अनिल जाधव यांच्या सहस्त्रचंद्रदर्शन निमित्त अभिष्टचिंतन सोहळा आणि सामाजिक उपक्रमांचे आयोजन

 अनिल जाधव यांच्या सहस्त्रचंद्रदर्शन निमित्त अभिष्टचिंतन सोहळा आणि सामाजिक उपक्रमांचे आयोजन


पनवेल (प्रतिनिधी) म्युन्सिपल एम्प्लॉईज युनियनचे सरचिटणीस आणि ज्येष्ठ कामगार नेते मा. अनिल जाधव यांच्या सहस्त्रचंद्रदर्शन अर्थात साठाव्या जन्मदिनी त्यांच्या सामाजिक आणि संघटनात्मक कार्याचा गौरव करण्याच्या उद्देशाने पनवेल येथील काळण समाज हॉल येथे अभिष्टचिंतन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. या विशेष प्रसंगी विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात आले.

कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून भारतीय जनता पक्षाचे उत्तर रायगड जिल्हा सरचिटणीस मा. नितीन पाटील, जिल्हा सरचिटणीस अ‍ॅड. प्रकाश बिनेदार, ओबीसी सेलचे प्रदेश उपाध्यक्ष अ‍ॅड. मनोज भुजबळ, म्युन्सिपल एम्प्लॉईज युनियनचे अध्यक्ष अ‍ॅड. सुरेश ठाकूर, कार्याध्यक्ष संतोष पवार आदी मान्यवरांची उपस्थिती लाभली.

या प्रसंगी आपले मनोगत व्यक्त करताना मा. नितीन पाटील यांनी अनिल जाधव यांचा संघर्षमय जीवनप्रवास अत्यंत प्रभावीपणे उलगडून दाखवला. “अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून उभे राहत त्यांनी कामगार हक्कांसाठी दिलेला लढा अनुकरणीय आहे. त्यांच्या कार्यामुळे कामगार क्षेत्रात एक नवा मापदंड प्रस्थापित झाला असून, त्यांचे जीवन कार्य हे भावी पिढ्यांसाठी प्रेरणादायी आहे,” अशा शब्दांत त्यांनी गौरवोद्गार काढले.कार्यक्रमाच्या निमित्ताने अनिल जाधव यांच्या दीर्घकालीन सेवाभावी योगदानाची विविध क्षेत्रातील मान्यवरांनी प्रशंसा केली असून, त्यांच्या नेतृत्वाखाली कामगार चळवळीला लाभलेल्या दिशादर्शक मार्गदर्शनाबद्दल विशेष कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.