'आमदार प्रशांत ठाकूर चषक २०२५ वक्तृत्व स्पर्धा' प्रत्येक विद्यार्थ्याला व्यक्त होण्याची संधी - नितेश पाटील
पनवेल (प्रतिनिधी) कोशिश फाऊंडेशन आणि पनवेल महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेली 'आमदार प्रशांत ठाकूर चषक २०२५ वक्तृत्व स्पर्धा' प्रत्येक विद्यार्थ्याला व्यक्त होण्याची आणि त्यातून वक्तृत्व शैली शिकण्याची संधी आहे, असे प्रतिपादन भारतीय युवा मोर्चाचे खारघर शहर अध्यक्ष नितेश पाटील यांनी केले.
महानगरपालिकेचे माजी सभागृहनेते परेश ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत असलेल्या कोशिश फाऊंडेशन आणि पनवेल महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या आमदार प्रशांत ठाकूर चषक २०२५ वक्तृत्व स्पर्धेच्या वर्ग अंतर्गत फेऱ्या खारघर मधील विद्यालयात झाल्या. त्या अनुषंगाने ते बोलत होते.
पनवेल महापालिका क्षेत्रातील शाळांमध्ये कोशिश फाउंडेशनच्या वक्तृत्व स्पर्धेला मोठा प्रतिसाद मिळाला आहे. महानगरपालिकेचे माजी सभागृहनेते परेश ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत असलेल्या कोशिश फाउंडेशनने महापालिकेच्या सोबतीने या उपक्रमाचे चांगल्या प्रकारे आयोजन केले आहे. ही स्पर्धा टॅलेंट हंट किंवा केवळ स्पर्धा नाही. तर मुख्य उद्देश प्रत्येक विद्यार्थ्याला व्यासपीठ मिळवून देणं आहे. अनेक वेळा आपण स्वतःला जे हवं आहे ते योग्य पद्धतीने मांडू शकत नाही, त्यामुळे आपल्या जीवनात संधी गमावल्या जातात. आपली भूमिका, आपले विचार प्रभावीपणे मांडणं खूप महत्त्वाचं आहे. ही कला लहान वयातच शिकली पाहिजे, यासाठी ही स्पर्धा आहे. विद्यार्थ्यांमध्ये केवळ भाषणच नाही, तर स्वत:च्या व्यक्तिमत्व विकासाची जाणीव निर्माण केली आहे. १७ हजार विद्यार्थ्यांना या स्पर्धेत सहभागी करून घेण्यात आले असून, थेट वर्गात विद्यार्थ्यांना बोलण्यास प्रोत्साहन दिले जात आहे. यामुळे विद्यार्थी भीती झटकत, आत्मविश्वासाने व्यक्त होत आहेत. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या मनात सकारात्मक ऊर्जा निर्माण झाली असून, हा उपक्रम केवळ आजचा नसून त्यांच्या जीवनभर काम येणाऱ्या कौशल्यांचा पाया घालत आहे, असेही नितेश पाटील यांनी म्हंटले.