धर्मवीर कामगार सेनेच्या संस्थापक अध्यक्षा प्रियांका गाडे यांच्यामुळे महिलेला मिळाला न्याय-व्हाईट लॉटस इंटरनॅशनल हॉस्पिटल अखेर नमले

धर्मवीर कामगार सेनेच्या संस्थापक अध्यक्षा प्रियांका गाडे यांच्यामुळे महिलेला मिळाला  न्याय-व्हाईट लॉटस इंटरनॅशनल हॉस्पिटल अखेर नमले



पनवेल  / प्रतिनिधी
    रोडपाली येथील व्हाईट लॉटस इंटरनॅशनल हॉस्पिटलमध्ये व्यवस्थापन मंडळाकडून कर्मचाऱ्यांचा छळ होत असल्याच्या तक्रारी धर्मवीर कामगार संघटनेच्या संस्थापक अध्यक्षा प्रियांका गाडे यांच्याकडे येत होत्‍या. त्यानंतर त्यांनी रुग्णालय प्रशासन, पोलिस ठाण्याशी संपर्क साधूनही लक्ष दिले गेले नाही. याप्रकरणी पोलिस प्रशासनाने तत्काळ दखल घ्यावी अशी मागणी प्रियांका गाडे यांनी पोलिस आयुक्त तसेच कळंबोली पोलिसांकडे केली होती. तक्रारी आल्यानंतर रुग्णालयाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. रितेश बिजरोई यांची भेट घेतली असता आम्ही विषय हाताळतो असे त्यांनी सांगितले होते. तीन महिने उलटूनही कर्मचा-यांचे पगार भेटत नाही. हॉस्पिटल पेशंटकडून जास्तीचे बिल घेतले जाते. हॉस्पिटलच्या या गैरप्रकाराविरोधात तेथील कर्मचारी अर्चना खरात यांनी आवाज उठविण्याचा प्रयत्न केला. तर त्यांनाच राजीनामा देण्यास सांगितले. मानसिक छळ केला. जातीवाचक शिवीगाळ केली. पैसे वसूल करण्यासाठी हॉस्पिटल कोणत्याही थराला जाउ शकते. यात एखाद्याचा जीव गेल्यावर प्रशासन जागे होईल का असा प्रश्न उपस्थित होतो अशी तक्रार प्रियांका गाडे यांनी समाजमाध्यमांव्दारे केली होती. मंगळवारी २० मे ला  प्रियांका गाडे या आपल्या सहका-यांसह हॉस्पिटल प्रशासनाला जाब विचारण्यासाठी गेले असता त्याठिकाणी हॉस्पिटल व्यवस्थापन यांनी लगेचच कळंबोली पोलिसांना संपर्क केला. एरव्ही कायम उशिरा पोहचणारे पोलीस यावेळी मात्र तात्काळ उपस्थित झाले. त्यानंतर झालेल्या चर्चेत हॉस्पिटल व्यवस्थापनाने तक्रारदार महिलेच्या अटी मान्य केल्या. धर्मवीर सेनेच्या प्रियांका गाडे यांच्यामुळे योग्य न्याय मिळाला त्याबद्दल महिलेने प्रियांका गाडे यांचे आभार व्यक्त केले. यावेळी झालेल्या चर्चेत विजय पवार यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.