिक मूलनिवासी दिनाचे औचित्य साधून करण्यात आले असून लवकरच ते भवन पूर्णत्वास जाणार आहे.
अनुसूचित जातीच्या लोकांसाठी रमाबाई घरकुल आवास योजनेंतर्गत जिल्ह्यामधून सर्वाधिक प्रस्ताव समाजकल्याण विभागाकडे पाठविले. नागरिकांना शासनाच्या जास्तीत जास्त योजनेचा लाभ कसा मिळेल, यासाठी सर्वातोपरी प्रयत्न केले आहे. त्यांच्या कामाची दखल घेऊन जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी त्यांना प्रशस्तीपत्र दिले.
लॉकडाऊन काळात खालापूर नगरपंचायत हद्दीतील सर्व आदिवासी कुटुंबांचा स्थानिक प्रतिनिधींच्या माध्यमातून सर्व्हे करून तहसिल कार्यालय, सीएसआर फंड व काही दानशूर लोकांच्या सहकार्यातून एक महिन्याचा अत्यावश्यक किराणा व धान्य उपलब्ध करून लाभार्थ्यांपर्यत पोहचविले.
एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यातच खासगी डॉक्टर्स आणि खालापूर नगरपंचायतीमार्फत घरोघरी जावून नागरिकांची आरोग्य तपासणी केली.असेच उल्लेखनीय काम खोपोली नगरपरिषदेचा अतिरिक्त कार्यभार असताना तेथेही केले.
बहुसंख्य आदिवासी बांधव अजूनही कच्च्या घरात राहतात. किमान त्यांना स्वतःचे असे पक्के घर असावे, यासाठी जिल्हाधिकारी निधी चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली व आदिवासी प्रकल्प अधिकारी शशिकला अहिरराव यांच्या सहकार्यातून पक्के घरे मिळवून देण्यासाठी प्रयत्नशिल.
खालापूर नगर पंचायतीसाठी शुद्ध पेयजल देण्यासाठी नगरपंचायत फंडातून जल शुद्धीकरण प्रकल्प या वर्षाच्या सुरुवातीलाच कार्यान्वित केला. त्याचबरोबर, सीएसआर फंडातून वाड्यावस्त्यांना शुध्द पाण्यासाठी एकात्मिक स्वतंत्र फिल्ट्रेशनची पाणी योजना सुरु केली.
सीएसआर फंडातून खालापूरवासियांसाठी सार्वजनिक उद्यान तयार केले असून, त्यात खुली व्यायामशाळा, बालोद्यान आणि खुले ग्रंथालय सुरु केले.
मुख्याधिकारी सुरेखा भणगे यांनी नजिकच्या काळात संपूर्ण खालापूर डिजिटाईज्ड सुविधापूर्ण करण्याचा, नगरपंचायत क्षेत्रातील आदिवासींची संख्या लक्षात घेता तालुकास्तरीय आदिवासी भवन बांधून आदिवासी बांधवाच्या कौशल्य विकासासाठी त्याचा वापर करण्याचा तसेच रमाई आवास योजना, शबरी आदिवासी घरकुल योजना, पंतप्रधान आवास योजना या योजनांच्या माध्यमातून गरजूंना हक्काची घरे मिळण्यासाठी संकल्प केला आहे.
कु. माधुरी प्रभाकर मडके, मुख्याधिकारी, तळा नगरपंचायत
महाराष्ट्र शासनामध्ये पदार्पण केल्यानंतर ही पहिलीच नियुक्ती. माझ्या शासकीय सेवेची सुरुवात करोनाच्या संघर्षाने झाला. तळामधील इतर ज्येष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली करोनाला यशस्वी तोंड दिले. करोना असतानाच निसर्ग चक्रीवादळाने देखील धडक मारली, स्पर्धा परीक्षाचा अभ्यास करताना चक्रीवादळ अभ्यासले होते, परंतु एवढे मोठे प्रथमच अनुभवले, मात्र टीमच्या साहाय्याने योग्य ते मदतकार्य राबविले, या संकटाचा निश्चयाने मुकाबला केला.
तळा नगरपंचायत ही 2015 मध्ये स्थापन झालेली नवीन नगरपंचायत. परंतु नगरपंचायतच्या सहकाऱ्यांच्या सहाय्याने योजना राबविण्याचा प्रामाणिक प्रयत्न.
पीएम स्वनिधी, रमाई आवास योजना, शबरी आवास योजना, प्रधानमंत्री आवास योजना, वसुंधरा अभियान, स्वच्छ भारत मिशन अशा अनेक योजना लोकांपर्यंत यशस्वीरीत्या पोहोचविण्यात यशस्वी.
तळा नगरपंचायत मध्ये डंपिंग ग्राउंडसाठी लोकांचा विरोध होता परंतु त्यांना प्रेझेंटेशनद्वारे शास्त्रोक्त पध्दतीने डम्पिंग ग्राऊंड ची कार्यपध्दती व महत्व पटवून दिले. जिल्हाधिकारी निधी चौधरी यांच्या मार्गदर्शनामुळे हा प्रस्ताव शेवटच्या टप्प्यात असून लवकरच नगरपंचायतला स्वतःच्या डम्पिंग ग्राउंडसाठी जागा मिळेल.
तळा शहरात दुर्गम भाग असल्यामुळे बऱ्याचदा वीजपुरवठ्याची समस्या निर्माण होते. वीज नसली की पाणी नागरिकांपर्यंत पोहोचवता येत नव्हते. चौदाव्या वित्त आयोगाच्या निधीमधून डिझेल जनरेटर साठी पाठविलेल्या प्रस्तावास मंजूरी देखील मिळाली. तळा एक शहर असून स्वच्छ सर्वेक्षण मध्ये अव्वल दहामध्ये येण्याची क्षमता तळा नगरपंचायत मध्ये आहे. तळा शहरातील भित्तीचित्र, सेल्फी पॉईंट्स इत्यादींनी शहराच्या सौंदर्यात भरच पडली आहे. आगामी योजनेमध्ये पाणीयोजना, शोषखड्डे, भटकी गुरेमुक्त तळा अभियान, अशा विविध नाविण्यपूर्ण उपक्रम राबविण्यावर भर देण्यात येणार आहे. नगरपंचायत मध्ये ई-गव्हर्ननसवरही भर दिला जात आहे. 74 व्या घटना दुरुस्तीला राबविण्यासाठी, शासनाच्या येणाऱ्या योजना प्रत्यक्षात लाभार्थींपर्यंत पोहोचविण्यासाठी अहोरात्र प्रयत्न करण्याचा संकल्प.
डॉ. शीतल गणेश जोशी-घुगे, जिल्हा शासकीय रुग्णालय, अलिबाग
रायगड जिल्ह्यातील रोहा च्या कन्या आहेत. एम.बी.बी.एस. चे शिक्षण लोकमान्य टिळक वैद्यकीय महाविद्यालय सायन मुंबई येथे सन 2000 मध्ये पूर्ण झाले. सन 2001 व 2002 आंतरवासिता म्हणून सायन हॉस्पिटल येथे ट्रेनिंग घेतले. सन 2003 ते 2005 असे दोन वर्ष रोहा येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये वैद्यकीय अधिकारी म्हणून काम केले. जानेवारी 2009 मध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत निवड होऊन पुन्हा रायगड जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र इंदापूर तालुका माणगाव येथे रुजू. सन 2012 वैद्यकीय शिक्षण मंडळाच्या जी. एम. एस. सी.ई.टी. परीक्षेमार्फत सेवांतर्गत पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय ससून हॉस्पिटल पुणे येथे प्रवेश मिळाला. एमडी पॅथॉलॉजी चे शिक्षण पूर्ण करून जिल्हा सामान्य रुग्णालय अलिबाग येथे नोव्हेंबर 2015 मध्ये वैद्यकीय अधिकारी शरीर विकृती तज्ञ म्हणून रुजू. गरीब व गरजू रूग्णांची सेवा करण्याची संधी मिळाल्याचे समाधान. ग्रामीण भागातील रुग्णांना येणाऱ्या अडचणी व त्यांच्या आर्थिक परिस्थितीची जाणीव असल्यामुळे नेहमीच त्यांच्याबद्दल सहानुभूतीने वागणूक असते. मागील वर्षी 2020 हे संपूर्ण जगासाठी अतिशय भयानक परिस्थिती घेऊन आले. सुरुवातीच्या काळापासूनच स्वॅब तपासणीसाठीचे आय.सी.एम.आर. व एन.आय.सी.चे आरटीपीसीआर मोबाईल एप्लीकेशन कार्यान्वित करण्यासाठी रायगड जिल्ह्याची नोडल ऑफिसर म्हणून जबाबदारी सांभाळली. करोना संशयित रुग्णांच्या घशाचे स्वॅब घेण्याची जबाबदारी जिल्हा रुग्णालयातील शरीर विकृती तज्ञ यांच्यावर असल्यामुळे हे काम करणाऱ्या एकमेव महिला वैद्यकीय अधिकारी. रुग्णांची संपूर्ण माहिती घेऊन घेणे व आय.सी.एम.आर.च्या नियमांचे पालन करून स्वॅब जे.जे. हॉस्पिटल, मुंबई येथे पाठविण्याचे काम जबाबदारीने निभावले. जुलै महिन्यापासून जिल्हा रुग्णालय, अलिबाग येथे कोविड-19 च्या निदानासाठी रॅपिड अँटी जेन्ट टेस्ट व ट्र्युनट टेस्ट या चाचण्यांची सुरुवात डॉ.शितल जोशी-घुगे यांच्या निगराणीखाली सुरु झाली.
रायगड जिल्ह्यातील संशयित रुग्णांचे करोनासाठी लवकर निदान व वेळेत उपचार होऊन व्हावे, यासाठी जिल्ह्याच्या पालकमंत्री आदिती तटकरे यांच्या अथक प्रयत्नातून तसेच जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी निधी चौधरी, निवासी उपजिल्हाधिकारी पद्मश्री बैनाडे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुहास माने, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रमोद गवई यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा सामान्य रुग्णालय येथे आरटीपीसीआर प्रयोगशाळेची स्थापना करण्यात आली. या प्रयोगशाळेसाठी जागा निवडणे, योग्य मशीन निवडणे, आयसीएमआर च्या निर्देशानुसार प्रयोगशाळा तयार करणे, तपासणीसाठी योग्य किट निवडणे, हे अतिशय जिकरीचे काम यांनी डॉ. गजानन गुंजकर व रक्तपेढी विभागाचे प्रमुख डॉ. दीपक गोसावी, मायक्रोबायोलॉजिस्ट डॉ. फरहाना अत्तार यांच्या सहकार्याने जिद्दीने पूर्ण केले. डॉ. फरहाना अत्तार यांनी सर्व कर्मचाऱ्यांना प्रयोगशाळा तंत्रज्ञानाबाबत तसेच संपूर्ण चाचणीबाबत प्रशिक्षण देऊन तांत्रिक तज्ञ म्हणून काम पाहिले तर डॉ.घुगे यांनी नोडल अधिकारी म्हणून काम पाहिले. डॉ.शितल जोशी-घुगे, डॉ. गजानन गुंजकर , रक्तपेढी विभागाचे प्रमुख डॉ.दीपक गोसावी, मायक्रोबायोलॉजिस्ट डॉ. फरहाना अत्तार, या संपूर्ण टीमने चार संगणक चालक, आठ प्रयोगशाळा तंत्रज्ञ व दोन नर्स व दोन शिपाई यांच्या सहकार्याने आतापर्यंत 35 हजार स्वॅब नमुन्यांच्या तपासण्या पूर्ण केल्या आहेत.
रायगड जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकाला चांगले आरोग्य लाभण्यासाठी, सर्वांना उत्तम दर्जाची वैद्यकीय सुविधा योग्य वेळेत उपलब्ध होण्यासाठी, शासनाच्या संजीवनी ऑफ इंडिया टेलीमेडिसीन उपक्रमाद्वारे जिल्ह्यातील ग्रामपंचायतींपर्यंत चांगल्या वैद्यकीय सेवांचा लाभ जास्तीत जास्त नागरिकांना होण्यासाठी अहोरात्र मेहनत करण्याचा संकल्प.
डॉ.प्रीती बबन करवंदे, प्राथमिक आरोग्य केंद्र, मोहिली, तालुका कर्जत
करोनाचे वाढते प्रमाण आणि नवीनच कार्यरत झालेल्या डॉ.प्रीती करवंदे या एम.बी.बी.एस, एम.डी. असून देखील एका छोट्या गावामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र, मोहिली येथे रुजू झाल्या. रूजू झाल्यानंतर काही महिन्यातच करोना परिस्थिती उद्भवली. वास्तव्यास असताना येथील परिस्थितीची जाणीव झाली. कर्मचाऱ्यांचा कामाच्या बाबतचा दृष्टीकोन, कामकाजाची वेळ, साफसफाई, प्राथमिक आरोग्य केंद्राच्या आवारातील परिस्थिती हे व असे इतर अनेक गंभीर विषय होते आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे करोनाचे सावट होते.
अशा परिस्थितीत घरी न जाता प्राथमिक आरोग्य केंद्रातच राहून सर्व कामे पार पाडणे व येथील लोकांना आरोग्य सेवा देणे, हेच ध्येय बाळगले व ते पूर्ण करण्यासाठी पूर्ण क्षमतेने प्रयत्न केले. सर्व कर्मचाऱ्यांना विश्वासात घेऊन त्यांना त्यांच्या कामाची जबाबदारी जाणीव करून देण्यात आली. काटेकोरपणे, शिस्तबद्धतेने कामाचे नियोजन केले.
करोना पॉझिटिव्ह रुग्णांचे ट्रेसिंग करणे, त्यांना हॉस्पिटलमध्ये बेड उपलब्ध करणे, होम क्वॉरंटाईन करणे, करोना टेस्टिंग करणे याबाबत जनजागृती करण्यात आली. करोना परिस्थिती हाताळत असतानाच इतर महिला व बालकांचे आरोग्यविषयक राष्ट्रीय कार्यक्रम सॅम-मॅम, कुपोषित बालकांची तपासणी, गरोदर माता प्रसूती याही गोष्टींकडे लक्ष ठेवले. तसेच लसीकरण नियमित चालू राहणे हे देखील तितकेच महत्त्वाचे असल्याने त्याचेही योग्य नियोजन केले. जरी वाहन उपलब्ध नव्हते तरी प्रसंगी डोंगराळ भागात स्वत: चालत जाऊन कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने गरोदर माता तपासणी व बालकांचे लसीकरण यशस्वीपणे पार पाडले. माता मृत्यू प्रमाण कमी करण्यासाठी आदिवासी भागात जाऊन त्यांनी दवाखान्यामध्ये प्रसूती करण्यासाठी यावे या संदर्भात त्यांना मार्गदर्शन केले, प्रोत्साहन दिले. सातत्याने केलेले मार्गदर्शन, प्रोत्साहन व प्रत्यक्ष दिलेल्या भेटींमुळे आदिवासी लोकांमध्ये विश्वास वाढत गेला. त्याचे फलित म्हणून होम डिलिव्हरीचे प्रमाण कमी झाले व दवाखान्यात होणाऱ्या प्रसूतींचे प्रमाण वाढले. वर्ष-2019 मध्ये एकूण 17 प्रसूती झाल्या होत्या मात्र डॉ.करवंदे रुजू झाल्यापासून प्रसूतींची संख्या 61 झाल्या. त्याचबरोबर प्रसृत मातेच्या वेदना जाणून घेण्यासाठी गरोदर मातेच्या पतीने प्रसूतीच्या वेळेस प्रसुतीगृहात उपस्थित राहणे, हा उपक्रम चालू केला.
गरोदर माता व तिच्या पतीला कुटुंब नियोजनाच्या विविध पद्धतीबाबत मार्गदर्शनासाठी गावोगावी जावून विविध उपक्रम राबविले. कुपोषित बालकांच्या तपासणीच्या वेळी बालकांना दिल्या जाणाऱ्या शिजविलेल्या खाऊचा दर्जा स्वतः खात्री करून घेतात. रक्तदाब व मधुमेह या आजारांवर उपचार हे फक्त मोठ्या व खाजगी रुग्णालयातच होतात असा गैरसमज गावातील लोकांमध्ये होता, या गोष्टीची जाणीव झाल्यानंतर डॉ.प्रिती करवंदे यांनी अशा लोकांचा गैरसमज दूर केला व त्यांच्या रक्तदाब व मधुमेह आजारावर प्राथमिक आरोग्य केंद्रातच उपचार सुरू केले. तसेच केलेल्या उपचारसंबंधी स्वतंत्र नोंदी ठेवण्याचा उपक्रम सुरु केला. यामुळे या रुग्णांना कोणतेही डॉक्टर या नोंदी तपासून त्यांना योग्य उपचार देऊ शकतात. छोट्या गावात,आदिवासी पाड्यांमध्ये काम करीत असताना विविध प्रकारच्या अनेक अडचणींवर डॉ.प्रीती करवंदे हसतमुख राहून आत्मविश्वासाने मात करीत आपले कर्तव्य इमानेइतबारे बजावत आहेत.
वर्षा सुभाष पाटील, सहायक जिल्हा समन्वय अधिकारी, महिला आर्थिक विकास महामंडळ
महिला आर्थिक विकास महामंडळामध्ये (शासन अंगीकृत उपक्रम) दि. 8 सप्टेंबर 2008 साली ठाणे जिल्ह्यात सहायक जिल्हा समन्वय अधिकारी या पदावर रुजू. महिला आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून महिला सक्षम कशा होतील, यावर संपूर्ण भर दिला. जिल्हास्तरावर काम करीत असताना कार्यक्षेत्रात प्रत्यक्ष काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देऊन त्यांची क्षमता बांधणी केली. तसेच ग्रामीण भागातील महिला बचतगटांची स्थापना, गटांचे प्रशिक्षण, बचतगट संकल्पना, बुक कीपिंग, नेतृत्व गुण इत्यादी बाबतचे प्रशिक्षणे घेतली. बचतगटातील महिलांच्या लोकसंस्था उभारण्याचे काम केले.
मागील 3 वर्षांपासून रायगड जिल्ह्यात कार्यरत. संस्थात्मक बांधणी यामध्ये शहरी व ग्रामीण भागात मोठ्या संख्येने बचतगट स्थापित करणे, गाव विकास समित्या स्थापन करणे, लोकसंचालित साधन केंद्र स्थापन करणे, हे लक्ष्य ठेवून काम सुरु आहे. बचतगटांना जास्तीत जास्त बँक कर्ज उपलब्ध करून दिले. मागील वर्षात 867 गटांना 11 कोटी कर्ज मिळवून दिले. महिला सक्षमीकरण आणि सामाजिक समानता या घटकात महिलांना स्त्री-पुरुष समानतेवर प्रशिक्षण दिले, महिलांचे अधिकार याबाबत जाणीव-जागृती केली, महिलांचे काबाडकष्ट कमी करण्यासाठी धोबी कट्टा, मुलीच्या जन्माचे स्वागत इत्यादी सारखी उपक्रम राबविले. उपजीविका विकास या घटकांतर्गत महिलांनी उपजीविकेचे साधन वाढविणे, यावर भर दिला. रायगड जिल्ह्यात सामूहिक व्यवसाय उभा करण्यावर भर दिला. प्लास्टिकमुळे पर्यावरण हानी होत असल्याने कापडी पिशव्या बनविण्यासाठी जिल्हा नियोजन विभाग (DPDC) यांच्याकडे दिलेला प्रस्ताव नाविन्यपूर्ण योजनेंतर्गत मंजूर. त्यामध्ये 23 हायटेक मशीन घेतल्या आणि 30 महिलांचे गारमेंट युनिट सुरु केले. या युनिटमध्ये कापडी पिशव्यांसोबत पेटीकोट, ड्रेस शिवून स्थानिक बाजारपेठेत विक्री करणे आणि महिलांना किमान 200 ते 250 रुपये रोजगार मिळण्याची शाश्वती निर्माण केली.
तसेच कोविड कालावधीत सर्व महिलांचे उद्योग व्यवसाय बंद पडले होते. काही महिला अतिशय गरीब होत्या. अशा महिलांचा विचार करता व त्या काळातील कापडी मास्क ची गरज लक्षात घेता जिल्हा नियोजन विभागाकडून लगेच तीन लाख रुपयांचे कापडी मास्क बनविण्यासाठी मंजूरी मिळवली आणि यातूनच जिल्हाधिकारी कार्यालयाला वीस हजार कापडी मास्क चा पुरवठा केला. या माध्यमातून 150 महिलांना रोजगार उपलब्ध करून दिला. शिवाय रायगड मध्ये पेण, महाड, श्रीवर्धन येथे 6 शिवभोजन केंद्र सुरु केले, त्यातून महिलांना रोजगार उपलब्ध झाला.
उरण च्या 30 महिलांसाठी जेएनपीटी ला कोळंबी लोणचे युनिट सुरु करण्यासाठी प्रस्ताव सादर. पनवेल मधील कचरा वेचक महिलांचे बचतगट तयार करून त्यांना देखील पनवेल रेल्वे स्टेशन ला ई-केटरिंग साठी प्रस्ताव सादर. समान उद्योग व्यवसाय करणाऱ्या महिलांचे 30-30 चा गट करून कुक्कुटपालन , भाजीपाला लागवड, पशु संगोपन सारखी कामे सामूहिक पध्दतीने करुन त्यांना शाश्वत उपजीविका मिळवून देण्याचा प्रयत्न. तसेच सध्या ‘महिला सक्षमीकरण व बचतगटांचे सक्षमीकरण’ हा विषय घेवून पीएचडी करीत आहेत.
श्रीमती एस. एम. वाघमारे, जिल्हा परिविक्षा अधिकारी
श्रीमती एस. एम. वाघमारे-सासणे, जिल्हा परिविक्षा अधिकारी, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय, रायगड-अलिबाग यांनी त्यांच्या शासकीय कारकीर्दीची सुरुवात सन 1998 पासून केली. परिविक्षा अधिकारी या पदावर कार्यरत असताना नागपूर काटोल रोड येथील शासकीय करुणा महिला वसतिगृह संस्थेतील तसेच बालगृहातील मुलींचे शालेय तसेच एकंदरीत पुर्नवसनाचे कामकाज केले. तसेच जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय, सांगली येथील महिला व बाल विकासाच्या योजना विशेषतः देवदासी पुर्नवसन अनुदान योजना अंतर्गत देवदासींचे सर्वेक्षण करुन त्यांना शासनाच्या अनुदान योजनांचा लाभ मिळवून दिला. महिला व बाल विकासाच्या योजनांबाबत वृत्तपत्रात लिखाण करुन, महिला मेळावे तसेच शालेय जाणीव जागृती कार्यक्रम आयोजित करुन शासकीय योजना गरजूंपर्यंत पोहोचविण्याचे काम केले.
रायगड जिल्हयात आल्यानंतर देहविक्री करणाऱ्या महिलांना त्यांची स्वतःची ओळख निर्माण होण्यासाठी जिल्हाधिकारी निधी चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली व लोक परिषद सामाजिक विकास संस्था, पनवेल यांच्या सहकार्याने या क्षेत्रातील महिलांना आधार,रेशन व मतदान कार्ड देण्याची मोहीम राबविली.
याशिवाय जिल्हा परिविक्षा अधिकारी श्रीमती एस. एम. वाघमारे-सासणे यांनी तृतीयपंथी व्यक्तींना सामाजिक प्रवाहात आणण्याचा, त्यांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी त्यांचे आधार, रेशन, मतदान ओळखपत्र काढण्याचा संकल्प केला आहे.
श्रीमती शशिकला अहिरराव, प्रकल्प अधिकारी, आदिवासी विकास विभाग
शैक्षणिक अर्हता एमएसडब्ल्यू असलेल्या श्रीमती शशिकला अहिरराव महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत गट ब, वर्ग-2 राजपत्रित अधिकारी पदावर दि.12 ऑगस्ट 2011 रोजी शासनाच्या आदिवासी विकास विभागात रुजू झाल्या. सध्या प्रकल्प अधिकारी श्रेणी-1 उपायुक्त दर्जाच्या पदावर काम करीत आहेत.
श्रीमती शशिकला अहिरराव यांनी शासकीय आश्रमशाळा, अनुदानित आश्रमशाळा, आदिवासी मुलींच्या शासकीय वसतिगृहांमधील अनुसूचित जमातीच्या मुलींचा शैक्षणिक दर्जा उंचावण्यासाठी तसेच त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी विविध उपक्रम राबविले.
त्याग, प्रेम, चिकाटी, सहनशीलता या गुणांची महिलांकडे नैसर्गिक देण आहे आणि त्याचा उपयोग आदिवासी कुटुंबाच्या उत्तम आरोग्य, शिक्षण, उत्तम संस्कार व सामाजिक बांधिलकी जोपासण्यासाठी जाणीव ठेवून काम करीत आहेत. महाराष्ट्र राज्यात कातकरी, माडिया गोंड, कलाम या तीन आदिम जमाती आहेत. त्यापैकी रायगड जिल्ह्यात कातकरी ही आदिम जमात मोठ्या प्रमाणात आहे. या कातकरी समाजाला मुख्य प्रवाहात आणण्याचा, या समाजाच्या उन्नतीसाठी सदैव प्रयत्नशील राहण्याचा संकल्प.
जागतिक महिला दिनानिमित्त आदिवासी विभागाच्या प्रकल्प अधिकारी श्रीमती शशिकला अहिरराव यांची स्वरचित कविता…
महिलांचा करा सन्मान,
देश बनेल महान..!
जबाबदारीसह घेते भरारी,
नाव तिचे आहे नारी..!
नारीत आहे शक्ती भारी,
समजू नका तिला बिचारी..!
नारी तू आहेस महान,
विश्वासाची आहेस शान..!
स्त्री नाही वस्तू भोगाची,
देवता आहे त्यागाची..!
आई नाही तर मुलगी नाही,
मुलगी नाही तर मुलगा नाही..!
देशाला हवे शिवबा जिजाऊ,
स्त्रियांना मानाने वागवू..!
मुलींचे शिक्षण हेच खरे प्रगतीचे लक्षण…!!
जिल्ह्यातील महिला लोकप्रतिनिधी तसेच प्रशासनातील इतर महिला शक्ती
जिल्हा परिषद रायगडच्या अध्यक्षा श्रीमती योगिता पारधी हे एक युवा नेतृत्व असून जिल्ह्यात विविध ठिकाणी देखील महिला लोकप्रतिनिधी म्हणून पनवेल महानगरपालिका नगराध्यक्षा डॉ.श्रीमती कविता चौथमल, , पेण नगरपालिका नगराध्यक्षा प्रितल ल.पाटील, उरण नगरपालिका नगराध्यक्षा श्रीमती सायली सचिन म्हात्रे, कर्जत नगरपालिका नगराध्यक्षा सुवर्णा केतन जोशी, माथेरान नगरपालिका नगराध्यक्षा प्रेरणा प्रसाद सावंत, खोपोली नगरपालिका नगराध्यक्षा श्रीमती सुमन मोहन औसरमल, महाड नगरपालिका नगराध्यक्षा श्रीमती स्नेहल माणिक जगताप, माणगाव नगरपालिका- नगराध्यक्षा श्रीमती योगिता गणेश चव्हाण, म्हसळा नगरपालिका नगराध्यक्षा श्रीमती फलकनाझ मुबिन हुर्जुक, तळा नगरपालिका नगराध्यक्षा- श्रीमती रेश्मा रविंद्र मुंढे, मुरुड नगराध्यक्षा स्नेहा पाटील ऊर्फ माई या लोकसेवेच्या माध्यमातून आपल्या कामाचा ठसा उमटवित आहेत.
त्याचप्रमाणे उपविभागीय अधिकारी महाड, श्रीमती प्रतिमा पुदलवाड, भूसंपादन अधिकारी मेट्रो सेंटर-उरण, श्रीमती अश्विनी सुर्वे पाटील, भूसंपादन अधिकारी मेट्रो सेंटर-3 पनवेल, श्रीमती दिपा भोसले, उपजिल्हाधिकारी ललिता बाबर, उपविभागीय पोलीस अधिकारी, अलिबाग श्रीमती सोनाली कदम, तहसिलदार माणगाव प्रियांका कांबळे, तहसिलदार रोहा श्रीमती कविता जाधव, तहसिलदार पोलादपूर श्रीमती दिप्ती देसाई, जिल्हा महिला बालविकास अधिकारी- उज्वला पाटील, वैद्यकीय अधीक्षक-उप जिल्हा रुग्णालय-रोहा डॉ.अंकिता मते, वैद्यकीय अधीक्षक-ग्रामीण रुग्णालय, पोलादपूर डॉ.श्रीमती बी.जे.पाटील, वैद्यकीय अधीक्षक, ग्रामीण रुग्णालय, चौक, डॉ.अश्विनी सोनावळे, जिल्हा प्रशिक्षण केंद्राच्या नियत्रंक डॉ.गवळी, उमेद अभियानाच्या जिल्हा समन्वयक श्रीमती शितल माळी या तसेच सर्व शासकीय कार्यालयातील अन्य महिला अधिकारी, कर्मचारी रायगड जिल्ह्याच्या विकासासाठी, येथील जनतेच्या सेवेसाठी सदैव तत्परतेने कार्यरत आहेत.
छत्रपती शिवाजी महाराजांनी स्त्री शक्तीचा नेहमीच आदर केला आहे. त्यांचेच संस्कार पुढे चालू ठेवण्याची समस्त समाजाची ही गरज आहे. याला अनुसरुनच या लेखाच्या माध्यमातून घरापासून ते समाजाच्या विविध क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या जिल्ह्यातील सर्व महिला शक्तीला जिल्हा माहिती कार्यालयाचे त्रिवार वंदन…! नारी शक्ती आहे महान…!
मनोज शिवाजी सानप
जिल्हा माहिती अधिकारी
रायगड-अलिबाग