नाट्य महोत्सवाला उत्स्फूर्त प्रतिसाद ;लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी सपत्नीक घेतला नाटकाचा आनंद
पनवेल (प्रतिनिधी) माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या ७५ व्या अर्थात अमृत महोत्सवी वर्ष पदार्पणानिमित्त अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, पनवेल शाखा आणि श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ पनवेल यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या दोन दिवसीय नाट्य महोत्सवाला उदंड प्रतिसाद लाभला. 'एका लग्नाची पुढची गोष्ट' आणि 'कुटुंब किर्रतन' या सुप्रसिद्ध अशा दोन विनोदी नाटकांची पर्वणी नाट्य रसिकांना मिळाली होती, आणि हे दोन्ही प्रयोग हाऊसफुल झाले होते.
पनवेल शहरातील आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात सुप्रसिद्ध नाट्य व सिने अभिनेते प्रशांत दामले, तसेच कविता मेडेकर अतुल तोडणकर यांची प्रमुख भूमिका असलेले 'एका लग्नाची पुढची गोष्ट' तर सुप्रसिद्ध अभिनेते संकर्षण कऱ्हाडे, तन्वी मुंडले, अमोल कुलकर्णी आणि वंदना गुप्ते यांची भूमिका असलेले 'कुटुंब किर्रतन' या नाटकांचे सादरीकरण झाले. यावेळी लोकनेते रामशेठ ठाकूर आणि त्यांच्या पत्नी शकुंतला ठाकूर यांनीही या नाटकांचा आस्वाद घेतला. दरम्यान लोकनेते रामशेठ ठाकूर व रंगकर्मी प्रशांत दामले यांची नाट्य महोत्सवाच्या निमित्ताने भेट झाली. यावेळी प्रशांत दामले यांनी लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त व ७५ व्या अर्थात अमृत महोत्सव वर्षातील पदार्पणाबद्दल शुभेच्छा दिल्या. प्रशांत दामले हे लोकनेते रामशेठ ठाकूर यांना आदराने दादा म्हणून साद घालतात, दोघांचीही ओळख खूप जुनी जेव्हा दोघे भेटतात तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर एक तेज असतो. आणि त्याची अनुभूती या भेटीच्या दरम्यान आली. प्रशांत दामले आणि लोकनेते रामशेठ ठाकूर यांची ओळख ही अनेक वर्षांची असून त्यांच्यातील स्नेह आणि परस्पर सन्मानाचे बंध या भेटीद्वारे पुन्हा अधोरेखित झाले. दोघांच्या चेहऱ्यावर त्या प्रसंगी दिसणारे समाधान आणि प्रसन्नता उपस्थितांचे मन जिंकून गेली.