नमुंमपा निवडणूकीसाठी नवी मुंबई महानगरपालिकेचे सुयोग्य नियोजन
महानगरपालिका निवडणूकांच्या अनुषंगाने महानगरपालिकांनी केलेल्या कार्यवाहीचा आढावा व्हिडिओ कॉन्फरन्सव्दारे मा.राज्य निवडणूक आयोगामार्फत घेण्यात आला. यामध्ये आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने निवडणूकीच्या अनुषंगाने करण्यात आलेल्या कामांची सविस्तर माहिती दिली. याप्रसंगी महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त तथा आचारसंहिता प्रमुख श्री. सुनिल पवार, निवडणूक विभागाचे उपआयुक्त श्री. भागवत डोईफोडे आणि सर्व निवडणूक निर्णय अधिकारी उपस्थित होते.
दि.15 जानेवारी 2026 रोजी नवी मुंबई महानगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक होत असून त्यासाठी आवश्यक 6275 इतक्या कर्मचा-यांची नेमणूक करण्याच्या दृष्टीने कार्यवाही सुरू करण्यात आलेली आहे. राज्यातील सर्व महानगरपालिकांमध्ये एकाच दिवशी निवडणूक होत असल्याने निवडणूक कामकाजासाठी मनुष्यबळ उपलब्धतेच्या दृष्टीने संबधित शासकीय विभागांशी संपर्क साधून मनुष्यबळ उपलब्ध करून घेतले जात आहे.
28 प्रभागांमध्ये बहुसदस्यीय पध्दतीने 111 जागांसाठी होणा-या या निवडणूकीमध्ये 1151 इतकी मतदान केंद्रे असणार आहेत. सदर मतदान केंद्रांमध्ये सुव्यवस्थेच्या दृष्टीने सीसीटीव्ही कार्यान्वित असणार आहे. निवडणूकीमध्ये 9,48,466 इतके मतदार आपला हक्क बजावणार आहेत. त्यांनी लोकशाहीच्या सबलीकरणासाठी मतदान करावे यादृष्टीने विविध माध्यमांतून जनजागृती करण्यात येत आहे.
सर्व विभागांमध्ये आठ निवडणूक निर्णय अधिका-यांची कार्यालये स्थापित झाली असून तेथील कार्यवाहीला सुरुवात झाली आहे. शासनामार्फत उपजिल्हाधिकारी संवर्गातील अधिकारी हे निवडणूक निर्णय अधिकारी असून त्यांच्या समवेत तहसिलदार / नायब तहसिलदार दर्जाचे सहा.निवडणूक निर्णय अधिकारी असणार आहेत. त्याचप्रमाणे संबधित विभागाचे सहा.आयुक्त तथा विभाग अधिकारी आणि कार्यकारी अभियंता हे देखील सहा.निवडणूक निर्णय अधिकारी पदाची जबाबदारी पार पाडणार आहेत.
दि.27 डिसेंबर 2025 रोजी आयोगाच्या निर्देशानुसार मतदान केंद्रनिहाय मतदार यादी प्रसिध्द केली जाणार असून त्या अनुषंगाने जलद व काटेकोर कार्यवाही करावी असेही महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी महानगरपालिका निवडणूक विभागास निर्देशित केले.
आयोगामार्फत प्राप्त 45,588 दुबार मतदारांच्या यादीची पडताळणी सर्व विभागांमध्ये सुरु असून या छाननीला वेग द्यावा व तत्परतेने कार्यवाही पूर्ण करावी असेही आदेश आयुक्तांमार्फत देण्यात आले.
मुख्यालय पातळीवर नवी मुंबईतील राजकीय पक्षांची बैठक 17 डिसेंबर रोजी घेण्यात आली होती व यामध्ये आयुक्तांनी सर्वांशी संवाद साधत निवडणूक विषयक तसेच आचार संहिता विषयक नियमांची माहिती दिली होती. अशाच प्रकारच्या बैठका निवडणूक निर्णय अधिकारी यांनीही आपल्या पातळीवर घ्याव्यात असे आयुक्तांनी सूचित केले.
महानगरपालिकेची निवडणूक सुनियोजित रितीने पार पाडण्यासाठी नवी मुंबई महानगरपालिका सज्ज असून त्यादृष्टीने आवश्यक कार्यवाही करण्यात येत आहे.
