नमुंमपा पदभरती परीक्षेच्या तिस-या दिवशी 15064 उमेदवारांनी दिली ऑनलाईन परीक्षा*
‘नवी मुंबई महानगरपालिका सरळसेवा भरती – 2025’ परीक्षेच्या आज तिस-या दिवशी 12 जिल्हयांमधील 28 परीक्षा केंद्रांवर एकूण 15064 उमेदवारांनी परीक्षा दिली आहे. सर्व केंद्रांवरली परीक्षा प्रक्रिया व्यवस्थित रितीने पार पडली.
गट - क आणि गट - ड मधील 30 संवर्गातील 668 पदांकरिता 12 जिल्ह्यांमध्ये 28 केंद्रांवर टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिस (TCS) यांच्या माध्यमातून परीक्षेचे नियोजन करण्यात आले आहे. या परीक्षा प्रक्रियेवर निरीक्षण व नियंत्रण ठेवण्यासाठी महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली, नवी मुंबई महानगरपालिकेच्या वर्ग 1 श्रेणीतील वरिष्ठ अधिकाऱ्यांची ‘समन्वय अधिकारी ‘म्हणून तसेच 29 अधिकाऱ्यांची ‘केंद्र निरीक्षक’ म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे.
सकाळी 9 ते 11 वा. या पहिल्या सत्रात 5668 उमेदवारांनी परीक्षा दिली.
दुपारी 1 ते 3 वा. या दुसऱ्या सत्रात 5053 उमेदवारांनी परीक्षा दिली.
सायं. 5 ते 7 वा. या तिसऱ्या सत्रात 4343 उमेदवारांनी परीक्षा दिली.
अशाप्रकारे नमुंमपा सरळसेवा भरती प्रक्रियेच्या तिस-या दिवशी 15064 उमेदवारांनी ऑनलाईन परीक्षा दिली आहे.
पदभरती परीक्षेच्या पहिल्या दिवशी 21115 उमेदवारांनी, दुस-या दिवशी 18442 उमेदवारांनी व आज तिस-या दिवशी 15064 उमेदवारांनी परीक्षा दिली आहे. या तिन्ही दिवसाची परीक्षा प्रक्रिया सुव्यवस्थित रितीने पार पडली असून उर्वरित एक दिवसाच्या परीक्षेचेही सुयोग्य नियोजन करण्यात आलेले आहे.
परीक्षेचे ऑनलाईन अर्ज भरलेल्या पात्र उमेदवारांना परीक्षेची प्रवेशपत्रे ऑनलाईन पाठविण्यात आलेली असून त्यांनी ती डाऊनलोड करुन घ्यावीत आणि आपले प्रवेशपत्र घेऊन परीक्षास्थळावर प्रवेशपत्रात नमूद केलेल्या वेळेवर उपस्थित राहणे आवश्यक आहे. प्रवेशपत्रात नमूद वेळेवर उपस्थित न राहिल्यास उमेदवारांना नियमानुसार परीक्षेस बसता येणार नाही याची प्रत्येक उमेदवाराने गांभीर्यपूर्वक नोंद घ्यावयाची आहे.
*नवी मुंबई महानगरपालिकेची भरती प्रक्रिया पारदर्शक व नियमानुसार काटेकोरपणे होत असून नोकरी मिळवून देण्यासाठी कोणत्याही प्रकारची मागणी केली जात असल्यास उमेदवारांनी दक्ष रहावे व स्थानिक पोलीसांकडे तक्रार करावी असे सूचित करण्यात येत आहे. भरतीविषयक कोणत्याही भूलथापांना व आमिषांना बळी न पडता तसेच याबाबत अफवांवर विश्वास न ठेवता परीक्षेविषयी अधिकृत माहिती जाणून घेण्यासाठी उमेदवारांनी महानगरपालिकेचे संकेतस्थळ www.nmmc.gov.in तसेच महानगरपालिकेच्या अधिकृत सोशल मिडीया पेजला भेट द्यावी असे आवाहन नमुंमपा आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांनी केले आहे.*