कर्मवीर अण्णांची भूमी आणि छत्रपती शिवाजी कॉलेज माझ्यासाठी पंढरी - लोकनेते रामशेठ ठाकूर
रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक पद्मभूषण कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधून छत्रपती शिवाजी कॉलेजच्या कमवा व शिका योजना माजी विद्यार्थी स्नेहमेळावा छत्रपती शिवाजी कॉलेज सातारा येथे माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. त्यावेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा रयत शिक्षण संस्थेच्या विकासात मौल्यवान वाटा राहिला आहे. त्यांनी या संस्थेच्या कमवा व शिका योजनेत शिक्षण घेतले. नेहमीच माजी विद्यार्थी म्हणून रयत शिक्षण संस्थेचा आदर उराशी बाळगून आहेत. त्यामुळे यावेळी कमवा व शिका योजनेतील माजी विद्यार्थ्यांकडून त्यांच्याप्रती आदर व्यक्त करण्यासाठी लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या कार्याचा उल्लेख असलेला मानपत्र आणि मायेची शाल देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी मानपत्राचे वाचन होत असताना वातावरण अतिशय अभिमानाने ऊर भरून येणारे होते. टाळ्यांच्या कडकडाट त्याला माजी विद्यार्थ्यांकडून प्रतिसाद दिला जात होता.
या कार्यक्रमाला रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य वाय. टी. देशमुख, शहाजी डोंगरे, माजी प्राचार्य आर. के. शिंदे, कमवा व शिका योजनेचे चेअरमन श्री. देशमुख, माजी उपाध्यक्ष एम. एस. शिंदे,
जे. पी. धायगुडे, प्राचार्य राजेंद्र मोरे. धनाजी लेंडवे यांच्यासह माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी पुढे बोलताना सांगितले की, ज्या वर्गात मी शिकलो त्या वर्गात माझा सत्कार होत आहे, याचा मला अभिमान आहे. कर्मवीर अण्णांनी जात पात धर्म पंथ न मानता बहुजन समाजाला शिक्षित केले. माणुसकीचा धर्म कर्मवीर अण्णांनी शिकवणीतून दिला तसेच शाहू फुले आंबेडकरांची शिकवण अण्णांनी रुजवली, असे त्यांनी अधोरेखित केले. मी कमवा व शिका योजनेत शिकलो त्यामुळे येथील अनेक आठवणी आहेत. छत्रपती शिवाजी कॉलेज माझा जीव कि प्राण आहे. गरिबीत काढलेले दिवस आजही आठवणीत आहेत, जीवनात भरपूर कमावले पण गरजुंना देण्याची सवय माझी कधीही जाणार नाही. माझ्या जे काही आहे ते देण्याचा मी प्रयत्न करतो. कर्मवीर अण्णांची विद्यापीठ करण्याची इच्छा होती आणि ती पूर्ण करण्यासाठी हातभार लावता आला याचा मला आनंद आहे, असेही त्यांनी नमूद केले. त्यांनी पुढे बोलताना, त्या काळचे शिक्षक शिस्तीने कडक पण तेवढेच मनमिळावू असल्याचे सांगत सर्व शिक्षकांप्रती आपली आदरभावना व्यक्त केली तसेच बालपणीच्या आठवणीत कधीही खंड पाडू नका असे आवाहन करत माजी सहकाऱ्यांना भेटून आनंद झाल्याची भावनाही लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी व्यक्त केली. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य राजेंद्र मोरे यांनी केले.