भर पावसातही ढोल-ताशांच्या गजरात दिड दिवसांच्या गणेशमूर्तीचे विसर्जन.
उरणमध्ये ७७१५ घरगुती, तर २९ सार्वजनिक गणपती विराजमान.
चोख पोलीस बंदोबस्तात गणेश मूर्तीचे विसर्जन.
उरण दि २८(विठ्ठल ममताबादे )उरण परिसरातील उरण, मोरा,न्हावा शेवा या तिन्ही पोलिस ठाण्यांच्या हद्दीत गणेशोत्सवच्या पार्श्वभूमीवर ७७१५ खासगी, तर २९ सार्वजनिक गणपतींचे आगमन सर्वत्र झाले आहे. आतुरतेने वाट पाहत असलेल्या गणेशोत्सवाला बुधवार दिनांक २७/८/२०२५ रोजी सुरुवात झाली आहे. यानिमित्ताने उरणपरिसरातील तीनही पोलिस ठाण्यांच्या हद्दीत एकूण सार्वजनिक २९, खासगी ७७१५ असे एकूण ७७४४ गणपती विराजमान झाले आहेत.
उरण पोलिस हद्दीत खासगी ५८१८, सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे १५, मोरा सागरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत खासगी ११४७, तर न्हावा शेवा बंदर पोलिस ठाण्याच्या हद्दीत खासगी ७५० आणि सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे ८ गणपतींचा समावेश आहे.यंदा गुरुवार दिनांक २८/८/२०२५ रोजी दिड दिवसांच्या गणेश मूर्तीचे विसर्जन मोठया प्रमाणात झाले.'श्री'च्या मूर्ती वाजत-गाजत विसर्जन स्थळी नेऊन आरती गाऊन मंत्रौच्चार करून गणपतीची स्तुती करून घोषणा देत श्री गणेश मूर्तीचे मोठया थाटा माटात विसर्जन झाले. जोरदार पाऊस सुरु असताना देखील ढोल-ताशे, बॅन्जो, ब्रास बॅण्ड, हलगी, स्पीकरच्या तालावर गणपती मूर्ती भाविकांच्या घरातुन टेम्पो, हातगाड्यामधून विसर्जन स्थळी आले होते.उरण नगर परिषद हद्दीत मुख्याधिकारी तथा प्रशासक समीर जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली उरण नगर परिषदेच्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी उत्तम नियोजन व आयोजन केले होते.विशेष म्हणजे विमला तलाव गार्डन मध्ये पर्यावरण पूरक कृत्रिम तलावाचे निर्माण करून अनेक श्री गणेश मूर्तीचे या पर्यावरण पूरक कृत्रिम तलावात विसर्जन करण्यात आले.उरण पोलीस ठाणे हद्दीत उरण शहरात विमला तलाव गार्डन येथे दरवर्षी प्रमाणे व प्रथा परंपरे प्रमाणे गणेशमूर्तीचे विसर्जन झाले. मोरा पोलीस स्टेशन हद्दीत समुद्रात गणेश मूर्तीचे विसर्जन झाले तर न्हावा शेवा पोलीस स्टेशन हद्दीतील नागरिकांनी आपल्या नजीकच्या तलावात तसेच प्रत्येक गावागावात असलेल्या तलावात श्री गणेश मूर्तीचे विसर्जन केले.उरण पोलीस स्टेशन हद्दीतील १ खाजगी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ व १९१३ खाजगी घरगुती गणेश मूर्तीचे आज विसर्जन झाले तर मोरा व न्हावा शेवा पोलीस स्टेशन हद्दीत शेकडो गणेश मूर्तीचे विसर्जन करण्यात आले.न्हावा शेवा बंदर विभागचे सहाय्यक पोलीस आयुक्त किशोर गायके, उरण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक एच डी मुलाणी यांच्या मार्गदर्शनाखाली उरण तालुक्यात सर्वत्र चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आल्याने कोणताही अनुचित प्रकार उरण मध्ये घडला नाही. एकंदरीत मोठया उत्साहात, थाटामाटात, शांततेत दिड दिवसांच्या श्री गणेश मूर्तीचे विसर्जन करण्यात आले.