भावी पिढीच्या यशस्वी आयुष्यासाठी नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दिशादर्शक ठरणार - प्रदेश कार्यकारी अध्यक्ष रविंद्र चव्हाण
रवींद्र चव्हाण यांनी पुढे बोलताना सांगितले कि, विद्यार्थी दशेपासून चांगला नागरिक घडवण्याचे काम हे शिक्षकांच्या हाती आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये राष्ट्र प्रथम हि भूमिका आहे. आपण देशाचे सुजाण नागरिक असलो पाहिजे त्यासाठी देश प्रथम हि भावना मुळातच महत्वाची आहे. त्यामुळे भावी पिढीला या सर्व बाबी ज्ञात असल्या पाहिजेत, यासाठी शिक्षक आणि पालकांनी देशहित प्रथम बिंबवले पाहिजे. राष्ट्रीय शिक्षण धोरणात गुरुकुल तसेच कौशल्य आधार शिक्षण आहे. आणि त्याचा फायदा विद्यार्थ्यांना सशक्त होण्यासाठी होणार आहे. भारत पाकिस्तान युद्ध सुरु आहे त्यामध्ये पाकिस्तान घाबरून गेला आहे तर आपल्या भारतातील जनता सुरक्षित आहे, ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वामुळे आणि ते पण एक राष्ट्रहिताचे धोरण आहे, असेही त्यांनी यावेळी नमूद केले.
राज्यसभेच्या खासदार मेधाताई कुलकर्णी यांनी बोलताना सांगितले कि, खूप वर्षानंतर भारतात नवीन शैक्षणिक धोरण आले आहे. देशाला व विद्यार्थ्याला परिपूर्ण करणारे हे धोरण आहे. शिक्षण घेताना मातृभाषा प्रथम भाषा असली पाहिजे जीवनावश्यक शिक्षण हि काळाची गरज आहे. देशाचे भवितव्य विद्यालयाच्या वर्गखोल्यामध्ये घडत असते. पुस्तकांपेक्षा त्यातून राष्ट्रीयत्वाचे शिक्षण, कौशल्याचे शिक्षण, संस्कार दिले तर विकसित भारत घडायला वेळ लागणार नाही. भारत पाकिस्तान युद्धावर भाष्य करताना त्यांनी, किती संकटे आली तरी आपला देश सक्षम उभा आहे, त्यामुळे विश्वगुरू बनण्याची ताकद आपल्या देशात आहे. या युद्धातून देशाची भौगोलिक स्थिती वाढणार आहे आणि त्या अनुषंगाने एक इतिहास घडणार आहे, असेही त्यांनी अधोरेखित केले.
नव्या शैक्षणिक धोरणाने भारताला नवी दिशा मिळणार आहे. या धोरणाची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे. आजची शैक्षणिक परिषद हि विचारांची ठोस उपाययोजना ठरणारी होईल, असे मत भारतीय जनता पार्टी पदवीधर प्रकोष्ठचे प्रदेश संयोजक व आदर्श शैक्षणिक संकुलाचे चेअरमन धनराज विसपुते यांनी प्रास्ताविकातून व्यक्त केले. यावेळी पदवीधर मतदारसंघाचे आमदार निरंजन डावखरे, शिक्षक मतदारसंघाचे आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे, तज्ञ मार्गदर्शक भाजपा शिक्षक आघाडीचे संयोजक डॉ. प्रशांत कोल्हे यांचीही समयोचित भाषणे झाली.
देवद- विचुंबे येथील दादासाहेब श्री. धनराजजी विसपुते सभागृह आदर्श शैक्षणिक संकुलात झालेल्या परिषदेला प्रमुख पाहुणे म्हणून विधानसभेचे आमदार प्रशांत ठाकूर, विधान परिषदेचे आमदार विक्रांत पाटील, यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. संजीव सोनवणे, कोकण विभागाचे विभागीय महासंचालक डॉ. विजय नारखेडे, ज्येष्ठ विचारवंत प्रकाश पाठक, आंतरविद्या शाखेचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. चंद्रशेखर चक्रदेव, भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, माजी नगरसेवक गणेश कडू, आदर्श शैक्षणिक संकुलाचे चेअरमन धनराज विसपुते, संचालिका संगिता विसपुते, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ विद्यार्थी कल्याण व बहि:शाल केंद्राचे संचालक डॉ. दयाराम पवार, श्री. बापूसाहेब डी. डी. विसपुते कॉलेज ऑफ एज्युकेशनच्या प्राचार्या ऍड. डॉ. सीमा कांबळे, यांच्यासह विद्यार्थी उपस्थित होते.