लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिरांमधून शुभेच्छा;आमदार प्रशांत ठाकूर व चिरंजीव अमोघ ठाकूर यांचेही रक्तदान

लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिरांमधून शुभेच्छा;आमदार प्रशांत ठाकूर व चिरंजीव अमोघ ठाकूर यांचेही रक्तदान 





पनवेल (प्रतिनिधी ) दरवर्षी लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आपला वाढदिवस साधेपणाने साजरा करत असले तरी कार्यकर्ते त्यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून साजरा करतात. यावर्षी भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी केलेल्या आवाहनानुसार विक्रमी रक्तदान करून लाडक्या देवाभाऊंना शुभेच्छा देण्यात आल्या आहेत. त्याच अनुषंगाने पनवेलमध्ये विविध ठिकाणी रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यात आले. 
          लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला सन २०४७ पर्यंत विकसित राष्ट्र निर्माण करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. या राष्ट्रनिर्माणाच्या ऐतिहासिक प्रक्रियेत महाराष्ट्राचे अमूल्य योगदान असेल यात कोणतीही शंका नाही. लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हातात महाराष्ट्राचे नेतृत्व असल्यानेच हे शक्य होणार आहे.  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सर्वसमावेशक भूमिकेमुळेच राज्याचे ट्रिलियन डॉलर इकॉनोमीचे स्वप्न मूर्त स्वरूपात होणार आहे, देवेंद्र फडणवीस कसलेले राजकारणी, तर आहेत त्याचबरोबर तितक्याच आत्मीयतेने जनतेच्या अथक सेवेसाठी प्रशासनावर जबरदस्त पकड असणारे, सुशासनाचा आदर्श घालून देणारे, जनतेला लोकाभिमुख सेवा देणारे कार्यक्षम आणि दूरदृष्टीकोन असलेले मुख्यमंत्री आहेत. त्यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देताना अनेक सामाजिक उपक्रम राबवले जात आहेत. त्याच अनुषंगाने कार्यसम्राट व लोकप्रिय आमदार प्रशांत ठाकूर व जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली पनवेल विधानसभा मतदार संघातील पनवेल, कामोठे, कळंबोली, आकुर्ली, खांदा कॉलनी, खारघर, ओवेपेठ, आदी विविध ठिकाणी रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमात स्वतः आमदार प्रशांत ठाकूर व त्यांचे चिरंजीव अमोघ ठाकूर यांनी पनवेल येथील मध्यवर्ती कार्यालयात रक्तदान करून समाजाप्रती आदर्श उदाहरण ठेवले. यावेळी भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष जयंत पगडे, माजी उपनगराध्यक्ष मदन कोळी व इतर पदाधिकाऱ्यांनीही रक्तदान केले. यावेळी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर, ज्येष्ठ नेते व माजी नगराध्यक्ष जे. एम. म्हात्रे, भाजपचे राज्य परिषद सदस्य अरुणशेठ भगत यांनी विविध ठिकाणी आयोजित रक्तदान शिबिरांना प्रत्यक्ष भेटी दिल्या व रक्तदात्यांना प्रेरणा व शुभेच्छा दिल्या. या उपक्रमात शेकडो रक्तदात्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून सामाजिक बांधिलकीची जाणीव दाखवून दिली. सर्व रक्तदात्यांना ब्लड डोनेट कार्ड आणि सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. 
          पनवेल येथील शिबिराचे उदघाटन आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी माजी उपमहापौर चारुशीला घरत, माजी शहर अध्यक्ष अनिल भगत, माजी नगरसेवक गणेश कडू, मनोहर म्हात्रे, प्रभाकर बहिरा, सुनील बहिरा,  भाजपच्या शहर अध्यक्षा रुचिता लोंढे, माजी नगरसेविका दर्शना भोईर, प्रिती जॉर्ज- म्हात्रे, सुरेखा मोहोकर, जॉनी जॉर्ज, सारिका भगत, सुरेश वास्कर, परमेश्वर गिरे, अमरीश मोकल, सतीश पाटील, अनेश ढवळे, राजेश भोईर, निलेश दराडे, रामा मोरबाळे, विनायक मुंबईकर यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.  पनवेल उत्तर मंडलाचे रक्तदान शिबीर रामशेठ ठाकूर महाविद्यालय पेठगाव येथे, खारघर शहर मंडल शिबीर रामशेठ ठाकूर स्कुल खारघर येथे, कामोठे शहर मंडल शिबीर आमदार प्रशांत ठाकूर जनसंपर्क कार्यालय कामोठे येथे, कळंबोली शहर मंडल शिबीर आमदार प्रशांत ठाकूर जनसंपर्क कार्यालय कामोठे येथे, पनवेल शहर मंडल शिबीर भाजप मध्यवर्ती कार्यालय पनवेल येथे, नवीन पनवेल मंडलाचे शिबीर रोटरी ब्लड बँक खांदा कॉलनी तर पनवेल पूर्व मंडलाचे शिबीर सेंट अँड्रयू स्कुल आकुर्ली येथे पार पडले.

कोट-
महाराष्ट्र राज्य देशाच्या शाश्वत प्रगतीचा गतीचक्र आहे. आणि या गतीला दिशा देणारे नेतृत्व म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सारथ्य करत आहेत. अचूक निर्णय क्षमता त्यांच्याकडे आहे. त्यामुळे कार्यकर्ता म्हणून त्यांचा प्रवास 'राष्ट्रप्रथम' या तत्वाशी एकनिष्ठ राहून संकल्पपूर्ण नेतृत्वात झाला आहे. त्यांच्या प्रत्येक निर्णयात सामान्य माणूस केंद्रबिंदू राहिला आहे. त्यामुळे कर्तव्यकठोर मुख्यमंत्री सर्वांचे लाडके देवाभाऊ आहेत. ते आपला वाढदिवस साध्या पद्धतीने साजरा करत आले असले तरी वाढदिनी सामाजिक उपक्रमे मोठ्या स्वरूपात आयोजित करून शुभेच्छा दिल्या जातात त्याच अनुषंगाने पनवेलमध्ये रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यात आले. महाराष्ट्राला पुढे नेण्याचे काम करत आहेत त्यामुळे 'देवाभाऊ' सर्वांचे लाडके नेते आहेत, महाराष्ट्राच्या आणि देशाच्या विकासासाठी त्यांना निरोगी उदंड आयुष्य लाभो, या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा! - आमदार प्रशांत ठाकूर