पनवेल तालुक्यातील घरांची बंद असलेली खरेदी विक्री नोंदणी सुरु करणे संदर्भात आ. विक्रांत दादा पाटील यांनी नोंदणी महानिरीक्षक, महाराष्ट्र यांच्या दालनात घेतली विशेष बैठक
पनवेल (प्रतिनिधी)दि.२१-आमदार विक्रांत दादा पाटील यांनी शिष्टमंडळासह महाराष्ट्राचे नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक (IGR) यांची भेट घेऊन विशेष बैठकीचे आयोजन केले. नैना प्रभावित क्षेत्रातील नागरिक, भूमिपुत्र शेतकरी, ग्रामस्थ आणि बांधकाम व्यावसायिक यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाच्या आणि ज्वलंत अशा घरांच्या खरेदी-विक्रीच्या नोंदणीच्या बंद असलेल्या प्रक्रियेबाबत सकारात्मक निर्णय व्हावा, यासाठी या बैठकीत सातत्यपूर्ण पाठपुरावा करण्यात आला. या प्रसंगी नोंदणी प्रक्रिया सुरू करण्यासंदर्भात विविध मुद्द्यांवर सविस्तर चर्चा झाली.
नुकत्याच झालेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात आमदार विक्रांत दादा पाटील यांनी विधान परिषदेत शेतकरी आणि स्थानिक भूमिपुत्रांच्या हितासाठी आवाज उठवला होता. त्यांच्या पुढाकाराने राज्याचे महसूलमंत्री मा. चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली यासंदर्भात मंत्रालयात बैठक आयोजित करण्यात आली होती. या विषयावर आतापर्यंत आमदार विक्रांत दादा पाटील यांनी सातत्याने आणि सतत पाठपुरावा केला आहे. आता पुणे येथे आमदार विक्रांत दादा पाटील यांच्या नेतृत्वाखाली नैना प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाने मा. नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक, श्री. रविंद्र बिनवडे तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांसमवेत एक महत्त्वपूर्ण बैठक घेतली.
या चर्चेअंती महाराष्ट्राचे नोंदणी महानिरीक्षक मुद्रांक नियंत्रक (IGR )यांनी रेजिस्ट्रेशन सुरु करणे विषयात आम्ही कार्यरत असून सकारात्मक भूमिका घेत असल्याबाबत आश्वस्त केले.या बैठकीनंतर सोबत असलेल्या शिष्टमंडळाने सर्व ग्रामस्थांच्या वतीने सकारात्मक भूमिकेबद्दल समाधान व्यक्त केले.
या बैठकीस कोकण म्हाडा माजी सभापती श्री. बाळासाहेब पाटील जी , नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक श्री. रविंद्र बिनवडे, नैना प्रभावित क्षेत्रातील ग्रामस्थ , शेतकरी,नागरिक व नोंदणी महानिरीक्षक मंडळाचे इतर प्रमुख अधिकारी उपस्थित होते.