लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त गुळसुंदे येथे वृक्षारोपण व वृक्ष वाटप कार्यक्रम

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त गुळसुंदे येथे वृक्षारोपण व वृक्ष वाटप कार्यक्रम




पनवेल (प्रतिनिधी) माजी खासदार, समाजसेवक, व दानशूर व्यक्तिमत्व लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी ७५ व्या वर्षात प्रवेश केला असून त्यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त गुळसुंदे येथे वृक्षारोपण व वृक्षवाटप कार्यक्रम आज (दि. १८) पार पडला. पर्यावरण संवर्धन, हरित क्षेत्र वाढवणे आणि भावी पिढ्यांमध्ये पर्यावरणाबाबत जागरूकता निर्माण करणे या उद्देशाने हा कार्यक्रम राबवण्यात आला.

         महाराष्ट्र राज्य पर्यावरण संरक्षण संस्थेचे माजी निरीक्षक तसेच पनवेल तालुका कुंभार समाज अध्यक्ष बजरंग भागवत, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ कार्यकर्ते महादेव कावडे, सामाजिक कार्यकर्ते महेश ठोकळ, शिक्षिका महाले मॅडम व विद्यार्थ्यांच्या हस्ते वृक्षारोपण झाले. कार्यक्रमात चिकू, आंबा यांसारख्या कलमी फळझाडांची वृक्षलागवड करण्यात आली. विशेष म्हणजे विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणप्रेम जागृत व्हावे यासाठी त्यांना झाडांचे वाटप करण्यात आले. लहानग्यांच्या हातून रोपांची लागवड करून "एक झाड, एक जीवन" हा संदेश देण्यात आला.  पर्यावरण रक्षणाची गरज अधोरेखित करत सहभागी मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले व पुढील काळात अधिकाधिक वृक्षलागवड करण्याचा संकल्पही करण्यात आला.लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली समाजहिताचे असे उपक्रम हे नव्या पिढीसाठी प्रेरणादायी ठरत असून, त्यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त राबवण्यात येणारे उपक्रम समाजात सकारात्मक बदल घडवण्यासाठी उपयुक्त ठरणार आहेत.