सर्वात मोठ्या दिवाळी अंक स्पर्धेचा निकाल जाहीर;राज्यस्तरीय स्पर्धेत ‘हंस’, तर जिल्हास्तरीयमध्ये ‘इंद्रधनु’ ठरले सर्वोत्कृष्ट
पनवेल(प्रतिनिधी) विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ आणि मुंबई मराठी पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या २४ व्या राज्यस्तरीय व रायगड जिल्हास्तरीय सर्वात मोठ्या दिवाळी अंक स्पर्धेचा निकाल जाहीर झाला आहे.
एक लाख रुपये व सन्मानचिन्ह असलेला सर्वोत्कृष्ट राज्यस्तरीय दिवाळी अंकाचा पुरस्कार ‘हंस’ अंकासाठी देण्यात येणार आहे, तर रायगड जिल्ह्यास्तरीय प्रथम पारितोषिक इंद्रधनु अंकाने पटकाविला असून चाळीस हजार रुपये आणि सन्मानचिन्हाने त्यांना गौरविण्यात येणार आहे.
दिवाळी अंक महाराष्ट्राची पूर्वापार चालत आलेली एक सांस्कतिक परंपरा आहे. ही परंपरा अखंडपणे चालू राहावी व त्यातून दर्जेदार दिवाळी अंकांची निमिर्ती व्हावी यासाठी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत असलेले श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ तसेच मुंबई मराठी पत्रकार संघ यांच्या वतीने गेल्या अनेक वर्षांपासून महाराष्ट्रातील सर्वांत मोठ्या दिवाळी अंक स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. या वेळची ही २४ वी स्पर्धा आहे.
राज्यभरातून उदंड प्रतिसाद लाभलेल्या या स्पर्धेसाठी ज्येष्ठ साहित्यिक प्रा. अविनाश कोल्हे, महाराष्ट्र सेवा संघ मुलुंडचे कार्यवाह अरूण भंडारे आणि सुप्रसिद्ध सुलेखनकार सुनील धोपावकर यांनी परीक्षक म्हणून जबाबदारी बजावली. स्पर्धेचे मुख्य समन्वयक म्हणून मुंबई मराठी पत्रकार संघाचे उपाध्यक्ष शैलेंद्र शिर्के यांनी, तर रायगड जिल्ह्यातील स्पर्धेचे समन्वयक म्हणून संघाचे ज्येष्ठ सदस्य दीपक म्हात्रे यांनी काम पाहिले. स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा लवकरच मान्यवरांच्या उपस्थितीत होईल, असे पत्रकार संघाचे अध्यक्ष संदीप चव्हाण यांनी कळविले आहे.
राज्यस्तरीय निकाल
सर्वोत्कृष्ट दिवाळी अंक-हंस, द्वितीय पारितोषिक-अंतरीचे प्रतिबिंब, तृतीय पारितोषिक-अक्षर, सर्वोत्कृष्ट विशेषांक-नवभारत, दृश्य कला विशेषांक; मुलांसाठी सर्वोत्कृष्ट दिवाळी अंक-वयम, उत्तेजनार्थ-छावा, उत्कृष्ट दिवाळी अंक-कालनिर्णय, सर्वोत्कृष्ट कथा-सत्याग्रह, मिलिंद बोकील (दीपावली), उत्कृष्ट कविता-आजकाल बायकाही..., लक्ष्मी यादव, पुरुष स्पंदन (७६); लक्षवेधी परिसंवाद-असहमतीचा आवाज, ऋतूरंग; लक्षवेधी मुलाखत-डॉ. सुनील लवटे, शब्दशिवार, इंदूमती गोंधळे; सर्वोत्कृष्ट मुखपृष्ठ-उत्तम अनुवाद,
सर्वोत्कृष्ट व्यंगचित्रकार-प्रभाकर वाईरकर, शब्द रूची; सर्वोत्कृष्ट डिजिटल अंक-विवेक मेहेत्रे, ’उद्वेली-ऑल दि बेस्ट 2024’; विशेष लेख-राजकारण की टोळीयुद्ध, आर्याबाग, विनय हर्डीकर.
रायगड जिल्हास्तरीय निकाल
सर्वोत्कृष्ट दिवाळी अंक-इंद्रधनु, द्वितीय पारितोषिक-आगरी दर्पण, तृतीय पारितोषिक-शब्दसंवाद, उत्तेजनार्थ-लोकसेवक, साहित्य आभा, उत्कृष्ट कथा-रेखा नाबर, लोकसेवक, जिथे कमी तिथे मी; उत्कृष्ट कविता-हितवर्धक, कवी गणपत म्हात्रे, उत्कृष्ट व्यंगचित्रकार-विवेक मेहेत्रे, साहित्य आभा.