जागतिक पर्यावरणदिनी नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात सर्व विभागांत वृक्षारोपण मोहीम

जागतिक पर्यावरणदिनी नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात सर्व विभागांत वृक्षारोपण मोहीम


 

            दि.५ जून २०२५ रोजीच्या जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून 'प्लास्टिक प्रदूषण नष्ट करा' (Beat Plastic Pollution) या जागतिक संकल्पनेला अनुसरून नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पर्यावरण सप्ताह साजरा करण्यात येत आहे. या अंतर्गत वृक्षारोपण, स्वच्छता, प्लास्टिक प्रतिबंध असे विविध प्रकारचे पर्यावरणपूरक उपक्रम राबविले जात असून त्यामध्ये लोकसहभागावर भर देण्यात येत आहे.

            प्रत्यक्ष जागतिक पर्यावरण दिनी अर्थात 5 जून रोजी नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रातील आठही विभागांमध्ये मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण मोहीम राबविण्यात येणार आहे. 15.5 लाखाहून अधिक वृक्षसंपदा असणा-या नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात या वर्षभरात 1.25 लक्ष वृक्षारोपणाचे उद्द‍िष्ट नजरेसमोर ठेउुन प्राधान्याने देशी वृक्षरोपांची लागवड करण्यात येत आहे. ज्यायोगे पक्ष्यांचा अधिवास वाढेल आणि नवी मुंबईच्या जैवविविधतेत भर पडेल.

            *यामधील वृक्षारोपणाचा मुख्य कार्यक्रम 5 जून रोजी सकाळी 9 वाजता सीबीडी बेलापूर पारसिक हिल येथे बेलापूर पाण्याच्या टाकीजवळ आग्रोळी गावाकडून महापौर निवासस्थानाकडे जाणाऱ्या रस्त्यावर संपन्न होणार असून यामध्ये सुरंगी, जांभूळ, मलबेरी, काजू, आवळा, बांबू इत्यादी देशी प्रजातींची झाडे लावण्यात येणार आहेत. तरी नागरिकांनी याठिकाणी मोठया संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने करण्यात येत आहे.*

        त्याचप्रमाणे इतर विभागांमध्येही वृक्षारोपणासाठी जागा निश्चित करण्यात आल्या असून –

            * दिघा  : साने गुरुजी उद्यान आणि संत निरंकारी भवनसमोरील उद्यान येथे सकाळी ११ वाजता ताम्हण, जांभूळ, कांचन, कडुनिंब वृक्षरोपांची लागवड करण्यात येणार आहे.

            * ऐरोली : यशवंतराव चव्हाण उद्यानात सकाळी ११ वाजता जांभूळ, कडुनिंब, बकुळ, पारिजातक प्रजातीची झाडे लावण्यात येणार आहेत.

            * घणसोली : शेतकरी शिक्षण मंडळ शाळेजवळील मोकळया जागेमध्ये आणि सेंट्रल पार्क, सेक्टर ३ येथे सकाळी १० वाजता जांभूळ, कडुनिंब, बकुळ, पारिजातक प्रजातीची झाडे लावण्यात येणार आहेत.

                         * कोपरखैरणे    : सेक्टर 14 येथील निसर्ग उद्यानात सकाळी १० वाजता जांभूळ आणि आवळा प्रजातीची झाडे लावण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

             * वाशी            : छत्रपती शिवाजी महाराज चौकाकडून सागर विहार सेक्टर ८ कडे जाणाऱ्या सायकल ट्रॅकवर सकाळी ८.३० वाजता  जांभूळ, कडुनिंब, बकुळ, पारिजातक आणि  पामची झाडे लावण्यात येणार आहेत.

            * तुर्भे/सानपाडा: नानासाहेब धर्माधिकारी उद्यान, सेक्टर १३ सानपाडा येथे सकाळी ११ वाजता कडुनिंब, संत शिरोमणी उद्यान, सेक्टर ७ सानपाडा येथे सकाळी ११.३० वाजता कडुनिंब, करंज आणि स्वामी मोहनानंद गिरी उद्यान, सेक्टर ४ सानपाडा येथे सकाळी ११.४५ वाजता कडुनिंब, करंज प्रजातीची झाडे लावण्यात येणार आहेत.

            * नेरुळ : रायन इंटरनॅशनल सेक्टर १९, नेरुळ रस्त्याच्या कडेला सकाळी १०.३० वाजता गोल्डन बांबू लावण्यात येणार आहेत.

या वृक्षारोपण मोहीमेमुळे नवी मुंबईतील हरित आवरण वाढणार असून नवी मुंबईकर नागरिकांनी सीबीडी बेलापूर पारसिक हिल येथील कार्यक्रमाप्रसंगी सकाळी 9.00 वा. किंवा आपल्या विभागातील वृक्षारोपणाच्या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित राहून वृक्षारोपण मोहीमेत सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात येत आहे.