खारघरमध्ये एका रात्रीत नऊ घरफोड्या; भयमुक्तीसाठी पोलिसांनी सहकार्याची भुमिका घ्यावी;गृह खात्याने लक्ष देण्याची आमदार प्रशांत ठाकूर यांची मागणी
पनवेल (प्रतिनिधी) चोरी आणि घरफोडीच्या अनुषंगाने लोकांना भयमुक्त करण्याची गरज आहे अन्यथा पोलिसांवरील विश्वास उडेल, त्यासाठी गृह खात्याने लक्ष द्यावे अशी, मागणी आमदार प्रशांत ठाकूर यांनी विधानसभेत केली. विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात २०२५-२६ गृह विभागाच्या पुरवणी मागणीच्या अनुषंगाने बोलताना खारघर मध्ये एका रात्रीत नऊ घरात झालेल्या चोरीसंदर्भात पोलिसांकडून नागरिकांना होणाऱ्या वागणुकीचा दाखला देत आमदार प्रशांत ठाकूर यांनी चिंता व्यक्त केली.
यावेळी बोलताना आमदार प्रशांत ठाकूर यांनी म्हंटले कि, पनवेल परिसरात लोकवस्ती मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. या वाढत्या लोकवस्तीमध्ये कायदा सुव्यवस्थेच्या बाबतीमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे. विशेषत्वाने खारघर सारखे शहर आहे जे सर्व अत्याधुनिक सोयीसुविधायुक्त आहे. मात्र कायदा सुव्यवस्थेच्या अनुषंगाने अलिकडे वारंवार चिंताजनक प्रकार त्या ठिकाणी घडत आहेत. एका रात्रीत खारघरमधील वास्तुविहार मधील संस्कृती पाच आणि पारिजात सोसायटीतील चार घरांमध्ये असे एकूण नऊ ठिकाणी घरफोड्या झाल्या आहेत. पोलिसांनी हे सर्व गुन्हे एकत्रितपणे नोंद करून घेतले आहेत.पोलिसांकडे तक्रार केल्यानंतर त्या ठिकाणी व्यवस्थित उत्तरे दिली जात नाहीत. त्यामुळे याचा तपास कशाप्रकारे तपास केला जाणार असा नागरिकांमध्ये संभ्रम आहे. पोलिसांकडून तक्रारदारांना योग्य उत्तर दिली जात नाहीत. मनुष्यबळ कमी आहे सीसीटीव्ही कॅमेरे नाहीत असे तक्रारदारांना सांगितले जाते. विशेष म्हणजे सीसीटीव्ही कॅमेरामध्ये गुन्हेगार कॅप्चर झाले आहेत. त्यामुळे या गुन्हेगारांच्या शोधासाठी काय केले जात आहे याची माहिती पोलिसांनी तक्रादारांशी समन्वय करून दिले पाहिजे. सुरक्षा रक्षक सर्व ठिकाणी आहेत त्यांच्या बैठका झाल्या पाहिजेत तसेच भीती मुक्ततेसाठी पोलिसांनी नागरिकांना आश्वस्थ केले पाहिजे, आणि त्यासाठी गृह विभागाने लक्ष द्यावे, असे आमदार प्रशांत ठाकूर यांनी सभागृहात बोलताना मागणी केली.
चौकट -
खारघर शहरात एकाच रात्री ९ ठिकाणी घरे फोडून चोरटयांनी लाखोंचे दागिने आणि रोख रक्कम लंपास केली आहे.खारघर वास्तूविहार सेक्टर १६ येथील संस्कृती को.ऑप. हौ. सोसायटी या ठिकाणी बंद असणार्या ५ घरामध्ये घरफोडय़ा झाल्या तसेच पारिजात को. ऑप हौ.सोसायटी या ठिकाणी ४ घरांमध्ये दि.३ रोजी मध्यरात्री ३ च्या सुमारास या घरफोड्या करण्यात आल्या आहेत. घरफोडी करण्यात आलेले बहुतांशी घरे बंद होती.विशेष म्हणजे चोरटयांचा याठिकाणी सर्रास वावर दिसत असल्याने रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण आहे.या परिसरात वारंवार घरफोड्या होत असताना पोलीस करतात काय ? असा प्रश्न उपस्थित होत आहे.